19 सितंबर 2011

बेरक्या वाचू नका, त्यामुळे तुमचे काम बिघडत आहे! खांडेकर व लांबेचा डीएममध्ये आदेश


(बेरक्यावरून)

औरंगाबाद- दिव्य मराठीमध्ये फक्त लांजेवार आणि श्रीकांत सराफ दादागिरी करतात असे नाही. तर खांडेकर आणि लांबे  ही हाच पाढा गिरवत आहेत. सतत बातम्या महत्वाच्या  बातम्या  मिस होत असल्याने आणि बाहेरच्या बातम्यांपेक्षा किशोर निकम आणि सामनातील  फोटोग्राफरच्या मारामारीच्या बातम्या जास्त येत असल्याने अखेर खांडेकर आणि लांबे या जोडगोळीने सगळा राग बेरक्यावर काढला आहे.
वाटले तर बातम्या करू नका, पण बेरक्या वाचत जाऊ नका, असा सल्ला खांडेकर आणि लांबे यांनी दिला आहे.  आम्ही तुमचे सिनिअर आहोत, याची आठवण जोडगोळीने करून दिली. आमची बदनामी झाली तर तुम्ही डगमगताल, म्हणून बेरक्या वाचू नका असे खांडेकर आणि लांबे यांनी मिटिंग घेवून सांगितले. 

आता तुम्हीच सांगा त्या निकमला मस्ती करायला काय आम्ही सांगितली होती . त्याने खोटे माणसे पाठवून सामनातील प्रेस फोटोग्राफरला भडकविले हि काय कोणाची चूक म्हणावी. नाचता येईना अंगण वाकडे असा हा प्रकार सुरु आहे. काही कार्यालायात आमच्यावर बंदी घातली होती. पण आता निकमसारखे मोजकेच लोक कार्यालायात इंटरनेट वाचतात. कर्मचार्यांना घरी बेरक्या वाचण्यापासून खांडेकर आणि लांबे कसे रोखणार. त्यांचाही दिवसच बेरक्या वाचनाने सुरु होतो, मग त्यांनीच हे का सांगितले?

ता. क.- आता सांगा बेरक्या वाचल्याने दिव्यचे कर्मचारी बिचकत आहेत यावर कोणाचा विश्वास बसेल का?

14 सितंबर 2011

क्षण एक पुरे ‘प्रेमा’चा... मजनू होतो प्रेम‘दासा’चा...

पेपरवाल्यांनी पेपर काढून विकण्याबरोबरच इतर अनेक उद्योग सुरू केल्याने वृत्तपत्रांच्या कचेरीमध्ये पत्रकारेतर कर्मचार्‍यांची बरीच भाऊगर्दी (आणि बहिणगर्दी) दिसू लागली आहे. एकेकाळी युवामंच असत. आता सख्यांचे मंच असतात. व्यापार्‍यांचे मंच असतात. उद्योगांचे मंच असतात. वाचक सोडून सगळ्यांचेच मंच असतात. (वाचक आपले ‘मुकी बिचारी कुणीही हाका’टाईप असतात. मध्येच ‘मर्जी’ जाणून घेण्याची उबळ काही जणांना येते. पुन्हा सारे काही शांत शांत)

तर अशाच एका मंचाच्या बहिणबाईंची ही कथा. सिद्धेश्र्वरनगरीत एक दैनिक राज्य करीत होते. (‘एक राजा राज्य करीत होता’च्या धर्तीवर ही कल्पना कशी वाटते?) या राज्यात प्रजाजन कमी पगारात भरपूर काम करीत होते. राज्यात सख्यांसाठी विशेष मंच होता. (सख्याहरींसाठीही असाच एक मंच असावा, अशी मागणी अनेकांनी केली होती पण हे प्रकरण आपल्याला आवरणार नाही, हे लक्षात घेऊन राजाने त्याला मनाईहुकुम बजावल्याचे कळते.) या सख्यांच्या मंचाचा गल्ला सांभाळणार्‍या बहिणबाईकडे अधूनमधून सख्यांना एकत्र करण्याचेही काम असते म्हणे. तर या बहिणबाईंनी आपल्या सर्व सख्यांचा समस्त तपशील आपल्या संगणकात बंदिस्त करुन ठेवला. हा तपशील आपल्याकडे बंदिस्त स्वरुपात असल्याचा त्यांचा समज एकदा खोटा ठरला आणि या राज्याच्या जाहिरातमंत्र्यांनी आपल्या संगणकावरून तो पळविला असल्याचे त्यांच्या म्हणे लक्षात आले.

