19 मई 2011

ऋषि मुनींचे विष्णु पुराण आणि चक्रधरस्वामींचे लीळा चरित्र !

कोणे एके काळी पृथ्वीतलावर छापील मिडियाची ‘भाऊ’गर्दी झाली होती. ही भाऊगर्दी की ‘खाऊ’गर्दी या बद्दल सांप्रतातही संशोधन सुरू असोन या बाबत पक्की खबर मिळताच आपणांसमोर सादर केली जाईल. पण ते काळी खा खा खाण्याची स्पर्धा मिडियाच्या बाशिंद्यांमध्ये आणि त्यांच्या पोशिंद्यांमध्ये चालू होती म्हणे. कोणी ‘ब्लॅकमेल’ नामक काळी विद्या वापरून धन कमवायचा तर कोणी व्हाईट कॉलर पद्धतीने धमकावून अप्रसिद्ध समाजास प्रसिद्धीचे गाजर दाखवोन धनदौलतीचा स्वामी व्हायचा. यातच काळ जाऊ लागला आणि मालक प्रवर्गाच्या ऐसे लक्षात येवो लागले, की पेपर खपवून किती माल कमावणार? नव्या मशिनरी, न्यूजप्रिंट... ब्ला ब्ला ब्ला... त्यापेक्षा अधिकृतपणे नावांचा गैरवापर करणेस काय हरकत आहे? 

याचि मुहुर्तमेढ रोवली गेली साक्षात पुण्यनगरीत. ज्या नगरीच्या काळ्या मातीत साक्षात शिवछत्रपतींनी सोन्याचा फाळ लावून नांगर चालविला त्याच भूमीत मंडप मारून, स्टॉल उभारोन माल विक्रीस सुरवात झाली. जोडीला नंबर एकची विक्री असलेल्या आपल्याच घरच्या पेपरमुळे पब्लिसिटी काय सांगायची महाराजा? लाव स्टॉल की छाप बातमी. लाव स्टॉल की छाप बातमी. ऐसे करता करता अनेक वर्षे गेली. जन्तेसही पदरचे पैशे खर्चून पेपरवाल्यांच्या उपक्रमाची बातमी वाचणेची सवय लागली. मग पेपरवाल्यांची भूक वाढत गेली. धर बिल्डरला की लाव प्रदर्शन, धर शिक्षणसंस्थांना की लाव प्रदर्शन, धर कोणालाही आणि कर बाजारात उभा अशा प्रकारे पैशाची टाकसाळ उघडल्यानंतर औरंगाबादच्या शेटजींचे या कडे लक्ष न गेल्यास नवल. मग त्यांनीही आपला स्वतंत्र विभागच उघडला. काहीबाही कामे सुरू केली, पण हाताला यश मिळेना.

त्यातच चार वर्षांपुर्वी बारामतीकरांच्या आयपीएलची एकच धूम देशभरात सुरू झाली आणि चोर्‍यामार्‍यांचे पेटंट घेतलेल्या शेटजींच्या वारसदारांनी ही आयडियाची कल्पना उचलली आणि औरंगाबाद महानगरीत एपीएलनामक चेंडूफळीच्या भव्य दिव्य स्पर्धेचा घाट घातला. ग्राऊंड बुक झाले. टिमा निवडल्या. फ्रेंचाईजी मिळविले आणि चारदोन हजारांच्या गर्दीत म्याचा (मॅच) पार पडल्या. तदनंतर हाच खेळ पुण्यनगरीत लावणेचा निर्णय ऋषिमुनींनी घेतला. पण हे बघोन पुण्यनगरीतील मरहट्टे इरेस पडले. जाधवरावांनी आपले सारे प्यादे पणास लावोन रात्रीतून हलकल्लोळ केला आणि ऋषिमुनींना पुण्यानगरीतून काढता पाय घ्यावा लागला. मग पुण्यनगरीत यमपीयेल साजरी झाली. एपीएलच्या आधारदारांना यमपीयेलच्या सवंगड्यांनी साकडे घालणेचा प्रयत्न केला पण काय सांगायचे? पैसे काय झाडास लागतात? विष्णु भगवानांनी तयांस पुण्यनगरीत वित्तपुरवठ्यास विनम्र नकार दिला. ही झाली तीन सालपूर्वीची गोष्ट. पण सापाचा आणि पेपरवाल्याचा डुख काय विचारता महाराजा?

