4 जून 2011

स्वर्गलोकीचा नवा 'बाय लॉ'

नारद महर्षींच्या तमाम वंशजांना जेहत्ते कालाचे ठायी कलियुगी औरंगाबाद उर्फ संभाजीनगर उर्फ खडकी ग्रामी रुजू जाहल्याबिगर मोक्ष मिळणार नाही असा ‘बाय लॉ’ सांप्रतात स्वर्गलोकी झाला आहे काय, ऐसी शंका यावी असे वातावरण सध्या अखिल महाराष्ट्रभर पसरले आहे. कोणीही उठतो अन्‌ औरंगाबादी सुटतो. हा काय प्रकार असावा बरे? भोपाळसेठांनी ‘कुमार’ आणला की ऋषिमुनींनी त्यामध्ये भर टाकत ‘भरत कुमार’ आणावा... काय बरे हे गुपित असावे? ही काय कुरघोडी करणेची पद्धती झाली? की एकाने ‘आम्ही निःपक्ष’ अशी आरोळी ठोकली की दुसर्‍याने ‘आम्ही सर्वपक्ष’ म्हणत सगळ्या पक्षांचा गोतावळा जमा करायच्या मागे लागायचे? आमच्या दुकानात भाजप आहे, शिवसेना आहे, भाकप आहे, माकप आहे, राष्ट्रवादी आहे आणि कॉंग्रेस तर आमच्यातच आहे...! छान आहे बरें...!

नाशकात दिवे पेटणार...!
असो. आमचे अनुपस्थितीत महाराष्ट्रदेशी बरेच काही घडते आहे. घडले आहे. नाशिक श्रीक्षेत्री दिव्याचा प्रकाश लवकरच फाकणार असलेले वृत्त आहे. तेथील सर्व्हे पूर्ण होत आले असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरवात होणार असल्याचे वृत्त आहे. साहजिकच जळगाव-धुळे-नंदुरबार पट्‌ट्यातही लगोलग प्रकाश फाकू लागेल. तिकडे औरंगाबादी दिवा पेटविण्यास साक्षात देशाचे गृहमंत्री आले... काय सांगावे महाराज - साक्षात गृहमंत्री! आजकाल त्यांच्याकडे बराच वेळ दिसतो. पण त्यांचे निमित्त चुकले. एका पेपरच्या प्रकाशनाला आल्याने इतर पेपरवाल्यांनी ती बातमी ‘किल’ केली. वृत्तपत्रसृष्टीसाठी किती अभिमानाची गोष्ट आहे ना ही? देशाचा साक्षात गृहमंत्री आपल्या शहरात प्रथम येतो आणि त्याची दखलही ठळकपणे घ्यायची नाही... बहुदा वाचकांची मर्जी सांभाळण्याचीच ही रीत असावी. किंवा मग विष्णु भागवताचे पुराण लावायलाच जागा पुरत नसल्याने अशा ‘फालतू’ बातम्यांना स्थान उरत नसावे! तर मंडळी, नाशकातील दिवे लागण्याआधी जालना, बीडमधील दिवे प्रकाशणार आहेत म्हणे. मग नाशिक-धुळे-नंदूरबारचा पट्टा. त्यानंतर पुणे आणि मग अंबाबाईचे कोल्हापूर... होश्शियार.

बहन मायावतींचा विजय असो?
आम्ही तिकडे यूपीत होतो. परमआदरणीय मायावतीबहन यांच्या आदेशावरून एका भव्य स्थळी आमची निवास-भोजनाची व्यवस्था होती. पेयपानाची सोय मात्र त्यांच्या भक्तजनांकडून प्रायोजित करण्यात आली होती. जयललिता अम्मा यांच्या सेवेत आम्ही बजावलेली कामगिरी बहनजींपर्यंत पोहोचली. म्हणतात ना... कीर्तीचा सुगंध कस्तुरीसारखा दर्वळत असतो. खर्‍या दर्दींनाच तो कळतो आणि आम्हास बोलावणे धाडले जाते. (इथे महाराष्ट्रात सर्वांनाच सर्दी झालेली दिसते.) बहनजी आतापासूनच तयारीला लागल्या आहेत. पुढच्या निवडणुकीत कुणाशी युती करायची की एकट्यानेच लढायचे, हा त्यांचा पहिला अजेंडा आहे. त्यातच राहुलबाबांनी दिग्विजयसिंहांच्या प्रेरणेने जे दिवे पाजळले, त्यामुळे या प्रांती कॉंग्रेसचे बरेच हसे झाले आहे... पण आम्ही हे सारे आपणास का सांगतो आहोत? हा विषय बंद.