ते जाहिरातमंत्री तर या सखीमंत्री. असे परस्पर चोर्‍या चपाट्या करून कसे चालणार? (अशा चोर्‍या करायला ही काय ‘मर्जी’ची थीम थोडीच आहे?) असो. तर या मंत्रीणबाईंनी त्या मंत्र्यांविरुद्ध राजांकडे तक्रार गुदरली. (गुदरली हा शब्द वापरताना आम्हाला नेहेमीच हसू फुटते) राजांनी तटस्थपणी दाखविण्यासाठी चौकशी सुरू केली. (अशी चौकशी सुरू करावीच लागते. म्हणजे तक्रार करणार्‍याचे समाधान होते आणि ज्याच्याविरुद्ध तक्रार असते त्याच्याववरही वचक बसतो! हे आपले स्वानुभवी तत्वज्ञान!)

अशा तक्रारींचे पुढे काय होते, हे सर्वांनाच माहिती असते. राजाला काय, कुठूनही आपला महसूल वाढण्याशी देणेघेणे असते. त्यामुळे या चोरीचा त्याला मनस्वी आनंदच झाला होता. पण नाटक करणे भाग असते. आपल्या अंमलाखालील विविध ठिकाणच्या इंजिनिअरना बोलावून एक समिती गठित करण्यात आली. या समितीने सिद्धेश्वरनगरीत जाऊन या दोन्ही मंत्र्यांच्या संगणकांची, त्यांच्यातील जोडांची आणि त्यातील साठ्याची बारकाईने पाहणी केली. आता खरी गंमत तर पुढेच आहे.

ही पाहणी मुदलात होती ती जाहिरातमंत्र्यांच्या चोरीसाठी. त्याचे काय काय झाले, ते कळले नाही. पण भलतीच गंमत तेथे घडल्याचे आमच्या कानावर आले. त्याचे झाले असे, की सखीमंत्री आणि बातमीमंत्री यांच्यात सख्यांच्या मंचावरून, राज्याच्या भरभराटीवरून बरीच सखोल चर्चा होत असे म्हणे. या चर्चेसाठी या बहिणबाई संबंधित बातमीमंत्र्यांच्या बंदिस्त कक्षात स्वतःला बराच वेळ बंदिस्त करून घेत असत म्हणे. या बांध-बंदिस्तीबरोबरच त्यांचा संगणकीय संवादही चालू असे म्हणे. नेमका हाच संवाद या तज्ज्ञ इंजिनइरांच्या हाती पडला आणि मग काय महाराजा... काय गंम्म्म्मत झाली म्हणून सांगू... मूळ तक्रार राहिली बाजूलाच...!

प्रेमाचा दास झाल्यावर पत्रकाराचा मजनू होतो आणि मग काय महाराजा, सखी तर अशा वेळी तयारच असते...

तात्पर्य काय? माणसांच्या बदल्या दूर दूर करू नये. कुटुंबापासून दूर राहिले की भावना अनावर होतात आणि दुधाची तहान पर्यायी दुधावर भागवावी लागते...!!!!

1 सितंबर 2011

खुषखबर... कुमारस्वामी आता ‘खा.’ होणार...!

खुष खबर... खुष खबर... खुष खबर... महाराष्ट्र देशीचे महान पत्रककार श्री श्री कुमारस्वामी यांच्या गळ्यात लवकरच ‘खा.’ पदाची माळ (अखेर) पडणार असल्याचे आमच्या खात्रीलायक सूत्राकडून (म्हणजे आमच्या मनातल्या मनात) कळते. 