ऐन खाशा समयी औरंगाबादच्या विष्णु भगवानांनी पुणेकरांना (सुरेखा नव्हे) नाराज केले. पुणेकरांची नाराजी किती महागात पडेल, याची भागवत कथा विष्णुपंतांना कशी येणार? पण ही नाराजी भोवली आणि बिंग उघडकीस आलेनंतर भागवतकथेस जी काही जंबो पब्लिसिटी पुणेकरांनी दिली म्हणता महाराजा, की त्याचे नाव ते. एपीएलात येव्हढा मोठ्ठा पैसा खर्चूनही जेवढी जागा मिळाली नाही, ती पुणेकरांनी दिली! ती ही फुक्क्कट...!

इकडे ऋषिमुनींचे वर्तमान काय म्हणता? एरव्ही कोणाच्या कोणाच्या बातम्या मांडीखाली दाबायची त्यांची सवय, पण इथे सगळ्यांच्या मांड्या एकत्र आल्या तरी बातमी दबायचे नाव दिसेना. मग काय करता? नाईलाज म्हणून लावली बातमी. खरे तर ऋषिमुनींच्या आदेशानुसार देशमुखी गप्पा रंगवून विष्णुचा मकरंद शोषण्याचे कार्य कधी काळी पार पडले होते. हे विष्णुपुराण ऋषिमुनींनी मन लावून लिहिले. तयांचे लेखणीधर साक्षात चक्रधरस्वामींना त्यांनी पुराणातील वांगी तळण्याचे उभे आदेश (स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स) दिले होते. स्वामींनी हुजूर हुकमाची पूर्ण पूर्तता करीत लीळाचरित्रे रचिली. ऐसे चार वर्षे चालले. या काळात सारे काही सुरळीत सुरू होते. विष्णुपुराणाचा लाभ म्हणून अनेकांना टाटांचे विनाअश्व रथ देण्याचे मनोरथ रचले गेले. क्यांपेना चालविल्या गेल्या. मराठवाडी देशी नुस्ती धम्माल उडाली होती महाराजा... आणि साक्षात ऋषिमुनींचाच आदेश असलेने कॉलमातील काळ्या पांढर्‍याला सेंटीमीटरचे रेटच लागेनात. तिथे थेट मिटरात भाषा चालू लागली. पेपरवाला हाताशी धरला तर आपले काही वाकडे होत नाही, ऐशा धारणेतून धोरणी विष्णु भगवानांनी हा सारा घाट घातला खरा, पण ....

पण हाय रे दुर्दैवा... कुणा तरी नतद्रष्टाने काहीतरी केले आणि भागवत पुराणाचे मावंदे घालायची वेळ आली. पण आपल्याकडे कायद्याचे एक बरे आहे. करणारा अडकतो. पाठिंबा देणारा निमानिराळा राहतो. राहू देत. राहू देत. पुढच्या एपीएलला नवा फ्रेंचाईजी कसा मिळवायचा या बाबत नुकतीच एक बैठक झाल्याचे आम्हास कळले आहे. हा म्हणायचा व्यवहार. शो मस्ट गो ऑन. गेम शुड कन्टिन्यू. 

आता ऋषिमुनी एकात चार पेपर देणार आहेत. दिव्याचा प्रकाश तीन टप्प्यात पडणार हे कळले, की यांनी चार टप्प्यांची योजना सुरू केली. चौथा पेपर कधी सुरू होणार? दिव्याचा प्रकाश पडण्याच्या चार दिवस आधी...! याला म्हणतात व्यवहार...! असो.. ऋषिमुनींना भागवत पुराणातील मौलिक यक्ष प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ टळण्याच्या शुभेच्छा. नाही तर विकतचे वांधे व्हायचे....!

14 मई 2011

जयललिता यांचे सरकार आले नां...!

१९ एप्रिल २०११ रोजी आम्ही आमच्या लेखनात जयललिता यांचे सरकार येणार याची भविष्यवाणी केली होती. आम्ही केलेले भाकित खोटे ठरत नाही. आमचे नाडी ओळखण्याचे कौशल्य वादातित आहे...! आम्ही बोलत नसतो... आमचे काम बोलत असते. लिंक देत आहोत. वाचून पाहा...
http://borubahaddar.blogspot.com/2011/04/blog-post_19.html

9 मई 2011

'दिव्य' त्रिमुर्ती... बाकी सारी खोगीरभरती...!