दिव्यांखाली उजेड... 
तर आपण कुठे आले होतो? (असे म्हटले की उगाचच ज्येष्ठ पत्रकार झाल्यासारखे वाटते, नाही?) औरंगाबाद देशी महान महान पत्रकारमहोदयांचे येणेजाणे वाढले आहे. एका कुमाराला सोबत म्हणून दुसराही कुमार औरंगाबादी संस्थेमध्ये जॉईन झाला. काय पण कमाल आहे बरे... आम्ही ऐसे ऐकून आहोत की वार्षिक 55 लाखांवरून 56 लाख अशी वाढ घेऊन ते आपल्या ‘मर्जी’ने जॉईन झाले म्हणे. एक लाखात काय येईल? असो. हा ज्याचा त्याचा प्रश्न. 
पण कुमारस्वामी मात्र ग्रेट आहेत. शुभारंभीच त्यांनी आपल्या वैश्विक लेखनातील वैश्विक संदर्भात जागतिक दर्जाच्या तीन चुका केल्या. (‘त्यांनी’ म्हणायचे कारण, की असे लेखन तेच करीत असावेत, असे आम्ही मानतो. भले ते कोणीही लिहो, त्याचे भलेबुरे मुख्य संपादकांच्याच खात्यावर जमा होणार ना!) पण ते अतिशय खुल्या दिलाचे आहेत. दुसर्‍या दिवशी अनेकांनी त्यांच्या ते लक्षात आणून दिले आणि तिसर्‍याच दिवशी त्यांनी सविस्तर खुलासा छापला. म्हणजे - फक्त ‘आम्ही दिलगीर आहोत’ अशी पट्टी नव्हे, तर त्या लेखात काय लिहायला हवे होते आणि काय छापून आले, हे त्यांनी सविस्तर सांगितले... मग, आमची भूमिकाच तशी आहे. वाचकांना सारे काही नीट समजून सांगायला हवे. मागचे-पुढचे-खालचे-वरचे-इकडचे-तिकडचे-सगळीकडचे त्यांना नीट समजले पाहिजे. असो, कार्यबाहुल्यात एवढ्या चुका होणारच. भले नाव मुख्य संपादकांचे असले, तरी ज्यांनी कोणी तो लिहिला, त्याने लिहिल्यानंतर स्वामींनी तो नीट तपासला नसावा. नाहीतर स्वामी अशी चूक करणार नाहीत. आमची खात्रीच आहे. बहुदा, औरंगाबादी त्यांना लेखनिक चांगले मिळत नसावेत.

सकाळी सकाळी अंधार...!
असो. मध्यंतरी या उलाढाली सुरू असताना एका भविष्यपत्राचे बारावे (सॉरी बारावा वर्धापनदिन) साजरा झाला. आता, याला ‘साजरा’ म्हणायचे की नाही हा प्रश्नच आहे. साजरा हा शब्द आमच्याकडे जनरली आनंदाच्या वेळी वापरतात. मराठवाड्यातही तशाच अर्थाने वापरत असावेत, असा आमचा समज आहे. तर, या वेळी भविष्यपत्राच्या वर्दापनदिनी साक्षात मोठ्‌ठ्ठया साहेबांना औरंगाबादी यावे लागले. 
एरव्ही, सध्या धाकटे साहेबच सारे काही सांभाळतात. खरे तर सध्या मोठ्या साहेबांंनी ऐच्छिक संन्यास घेतला आहे म्हणे. चिरंजिवांच्या हाती सुत्रे देऊन ते हरि हरि करण्याच्या मूडमध्ये होते. हा मूड औरंगाबादकरांनी खराब केला. रुपयात अंक विकूनही तब्बल 40 टक्के सर्क्युलेशन कमी झाल्यावर दुसरे काय होणार? बरे, नुकतेच पगारही वाढवून दिलेत. तरीही हा प्रकार? झाप झाप झापले म्हणे..! पण स्टाफ तरी काय करणार? एक रुपयात पेपर दिला तरी लोकांनी रुपया तरी का द्यावा? आणि पेपरात काय वाचावे? यांच्याच बातम्या, यांचीच प्रदर्शने, यांचेच चॅनल आणि यांचेच इव्हेंट. कमी अधिक झाले, तर यांना मदत न करणार्‍यांवर आगपाखड...! त्या बिचार्‍या विष्णू भागवतचे तर नशीबच फुटले. यांनी त्याचे साग्रसंगीत पुराण छापले. ते कमी पडले म्हणून की काय आता गावातल्या सगळ्या बसस्टॉपवर असलेल्या होर्डिंगवर ‘त्या’ बातमीचे कात्रण असलेला अंक मोठ्ठा करून झळकवताहेत... ‘आम्हीही सूड उगवू शकतो’ हे दाखवून देण्याची ही युक्ती लई भारी आहे... मोठ्‌ठ्या जाहिरातदारांनो सावधान. इथून पुढे इतर कोणाला जाहिराती - प्रायोजकत्व द्याल आणि आम्हाला नाही म्हणाल, तर बघून घेऊ... हां...!