श्री श्री कुमारस्वामी (श्री श्री ही दुहेरी उपाधी त्यांच्याबद्दल आमच्या मनातील परम आदर दर्शविणारी आहे. गैरसमज नसावा) म्हणजे निधड्या छातीचा पत्रकार! आतापर्यंत त्यांनी आपल्या स्वतःच्या छातीत कित्येक गोष्टी दाबून ठेवल्या. योग्य वेळी त्या त्यांनी बाहेर काढल्या. त्यांच्या अनेक इच्छा होत्या. महाराष्ट्रदेशीच्या सर्वाधिक दैनिकांच्या प्रमुखपदावर काम करून दाखवीन ही प्रतिज्ञा त्यांनी त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईसमोर केली होती असे मध्यंतरी त्यांच्या मावशीकडून आम्हाला कळले. (या मावशींचा चिरोटे तयार करून विकण्याचा व्यवसाय आहे. पुण्यात आमच्या शेजारीच राहतात.) लहानपणी आपल्या आईला दिलेले वचन म्हातारपणापर्यंत जाताना (खरे तर आम्ही त्यांना म्हातारा म्हणू इच्छित नव्हतो. पण शब्दांचा परिणाम उठून दिसण्यासाठी हा शब्द वापरण्याचा नाईलाज आहे. क्षमस्व) स्मरणात ठेवण्याची त्यांची शक्ती खरोखरच स्पृहणीय आहे म्हणायची. आतापर्यंत इंग्रजी-मराठी धरून मुदलात पाच पेप्रांच्या मेन मेन पोस्टवर श्री श्री कुमारस्वामी यांनी आपली योग्यता सिद्ध केली. सध्या त्यांच्या ‘दिव्य’ बुद्धिमत्तेचा प्रकाश सार्‍या संबंध अख्ख्या अखिल महाराष्ट्रभर फाकतो आहे. 


अर्धा भारत व्यापणार्‍या गटाच्या, अर्धा महाराष्ट्र व्यापणार्‍या पत्राचे आता ते अध्वर्यू आहेत. (पण याला अर्धवट म्हणायचे नाही. सांगून ठेवतो.) त्यांच्या लोकविलक्षण प्रतिभाविलासाने अख्खा महाराष्ट्र मंत्रमुग्ध झाला आहे. त्यांच्या पेप्रात छापून आलेल्या असंख्य चुकांकडे तमाम वाचक इतक्या मोठ्या मनाने पाहतात की ज्याचे नाव ते. त्यांचे अग्रलेख म्हणजे साक्षात सरस्वतीचे तांडवनृत्य ! (अरेरे ... उपमा चुकली वाटते) 
तर श्री श्री कुमारस्वामी यांच्या ‘खा.’ पदाबद्दल आम्ही बोलत होतो. ज्या प्रमाणे त्यांनी आपल्या मातुःश्रींना सर्वाधिक पेप्रांच्या प्रमुखपदांवर काम करून दाखविण्याचे वचन दिले होते तद्वतच त्यांनी आपल्या (तत्कालीन) प्रेयसीस (प्रोबेशनवर असताना इंप्रेशन मारण्यासाठी) कधी ना कधी ‘खा.’ होऊन दाखवीन अशी बढाई मारली होती. ‘खा.’ झाल्यावरच आपण (आपल्या लग्नाचे) लाडू खाऊ असे तिने सांगितल्याने त्यांचा नाईलाज झाला. तो नाईलाज कायम राहिला. (एरव्हीही पत्रकारांना पोरी देण्यासाठी त्यांचे बाप नाराजच असत. दरिद्री पत्रकाराला पोरगी देण्यापेक्षा विहिरीत ढकललेली बरी, असे त्यांचे म्हणणे असते. त्यामुळे आमचीही खूप अडचण झाली होती. आता बरे आहे.) तर सांगायचा मुद्दा हा, की आताही ती त्यांना (आपल्या पती व मुलांसह) भेटत असते आणि नजरेनेच ‘खा.’बद्दल विचारत असते ! ती नजर (म्हणजे काय बाप्पा...!) त्यांना बोचत असते. त्यामुळे ते आता जिद्दीला पेटले आहेत.