आदर्णीय कुमारस्वामी आणि आदरणीय सुधीरशेठ यांनी आपली राजवस्त्रे परिधान केली आणि साक्षात देवगिरीच्या रणभूीवर फेरफटका मारला, तेव्हा शेठना परमसंतोष वाटला. जमवलेली फौज आपापल्या लॅपटॉपसमोर मग्न होती. कोणी पेनड्राईव्ह फॉरमॅट करीत होते तरीही त्यातील व्हायरस जात नव्हते. असे जालीम व्हायरस ‘गुपचुप गुपचुप साईटवरील असतात’, असे आमच्या सल्लागारांनी आम्हाला कळविले. तेव्हा आमच्या मनात कायपण कायपण येऊन गेले. (कार्यालयीन नेटचा वापर कोण कसा करतो, यावर आमचा प्रबंध सध्या तयार असून त्यावर आम्हास लवकरच डॉक्टरेट मिळणार आहे.)

असो. तर रणभूमीवर युद्धाला तोंड फुटण्याची वेळ आली, तरी तशी सामसुमच दिसत होती. पण शेट तशे तयारीचे. कोसळलेले टॉवर उभारण्याचे काम सुरू करून पेपर छापायला लवकर सुरवात करणेचे जिद्दीने ते पण मैदानात उतरून निरीक्षण करो लागले. तेव्हा असे लक्षात आले की जूनशिवाय छापणेच शक्य नाही. 
मग मात्र तयांना टेन्शन येवो लागले. जन्तेचे 1 करोड रुपय्ये त्यांचेकडे जमा आहेत. (50 हजार नोंदणी गुणिले 200 रुपय्ये, करा हिशेब) साला, धंदा करावा तर यांनीच... येवढ्या पैशाच्या व्याजावर छपाईच्या आधीचे सगळ्यांचे पगार निघून खर्चही वसूल होतो ना महाराजा...

तर कुमारस्वामी आणि शेटजी रणभूमीवर अवतरले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की समस्त सेनेत सध्या आनंदीआनंद आहे. लक्कीलॉटरी लागल्याच्या आनंदात प्रत्येकजण आहेत. पण हत्यारांकडे कुणाचे लक्ष नाही. कोणी सांगिलते होते, माझ्याकडे लंबी तलवार आहे, तर तिथे छोटा चाकू निघाला, कुणी म्हणाले माझ्याकडे वाघ मारण्याचा भाला आहे, तर तिथे इडली खायच्या काटा-चमच्यातील काटा निघाला, असेच सगळे वर्तमान होते. काही जणांकडे तर हत्यार म्हणून काय निघावे? दाढीच्या दुकानात वस्त्यार्‍याला लावायला अर्धी कापलेली आणि नंतर फेकून दिल्यामुळे गंजलेली ब्लेड असते ना... ती निघाली...! रेकॉर्ड पाहिले तर त्यात दांडपट्टा असे लिहिलेले होते! असे इथे कायपण कायपण चालले आहे.

मग स्वामी आणि शेटजी संतप्त झाले आणि युद्धाआधीच लढाईची वात पेटली. धाड धाड बाण बरसू लागले. सगळ्यांना पळता भुई थोडी झाली. आधीच ट्रेनिंगमधल्या कॅटागिरींचे टेन्शन आणि त्यात वर ही भर. पण काय सांगू महाराजा, कुमारस्वामी खिन्न झाले, शेटजी हतबल झाले... शेटजी कुमारस्वामींना म्हणाले, ‘काय हे? सोने विकून चिंध्या आणल्या?’ तर ते म्हणाले, ‘मी नाही आणल्या. मी फक्त पिशवी धरली. खरेदी तर दाढीवाल्यांनीच केली. पांढरी दाढी आणि काळीपांढरी दाढी...’ शेटजी भोपाळी स्वरात म्हणाले, ‘मी तुम्हाला मुकादम नेमले होते ना? मग सुपरवायझरवर सोडून तुम्ही मोकळे का झाला? आपल्याला वाचकांची मर्जी चालवायची की अतिशहाण्यांची? (सुपर-अति, वायझर-शहाणे!) 

मग कुमारस्वामी खिन्न झाले. मोठ्या उमेदीने त्यांनी जुना गड सोडला होता. नव्या गडाची उभारणी तर जोरात चालली होती, पण तटबंदीलाच भोके राहिली? खंदकात पाणी नाही. तोफा सज्ज नाहीत. उद्या पाऊस आला तर किल्लाच वाहून जाणार? मग आपण कुठले किल्लेदार, असा प्रश्न कुमारस्वामींना पडला. दाढीवाले तर आपापल्या मठीत सुरक्षित राहतील पण आपले घर उन्हात? मग कसे?