कुमारस्वामींचा रविवार
दिव्याच्या प्रथम प्रकाशात न्हाऊन निघताना आम्हाला आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटले, की कुमारस्वामींचा लेख रविवार पुरवणीच्या पहिल्या पानाऐवजी पाचव्या पानावर कसा? पहिले पान म्हणजे स्वामींचा अग्रहक्क. त्यावर कोणी अतिक्रमण करणे त्यांना बरे सहन होईल? पण ही सहनशक्ती त्यांच्यात आली... भोपाळसेठमुळे की कोणामुळे? कोणामुळे का असेना, रविवार पुरवणीचे पहिले पान ही तिकडे ‘रोखठोकी’ची मक्तेदारी आणि इकडे कुमारस्वामींची ‘परदेशवारी’. कुमारस्वामींच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य आहे. ते कायम वैश्विक पातळीवर असते. मग उद्या त्यांनी औरंगाबादच्या गटारांचाही प्रश्न मांडायचे ठरविले, तरी त्यांना युरोपातील बर्मिंगहम परिसरातील गटारांचे वर्णन करावेसे वाटणार. असा वैश्विक दर्जाचा संपादक मराठीत निपजला, हे मराठी सारस्वताचे परमभाग्यच!

18 नारळ तयार...
आम्ही प्रारंभीच म्हटल्यानुसार दिव्याच्या प्रकाशात न्हाऊनही डोक्यात उजेड न पडलेल्या अनेकांचे नारळ देण्यासाठी पहिल्याच महिन्यात नंबर लागले असल्याचे आमच्या तीक्ष्ण कानांनी ऐकले आहे. कोणी पस्तीस हजारी मनसबदार आहे, कोणी तीस हजारी आहे, कोणी बावीस हजारी आहे, अशा खोटेनाटे दावे करून भल्या मोठ्या मनसबदार्‍या मिळविलेल्या पण हाती दारुगोळा अथवा फौजफाटा नसलेल्या मानाच्या गणपतींचा ‘बाप्पा मोरया’ होणार असल्याचे कळते. 
साहजिक आहे, भोपाळसेठनी काढलेला पेपर पत्रकारांचे पगार वाढविण्याच्या हेतूने नव्हे तर त्यांचा धंदा वाढविण्यासाठी काढला. काहीपण दावे करून आपल्या पर्सनॅलिटीच्या जोरावर मिळविलेली पदे आणि पगार प्रत्यक्ष कामात उतरल्यानंतर टिकविणे अवघड जाणार, हे भाकित आम्ही आधीच केले होते. पहिल्या महिन्यातच त्याची प्रचिती आली. चावडीवर उभे राहून लंब्याचौड्या बाता मारणे आणि प्रत्यक्षात काम दाखविणे यात जमीन आस्मानचे अंतर असते, हे सर्वांच्या लक्षात आले असेलच. ‘बाकी सारी खोगीरभरती’ या लेखांकात आम्ही वर्णन केल्याप्रमाणेच सारे काही घडते आहे. जे चांगले घडते आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. या 18 जणांना त्यांच्या वकुबाप्रमाणे काम आणि पैसा मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

पण आता या मुळे दिव्याखाली या 18 जागांची व्हेकन्सी निर्माण होते आहे. ती भरण्यासाठी आता फक्त दुसर्‍या शेटजींचेच घर उरले आहे. तिथून माणसांची आवक आता चांगल्याच वेगाने सुरू झालेली दिसते. त्यामुळे शेटच्या कंपूतही घबराट पसरली असून तेथे नवीनवी माणसे घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत म्हणे. पुणेरी जहागिरीत आणखीही काही चांगली माणसे उरल्याचे आम्हाला कळते. त्यातील दोन-तीन जण लवकरच तीसहजारी मनसबदार म्हणून शेटजींचरणी रुजू होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

बाकी, लेट अस कीप इन टच...