खरे तर याची सुरवात झाली ते महाराष्ट्र वर्तमानाच्या काळात. ते समयी (म्हणजे साधारण 1997 साली) भारतवर्षी सोनियाचा दिनु उगविला होता. या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघत श्री श्री कुमारस्वामी यांनी भारतभर त्या किरणांचा पिच्छा पुरविला आणि सार्‍या आयुष्याची लेखणी एका महिन्यात झिजविली. हे फिरणे इतके होते, की एखाद्यास कमरेची व्याधी जडावी.) हे महाराष्ट्र वर्तमान की सोनियाचा दिनविशेष हेच कोणाला कळेनासे झाले होते. याचा उत्तरार्ध म्हणून त्याच वेळी सोनियाचा उंबरा ओलांडून ‘खा.’ होता येईल असे त्यांना वाटो लागले. पण हाय रे रामा... (सॉरी. श्री श्री कुमारस्वामी यांना रामाची ऍलर्जी आहे.) हाय रे दैवा... (पुन्हा सॉरी. त्यांना दैववादाचीही ऍलर्जी आहे) जाऊ दे... मरू दे... बाईंना मराठी पेप्रं पाहण्याची रुची नव्हती आणि विंग्रजीतून निघणारे त्यांचे भावंड वर्तमान श्री श्री कुमारस्वामी यांचे ट्रान्सलेशन विंग्रजीत छापणेस तयार नव्हते. ते मुळे ती मेहनत मागे पडली. मग कालौघात श्री श्री कुमारस्वामींनी खूप मेहनत घेतली. कधी महाराष्ट्राचे वर्तमान वापरले तर कधी लोकांची सत्ता. कधी शेठजींचा पदर धरला तर कधी भोपाळसेठांचे धोतर. पण अद्यापपर्यंत उपेग काही झाला नाही. 

पण काळाच्या ओघात त्यांची धार (म्हणजे त्यांच्या लेखणीची धार) भाजप-संघाच्या बाबतीत खूपच तीक्ष्ण होत गेली. जे प्रमाणे मुंबईतील गटारांचा प्रश्न मांडताना ते पॅरिसच्या नाईटक्लबबाहेरील सांडपाण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतात तसेच दुष्काळ, दंगली, राजकारण, परीक्षेतील गैरव्यवहार, राजकारणातील भ्रष्टाचार, रस्त्यांची दुरवस्था, कूपनलिकेत अडकलेली बालके, हातपंपांचा प्रश्न, वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण, अण्णांचे आंदोलन, कोकण रेल्वेमार्गावर कोसळणार्‍या दरडी, रेल्वेस्टेशनवरील चहाचा दर्जा या प्रत्येक गोष्टींचा संबंध ते संघपरिवाराशी जोडून त्याचा खरपूस समाचार घेऊ शकतात. याच मुद्‌द्यावर चिदंबरम गृहमंत्री होऊ शकतात तर आपण ‘खा.’ कसे होऊ शकत नाही, या विचाराने त्यांना सध्या पछाडले आहे म्हणे.

दिव्याचा प्रकाश पसरवताना पहिल्या दिवसापासून त्यांनी ही काळजी घेतली आहे. त्यामुळे अनेक वेळा चमत्कारिक स्थितीही उद्भवली. पण असे चमत्कार त्यांच्याच लीलेचे भाग आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य. पर्वा अण्णांच्या आंदोलनाला संघाचा पाठिंबा असल्याची खबर लागताच त्यांना परमसंतोष झाला आणि त्या संतोषाच्या भरात (आवेगात म्हणायचे होते) त्यांनी खरपूस अग्रलेख लिहून टाकला! अग्रलेखात भाजप, संघपरिवाराचा उल्लेख नसेल तर त्यांचा ऑपरेटर कामच करत नाही म्हणे!

मध्यंतरी मा. पंतप्रधानांनी निवडक संपादकांना चर्चेसाठी बोलावले तेव्हा श्री श्री कुमारस्वामी पहिल्या पाचात (म्हणजे निमंत्रित केलेल्या पाच जणांत पाचवे) आले. एक पत्रकार म्हणजे एक स्तंभ म्हणायचे झाले तर हा पाचवा स्तंभ. तर त्यांनी तेव्हाही आपल्यात पंतप्रधान अवतरल्याचे दाखवून देताना ‘खा.’ ची चव अनुभवण्याचा प्रयत्न केला. टीव्हीवर त्यांचे दर्शन सार्‍या मराठी जगाला जाहले.

टीव्हीवर आल्याशिवाय ‘खा.’चा मार्ग प्रशस्त होणार नाही म्हणून आता त्यांनी तार्‍यांच्या चौकटीत आपला चेहरा प्रकट करण्यास सुरवात केली आहे. या बदल्यात तार्‍यांच्या राज्यातील राजाला आपल्या कॉलमातील चौकट त्यांनी बहाल केली. दोघांचेही बरे चालले आहे, असे म्हणतात.