मग त्यांनी सैन्यदलाचा आढावा घेण्याचे ठरविले. एक एक करून सैनिक येऊ लागला आणि शस्त्र दाखवू लागला. काही शस्त्रे तर अशी निघाली, की चिमटीत धरून आणलेली होती... तीन शस्त्रे त्यातल्या त्यात बरी आहेत असा निष्कर्ष शेटजींनी काढले म्हणे. देशमुख, दंडवते आणि सराफ अशी ही शस्त्रेे धारण करणार्‍या तिघांची नावे निघाली. शेटजी म्हणाले, या तिघांनाच ठरलेला तनखा द्या. बाकीच्यांचा फेरविचार करा. 
आणि सदर उठली... भोपाळदिशेला निघोन गेली.

कुमारस्वामी रामदेवस्वामींच्या प्राणायमशिबिराकडे निघोन गेले. 
युद्धभूमी रणरणत्या उन्हात तापलेली होती. 
त्याचे चटके लांबपर्यंत जाणवत होते.... 

लोकमतात थरथराट.....

सांप्रतला महाराष्ट्री घडामोडींना उधाण आलेले आहे. जुन्या-नव्यांचा भेद उरला नाही महाराजा. कायपण कायपण घडू लागले आहे. आता काय करायचे आमच्या सुकृतांनी? खाल्लया मिठाला जागणे राहू द्या पण प्यायलेल्या ग्लासाचे तरी इमान राखून थोडी टिप द्यायची डोंगरधारांनी. पण हाय रे दैवा... हाय रे कर्मा... कॉन्ट्रॅक्ट संपल्याचे कारकुनाकडून कळावे? काय हा पत्रकारितेचा अपमान...! पण या बाबतीत अरूण शौरी यांची बरोबरी झाली म्हणायचे. त्यांना तर गेटवर वॉचमनने सारा हिशेब लिहिलेले पाकिट दिले होते म्हणे...! 

तिकडे सोलापूर देशीही ऐसेच जाहले. तिथे तर निष्ठेचा अर्क असलेले शांताकुमार विराजमान होते... मागची तीन दशके, म्हणजे ऋषिमुनींच्या वयापेक्षा किंचितसा कमी काळ, ते शेटजींच्या शेवेत होते... त्यांनाही उडविले? काय पण हा दैवदुर्विलास...! जुन्या-नव्यात फरक नाही मग इतरांनी बघायचे कुठे? 

बाकी डोंगरधारी मोठ्या जिद्दीचा माणूस. कुणाचं... सॉरी कुणाला... धरायचं हे त्यांनी बरोब्बर कळतं. मग स्पर्धक रनआऊट करता येतो, स्वतःकडे स्ट्राईक घेता येतो आणि धावसंख्या 85 हजारावरून थेट 1 लाख 40 हजारापर्यंत वाढवता येते. म्हणजे साहेबांपेक्षा फक्त 10 हजार रन कमी...! 

अख्ख्या महानगरीतील लोकांच्या मताच्या पाईकांना सरसगट भरघोस वाढ मिळाल्याचे वृत्त आहे. ही वाढ म्हणजे औरंगाबादीच्या काही जणांच्या एकत्रित पगाराएवढी असल्याचे कळते... 25 हजार ते 30 हजारांची वाढ म्हंजे जबरदस्तच की...! ‘अतुल‘नीय शौर्य गाजविणारे आता लाखाच्या घरात पोहोचले, इतरही अनेक जण 90 हजारी मनसबदार झाल्याचे कळते.