तर मूळ मुद्दा हा, की उद्या-परवा कॅन्सर उपचारांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या रुग्णालयातून उपचार घेऊन बाईसाहेब परतल्या की श्री श्री कुमारस्वामी आपल्या अग्रलेखांची आणि रविवारच्या लेखांची आणि मागील 20 वर्षांतील लेखांची फाईल घेऊन भेटीला जाणार आहेत म्हणे. एवढ्या फायली पाहूनच बाईसाहेब त्यांना ‘खा’ म्हणतील अशी त्यांना आशा आहे. 

मागून आलेले अनेकजण पुढे गेले, महाराष्ट्राच्या वर्तमानातूनच गेले याचे त्यांना फार वाईट वाटते, असे त्यांची कामवाली सांगत होती. कामवालीला तिच्या मालकिणीने सांगितल्याचे कळते. त्यांची आमची कामवाली एकच. म्हणून आम्हाला हे वर्तमान कळले. असो. एक मराठी माणूस ‘खा.’ होणार असेल, तर राज ठाकरेंच्या खालोखाल आनंद आम्हाला होणार. या आनंदातच ही बातमी आपणापर्यंत पोहचविण्याचे आम्ही ठरविले.
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे भोपाळकडे...

14 जुलाई 2011

आता सकाळ च्या वाचकांनाच भरली हुडहुडी...!

सकाळ मध्ये सध्या धमाल चालू आहे. मागे ३ जुलै रोजी 'आम्हाला वगळा...' हा अनंतराव भालेराव यांचा लेख जशाला तसा सकाळ च्या मुख्य अंकात आणि औरंगाबाद टुडे मध्ये दोन वेळा छापला गेला. आज पोस्ट खात्याची एक बातमी औरंगाबाद टुडेच्या पान ३ आणि पान ८ वर जशीच्या तशी छापून आली आहे. एकाच किमतीत दोन अंक न देता एकाच बातमी दोन वेळा छापण्याच्या या पत्रकारितेला काय म्हणायचे? पवार साहेब, नुसते बस थांबे रंगवून अंक विक्री वाढत नसते. अंक चांगला काढावा लागतो, मग लोक आपोआप विकत घेतात. मग १ रुपयात अंक देण्याची सुद्धा गरज उरत नाही...! 


10 जुलाई 2011

औरंगाबादकराना घडले भेटीच्या `भिक`वस्तूचे दिव्य दर्शन !

औरंगाबाद्करांची मर्जी जाणून घेण्याची चढाओढ काही महिन्यापूर्वी रंगली होती. मर्जीच्या या खेळात भोपाळसेठ यांनी २०० रुपयात दिव्यदर्शनाची ऑफर देऊन वाचकांची मर्जी जिंकली. त्याच वेळी तमाम वाचकांना एक भेटवस्तू देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. दिव्य दर्शनाच्या भाराने झुकलेल्या पब्लिकने खूप रेटा सुरु केल्याने अखेर या भेटवस्तू वाटण्याचे ठरवण्यात आले. 

लोकांना वाटले, कि मर्जी जाणून घ्यायला हे लोक दारोदार फिरले, मग भेट देण्यासाठी पुन्हा दारी येतील. पण हाय रे दैवा, या वेळी उलटेच घडले. दारीच काय, गल्लीत सुद्धा कोणी फिरकले नाही! समस्त गरजू भेटइच्छुकांनी आता आपल्या दारी येऊन भेट स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. तब्बल २०० रुपयांच्या भेटीसाठी आतुरलेले हजारो जीव दिव्याखाली धावले... आणि काय सांगायचे महाराजा... सर्व जण अतिशय तृप्त झाले आहेत. 

भोपाळसेठ यांनी पार दूर देशीहून प्लास्टिकच्या ३ बरण्या आणि बायकांनी नाक पुसण्याचे ३ फडके असा साधारण ४० रुपयात खरेदी केलेला ऐवज आणून वाटण्यास सुरवात केली. ही मौल्यवान भीक स्वीकारण्यास सध्या दिव्याच्या अंगणात भल्यामोठ्या रांगा लागलेल्या आहेत. असली फालतू भिक स्वीकारण्यापेक्षा ती सोडून देण्याचे विचार लोक करतात पण पुन्हा - चोराची लंगोटी - म्हणून रांगेत उभे राहतात. 
रांगा लागल्या पण तिथे पावसापासून संरक्षण नाही. बिचारे ४० रुपयाच्या भिकेसाठी आपला लाखमोलाचा जीव अडकवून उभे आहेत. 