इकडे सोलापुरात आमचे परममित्र राजे तर झाले पण तनखा मात्र 35-40चा. काय उपेग महाराजा? येवढ्या पगारात कैसे म्यानेज करायचे? दळण आणायलाही स्वतःलाच जावे लागणार? आणि तिकडे औरंगाबादी सुकाणूधारींना जेमतेम 14-15ची वाढ दिल्याचे ऐकीवात आहे. ते तर ऋषिमुनींच्या जन्माआधीपासोन सेवेत निमग्न... 
असे कसे देवा? 
वाटतो डोंगरधारींचा हेवा... 
उडाणटप्पूंना मेवा 
आणि निष्ठावंतांशी उभा दावा?
हे काही खरे नाही बुवा... 
(जमले की नाही? खेबुडकरांनंतर आता आम्हीच....!!!!! फोन नंबर देऊ?)
काय सुकाणूधारी महाराज? आता तरी ऐका. किती दिवस एकाच शेटजींचे दळण दळणार? शेटजी तरी बदलून बघा... बाबूजी लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी तुमच्याकडे सपत्निक येतात. आम्ही फ़ेसबुकवर पाहिले... पण पगाराचे काय? तुमच्या कामाचा डोंगर खूप मोठा आहे...!

असो, सुकृतांच्या लेखणीचा दम शेटजींना जाणवला नाही, की त्यात दम नाही असे खास रिपोर्टिंग जोडगोळीने केले? युद्ध पेटले की सेनापतींचा कान हलका होतो असे म्हणतात. कोणीही कानाशी लागलो आणि सेनापती ते खरे मानतो. खरा सैनिक युद्धभूमीवर लढत असतो आणि बाजारबुणगे सेनापतींच्या कानाशी लागून धावते समालोचन ऐकवीत असतात.... असते एकेकाच्या नशिबात भारी सुख. पण डोंगरधारींना आता सुला वाईन रिसोर्टमध्ये जाण्यासाठी प्रायोजक शोधण्याची गरज पडो नये, अशी अपेक्षा आहे महाराजा. शेटजींनी तनखा वाढवायची ती याच साठी ना...! 

6 मई 2011

आज आनंदी आनंद झाला...

















किती सांगू मी सांगू कुणाला?
आज आनंदी आनंद झा ऽऽऽ ला... आज आनंदी आनंद झा ऽऽऽ ला...
एकमेकांवर गुरगुरण्यात दंग असताना लोकांसाठी गर्जना कोण करणार? अशी गर्जना करीत अखेर सकाळने मैदानात उडी घेतलीच. याचा आम्हाला अत्यंत, खूप, मनस्वी, मनापासून, प्रचंड, जबरदस्त, अतिशय आनंद झाला.

 मागचे काही महिने औरंगाबादेच रोजचा पेपर कसा काढायचा, याची कसरत करण्यात त्रेधातिरिपिट उडत असताना सकाळने ही हिम्मत दाखवावी म्हणजे काडीपैलवानाने आपल्या किडकिडित दंडातील बेडकुळ्या फुगवत हिंदकेसरीला आव्हान देण्यासारखेच आहे. पण आपल्याकडे लोकशाही आहे ना... इथे असे सगळे चालते! असो. औरंगाबादी होत असलेल्या लढाईत सकाळने सहभागी होण्याचा निर्णय घेतला, हे निश्चितच अत्यंत स्वागतार्ह आहे.

वास्तविक लढाई, चढाई हा सकाळचा स्वभाव नाही. त्यांचे कसे छान चाललेले असते... पोळी, अळुची भाजी, सोलकढी, साधे वरण, पांढरा भात, वर चितळ्यांच्या तुपाची धार... सारं कसं व्यवस्थित झालं पाहिजे. या निमित्तानं तिथं क्रांती झाली आणि साध्या वरणाऐवजी फोडणीची आमटी आणि अळूच्या भाजीऐवजी अळूचे फतफते ताटात आले, यातच सारे काही आले. तुमचे झणझणित मटण तुम्हास लखलाभ...
असो.

पण या निमित्ताने त्यांनी केलेल्या कॉमेंट खरोखरच धाडसी आहेत बरें... ‘एकमेकांवर गुरगुरण्यात दंग असताना लोकांसाठी गर्जना कोण करणार?’ असा एक बेदखल प्रश्न त्यांनी विचारला आहे. हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला आहे की वाचकांना? वाचकांना विचारलेला असेल, तर त्यांची उत्तरे संकलित करण्याची काही सोय केलेली आहे का? आणि स्वतःला विचारलेला असेल, तर त्याचे उत्तर त्यांना सापडले का? 

त्यांना सापडो की न सापडो, आम्हाला याचे उत्तर आता सापडले आहे. ‘लोकांसाठी गर्जना कोण करणार?’ या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडेही नाही. कारण आजपर्यंत लोकांसाठी गर्जना करावी लागण्याचे असंख्य प्रसंग आले पण त्यांच्या नरड्यातून - सॉरी घशातून - गर्जना बाहेर पडलीच नाही... अजित पवारांनी धुडगुस घातला, सुप्रिया सुळ्यांवर आरोपांची बरसात झाली, लवासा सिटीत तर चक्क शरद पवारांचाच स्टेक असल्याची चर्चा रंगली, किती भूखंडांचे श्रीखंड या परिवाराने पुण्या-मुंबईत घशात घातले याची तर गणतीच नाही. आयपीएलमधील भ्रष्टाचार समोर आले. ही सारी प्रकरणे चालू असताना कधी ‘गर्जना’ ऐकू आली नाही. गर्जनाच काय, पण साधी ‘म्याऊ’सुद्धा ऐकण्यात आली नाही बरें...! यांच्या पेपरात साधी एक ओळ नाही. मग लोकांनी ‘स्वार्थासाठी नाही, लोकांसाठी लढणारे दैनिक’ या वल्गनेवर विश्वास कसा ठेवावा? 

कलमाडींना चिरडायचे असेल, विलासराव - अशोकरावांना ओरबडायचे असेल तर जी लेखणी परजली जाते त्यातील शाई पवारांच्या आरोपांच्या वेळी का संपते बरें...! ‘पीडब्लूडी’वाले भुजबळ डोईजड होऊ लागले की ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘टोलनाक्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा साक्षात्कार’ का होतो? सगळीकडे ‘टोल-धाडी’चा धुराळा उठविला जातो. आता निवडणुकीनंतर सगळीच ‘सामसुम’ का बरें...? सध्या हा पवारभक्तीचा अतिरेक इतका लक्षात येतो आहे, की ‘सकाळ’ ऐवजी ‘पवार’ असे नाव पहिल्या पानावर छापले आहे की काय याची शंका यावी ! 

उदय भविष्यपत्राचा... आता याला काय म्हणणार? हे भविष्यपत्र म्हणजे ‘ज्योतिष - भविष्य सांगणारे पत्र’ की ‘भविष्यातील घडामोडींचे भविष्य वर्तविणारे पत्र’? यातील कोणताही अर्थ असो, त्यात काही अर्थ असल्याचे सध्या तरी दिसत नाही...! तरीही स्पर्धेत ‘गुरगुरण्याची’ भाषा करण्याच्या हिंम्मतीबद्दल त्यांचे कौतुक...!

हत्ती आणि लढाईआधीचे मद्यप्राशन...

फार्फार वर्षांपूर्वी, म्हंजे साक्षात ऐतिहासिक महाराजांच्या काळात अनेक प्रसंगी लढाय झडत. किल्ले काबीज होत. निशाणे फडकत आणि सत्तापालट होऊन नवी विटी - नवे राज्य चालू होई. सांप्रतातही ऐसा प्रकार सुरू जाहला आहे की काय ऐसी शंका मनी येणेचे कारण नुकतेच घडले आहे. शेठजींच्या आश्रितांनी नाशिक तीर्थक्षेत्री जाओन लढाई-लढाईचा खेळ खेळल्याचे वृत्त आमचे हाती आले आहे. हे वृत्त ऐकोन आम्हास परमसंतोष जाहला. कारण ये कारणे इतिहास पुनश्च एकवार अवतरत आहे, या बद्दल आमचे मनात यत्किंचितही शंका उरलेली नाही.

जेहत्ते कालाचे ठायी, प्राचीन काळी जेव्हा लढाया होत, तेव्हा एक पक्ष मैदानात असे आणिक दुसरा पक्ष किल्ल्यावर. किल्ल्यावरील पक्षाला नमोहरम करणेसाठी तोफा डागल्या जायच्या. तटाला शिड्या लावून चढाई होयाची... शत्रू मातब्बर असेल तर रात्रीच्या अंधारात किल्ल्याचे दरवाजे उखडोन टाकणेचा प्रयत्न होत असे. आता किल्ल्याचे दरवाजे म्हंजे सामान्य उपसंपादकाची नोकरी थोडीच आहे... उखडली आणि दिली फेकून... किल्ल्याचा दरवाजा म्हंजे महामजबूत काम. खास लाकूड, त्याला लोखंडाच्या पट्‌ट्यांचे आधार आणि वर भरीस भर म्हणोन अणकुचिदार खिळ्यांची पेरणी. ऐसा दरवाजा फोडायचा तरी कैसा? मग ग्रांऊंडावरील राजे आयडिया करायचे. ते हत्तींना मनसोक्त ‘भरारी’ पाजायचे आणि मग असे मस्तावलेले हत्ती अशा दरवाजांवर जबरदस्त धडका देयाचे... 