अशा प्रकारे वाचकांची मर्जी जाणून घेवून आता औरंगाबादेत आपलीच मर्जी चालविण्याचा प्रकार सुरु झाला असून उर्वरित महाराष्ट्रासाठी हा प्रेमाचा संदेश देण्यासाठी आम्ही हे लेखन केले आहे. यात कोणाची बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही. त्यामुळे कोणीही आम्हाला कायदेशीर इलाज करण्याचा इशारा देयू नये, ही विनंती...!

2 जुलाई 2011

‘मराठवाडा’ बुडविल्याचे पाप लोकमत ने धुतले...!

आज सकाळी सकाळी आमचे मन प्रसन्न झाले. लोकमतने आपले जुने पाप आज धुवून टाकले. साधारण दोन दशकांपूर्वी मराठवाड्यात ‘मराठवाडा’ हे दैनिक छान चालत असे. कै. अनंतराव भालेराव यांच्या नेतृत्रावाखाली चालणारे हे वृत्तपत्र स्वातंत्र्यलढ्यापासून चालू होते. बाबूजींचे पत्र औरंगाबादेत आले आणि अव्यावहारिक मराठवाडा रसातळाला गेला. यांनी तिथली माणसे पळविली. बऱ्याच गमती-जमती केल्या आणि अखेर त्या दैनिकाचा श्वास थांबला.
कै. अनंतराव भालेराव हे या दैनिकाचे सर्वेसर्वा. ज्यांच्या लेखणीच्या दमावर वृत्तपत्र चालायचे असे खूप कमी पत्रकार झाले. आचार्य अत्रे, ग. वा. बेहेरे, अनंतराव भालेराव, विवेक घळसासी... अशी छोटीशी यादी तयार होते. अशा अनंतराव भालेराव यांचे समग्र लेखन २ खंडात आज प्रकाशित होते आहे.

अनंतराव हे मराठवाड्यातील पत्रकारितेतील पितामह. त्यांच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लोकमत ने आज पहिल्या पानावर ३ कोलम बातमी छापली आहे. एवढेच नवे, तर आतील पानावर व्यंकटेश केसरी यांचा अर्धे पान लेखही चपला आहे. हे सारे गोड धक्का देणारे आहे. पण एक विचार मनात येतो – हे पापक्षालन तर नव्हे? काहीही असो, पहिल्या नंबरच्या पेपरने असे छापणे आनंददायी आहे. पण हा ‘डीएम’ इफेक्ट तर नव्हे? काहीही असो, एका महान पत्रकाराला एवढी प्रसिद्धी देत त्यांनी दिलेल्या मान वंदनेला आम्ही दाद देतो.
या उलट मराठवाड्यात आपल्या दिव्याच्या प्रकाशाचा उजेड पडण्यासाठी आलेल्या पत्राने या वृत्ताला एका कोपऱ्यातली जागा दिली आहे. अनंतराव भालेराव यांना न ओळखणारी पिढी या पत्रात नोकरी करते आहे, असे दिसते. खरे तर पत्रकारितेतील प्रत्येकाने जे ग्रंथ विकत घेउन पारायणे करून काही शिकावे, अशा योग्यतेचा हा पत्रकार. त्यांच्याकडे असे दुर्लक्ष्य! हरी हरी. तरी एक बरे, त्यांचा निवासी संपादक एके काळी मराठवाडा दैनिकात काम करीत होता म्हणे...!
मग दिव्याने या बातमीवर प्रकाश का टाकला नाही बरे? काय भोपाळसेठ? आपण तर पगार भरपूर दिले आहेत म्हणे? या विषयात कुणाची काही अपेक्षा होती का? असे चीन्धीचोर आपल्याकडे आहेत का? तपास करा.










आणि, ही आहे दिव्याच्या प्रकाशातील इवलीशी बातमी.


अनंतराव हे मराठवाड्यातील पत्रकारितेतील पितामह. त्यांच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लोकमत ने आज पहिल्या पानावर ३ कोलम बातमी छापली आहे. एवढेच नवे, तर आतील पानावर व्यंकटेश केसरी यांचा अर्धे पान लेखही छापला आहे. हे सारे गोड धक्का देणारे आहे. पण एक विचार मनात येतो – हे पापक्षालन तर नव्हे? काहीही असो, पहिल्या नंबरच्या पेपरने असे छापणे आनंददायी आहे. पण हा ‘डीएम’ इफेक्ट तर नव्हे? काहीही असो, एका महान पत्रकाराला एवढी प्रसिद्धी देत त्यांनी दिलेल्या मान वंदनेला आम्ही दाद देतो.
या उलट मराठवाड्यात आपल्या दिव्याच्या प्रकाशाचा उजेड पडण्यासाठी आलेल्या पत्राने या वृत्ताला एका कोपऱ्यातली जागा दिली आहे. अनंतराव भालेराव यांना न ओळखणारी पिढी या पत्रात नोकरी करते आहे, असे दिसते. खरे तर पत्रकारितेतील प्रत्येकाने जे ग्रंथ विकत घेउन पारायणे करून काही शिकावे, अशा योग्यतेचा हा पत्रकार. त्यांच्याकडे असे दुर्लक्ष्य! हरी हरी. तरी एक बरे, त्यांचा निवासी संपादक एके काळी मराठवाडा दैनिकात काम करीत होता म्हणे...!
मग दिव्याने या बातमीवर प्रकाश का टाकला नाही बरे? काय भोपाळसेठ? आपण तर पगार भरपूर दिले आहेत म्हणे? या विषयात कुणाची काही अपेक्षा होती का? असे चीन्धीचोर आपल्याकडे आहेत का? तपास करा.

1 जुलाई 2011

बावचळलेल्या मालकाची वेठबिगारीची 'ऑफर'!

जेहत्ते काळाचे ठाई महाराष्ट्र देशी मराठी वृत्त सृष्टीमध्ये बहुत बावचळलेपणा भरलेला दिसतो आहे. भोपाळशेठ यांच्या अमराठी आक्रमणापुढे साऱ्या मराठी पुत्रांनी नांगी टाकली. ट्रायल भूमी औरंगाबाद मध्ये जबरदस्त मुसंडी मारून आता दिव्य प्रकाश साऱ्या महाराष्ट्र देशी पसरणार आहे. या प्रकाशात उजळून निघण्यासाठी नारदाचे वंशज सरसावले आहेत. याला कोणाही मालकाचे बंदे अपवाद नाहीत. ये कारणे, काळ्या पांढऱ्या दाढीमुळे औरंगाबादेत प्रचंड मोठे खिंडार पडल्याने त्रस्त झालेल्या मालकांनी शनिवारवाड्याच्या पाठीमागून एक मनोरंजक फर्मान काढले असल्याचे कळते. त्यांनी दिलेल्या या वेठबिगारीच्या ऑफरमुले पुण्यापासून नागपूरपर्यंत आनंदी आनंद पसरल्याचे वृत्त आहे. काय आहे या मध्ये? -
ऐका...
नवी पगारवाढ मिळण्याआधी कर्मचाऱ्यांनी एक करार करणे आवश्यक आहे. या नुसार तीन वर्षे आमचा पेपर सोडून कुट्ठे कुट्ठे जायचे नाही. (आम्ही नाही जा !) समजा, जायचेच झाले तर ३ महिन्याची नोटीस द्यायची. (कित्ती मज्जा) नाही तर ३ महिन्याचा पगार कापणार! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे - बाहेर जायचे तर जा पण प्रतिस्पर्ध्याकडे जायचे नाही !!!! आता प्रतिस्पर्धी कोण, हे यात स्पष्ट नाही! प्रत्येक पेपर प्रतिस्पर्धी ठरू शकतो! मग काय? - मर मेल्या उपाशी!
साम्प्रतला समस्त उभ्या महाराष्ट्रात या नव्या वेठबिगारीची चर्चा चालू आहे. पगारवाढीआधी करारावर सही हवी, पण पगारवाढ किती, हे गुलदस्त्यात आहे. तीन वर्षे सोडायचे नाही, पण तीन वर्षे किती पगार वाढवणार, हे सांगणार नाही... काय करावे? कुठे जावे? 
पत्रकारांवरील या 'हल्ल्या'विरुद्ध कोणी आवाज उठविणार का हो एस. एम. सर?