आता ही ‘भरारी’ म्हंजे काय? तीच तर खास आयडिया हाये ना महाराजा... उस्मानाबाद-ढोकीकडे यास ‘भरारी’ म्हंतात, ठाणे-मुंबईकडे यास ‘ठर्रा’ म्हणतात, बीड-औरंगाबादकडे यास ‘मोसंबी-नारंगी’ म्हणतात... पुण्याकडे यास ‘पहिल्या धारेची’ म्हणतात... तर, शेवटच्या प्रहरात पहिल्या धारेची पिओन हे मदमस्त (हां... आत्ता कळले, हत्तींना ‘मदमस्त’ हे विशेषण का वापरतात...) हत्ती जबरदस्त किल्ल्यांच्या दरवाजावर धडकत राहायचे... मस्तकातून रक्त ओघळून प्रसंगी त्यांचे प्राण जायाचे पण किल्ला सर व्हायचा... ऐसा हा इतिहास...!

ऐशा इतिहासाची पुनरावृत्ती सांप्रतला मराठवाडी होणेची चिन्हे दिसत आहेत. त्याचे ऐसे जाहले, की औरंगाबाद नगरीत एका महाभयंकर युद्धाला सुरवात होणार असल्याचे शिळे वृत्त आहे. या लढाईला आज तोंड फुटेल - मग तोंड फुटेल असे म्हणता म्हणता हे सांगणाराचे तोंड फुटणेची वेळ आली पण युद्ध आणिकही सुरू नाही. नव्या शत्रुपक्षाने तब्बल 45 हजारांची सैन्यनोंदणी केल्याचे वृत्त आहे. मैदानातच नसलेला आणि इतरांवर गुरगुरणेचे आरोप करणारा पक्ष लाखाच्या बाता मारतो आहे पण अतिविश्वसनीय सूत्रांनुसार त्याची शिबंदी फक्त 28 हजाराची असलेचे कळते.

मुख्य शत्रुपक्ष मात्र चिंतित झाला आहे. त्याने नुकताच आपल्या शिलेदारांस वकुबाप्रमाणे पाच हजार ते 15 हजारांचा बुस्टर डोस दिला आहे. त्यामुळे अनेकांचे बाहू फुरफुरू लागले आहेत. जे कॉलेजच्या मुलांचे बाप, ते सेकंड हनिमूनला जाणेच्या तयारीत आहेत, जे शाळेच्या मुलाचे बाप, ते दुसर्‍या मुलासाठी प्रयत्नास लागले आहेत. जे अद्याप बाप नाहीत, ते बाप होणेचे खटपटीस लागले आहेत आणि ज्यांचे अद्यापही काही जुळले नाही, ऐसे लोक आता जुळविणेच्या हिमतीस आले असल्याचे अतिविश्वसनीय वृत्त आहे.

तर आपण कोठे होतो? (ऐसे म्हटले की आपण ज्येष्ठ झाल्याचा समज करून घेता येतो) तर ऐशा मदमस्त हत्तींप्रमाणेच असलेल्या आपल्या दरबारातील हत्तींना ‘वाईन’ पाजण्याची कल्पना सेटजींच्या मनी उतरली. त्यांनी तातडीने सगळ्या किल्ल्यांवरील किल्लेदार, उपकिल्लेदार, सहकिल्लेदार ऐशा खाशा हत्तींना नाशिक तीर्थक्षेत्री पाचारण केले. तेथ ‘सुला वाईन्स रिसोर्ट’ नामक पुण्यस्थळी तयांच्या ‘लक्झुरियस’ तपश्चर्येची सोय करणेत आली होती. तेथ पाऊल टाकताच सर्वांचे भ्रमणध्वनी बंद करणेत आले आणि सर्वांस द्राक्षांच्या अनेक टप्प्यांचे दर्शन लाईव्ह घडविणेत आले. 

याच दरम्यान खास मुंबाईतून आलेल्या सात पुरुष आणि तीन महिलांनी सर्वांचे मनोरंजन करणेसाठी कंबर कसली. नाही.. नाही... तीन महिला म्हणतास गुदगुल्या जाहल्या का? या ‘तशा’तल्या नव्हत्या बरे... मुंबाईतील एका ‘यच्चार कंपनी’च्या त्या सेविका होत्या. तयांनी या पाच-पन्नास हत्तींना ‘गेम’ सिकविले... खेळविले... आणि रोज संध्याकाळी शेटजींनी सर्वांना ‘मदमस्त’ केले. मस्त व्हायचे आणि मस्त डुंबायचे असा कार्यक्रम सलग तीन-चार दिवस चालू होता म्हणे. अश्विनीकुमार डोंगरधारी तर तिथे इतके खुश झाले की आता यापुढे प्रत्येक वेळी (म्हणजे प्रत्येक भाद्रपदात) साथीदारासह (शब्दाचा अचूक अर्थ लक्षात घेणे) इथेच येणेचा निर्णय त्यांनी केला म्हणे. (त्यासाठी सध्या ते प्रायोजकाच्या शोधात आहेत. मुंबाईत दोन-चार जणांकडे त्यांनी खडा टाकलेले कळते)...

असो. तर या तीन दिवसांच्या वास्तव्यात हत्तींना मदमस्त करणेचा यशस्वी प्रयोग शेटजींनी केल्याचे तपशीलवार कळले. विशेष म्हणजे लढाईच्या आखाड्याबद्दल येथ एकही ओळ चर्चा झाली नाही, त्यामुळे सर्व हत्ती मस्त राहिल्याचेही समजते. असेच विविध शत्रू चढाई करोत आणि असेच मदमस्त होणेची संधी पुन्हापुन्हा मिळो असे म्हणत सर्व जण आपापल्या किल्ल्यांवर परतले...

फक्त एकच गोष्ट राहिली... यामध्ये फक्त हत्त्तींचाच विचार झाला. एकाही हत्तीणीला संधी देणेत आली नाही. त्यामुळे 33 टक्के आरक्षणाचा उपयोग काय असा प्रश्न शेटजींच्या गोटात चर्चेला येत असल्याचे कळते...!

5 मई 2011

दास प्रेमाचा... धनी सोलापुरचा...!

आमचा सर्वत्र संचार असतो. कधि आम्ही औरंगाबादेत असतो तर कधी अकोल्यात तर कधी सोलापुरात. त्यामुळे स्वाभाविक सगळ्या बातम्या आम्हाला कळतात. आमच्या प्रेमदास राठोड यांच्याबद्दलच घ्या ना. सोलापूर लोकमतमध्ये काही दिवसापुर्वी औरंगाबादहून प्रेमदास राठोड यांना पाठवण्यात आले. त्यांचे अकोला कनेक्शन खतरनाक आहे. मध्यंतरी ते देशोन्नतीमधे होते. तेथील एका उपसंपादकाने आत्महत्या केल्याचे आपणास आठवत असेलच. त्या प्रकरणी प्रेमदास राठोड यांना बाहेर पडावे लागले. मग ते बाबुजींना शरण गेले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी लोकमत जॉईन केले. या दोन वर्षांच्या काळात औरंगाबादेत ते फारसे काही दाखवू शकले नाहीत. त्यांचा स्वभाव सर्वांना सोबत नेण्याचा नाही. त्यामुळे ते एकटे पडले.
आता खरे युद्ध सुरु होताना मात्र मालकांनी त्यांना सोलापुरी का बरे पाठवले असावे? खरे तर ते सोलापुरात मागेच दाखल झाले. त्यांनी अंकातही बदल घडवून आणले. पण जिथे सोलापूर जिल्ह्यापुरताच अंक काढला जातो तिथे अशा ’महान’ माणसाला का पाठवले असावे? आता प्रेमदास राठोड यांच्याकडे निवासी संपादकपदाची अधिक्रुत जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण त्यांच्या हातात किती सूत्रे राहणार? सोलापूरचे ’मालक, मुद्रक, प्रकाशक’ असणारे ग्रुहस्थ बाबुजींचे खास आहेत. ते यांना किती मोकळीक देणार?
आणि सर्वात महत्वाचा प्रश्न - औरंगाबादेत महायुद्ध पेटत असताना त्यांची रवानगी सोलापुरला का बरे करण्यात आली असावी? तुमचा काय अंदाज आहे? कळवाल?

4 मई 2011

अखेर औरंगाबादमध्ये लोकमत - सकाळ आघाडी स्थापन !

हिन्दी भाषिकांचे आक्रमथोपविण्यासाठी अखेर लोकमत - सकाळ आघाडी आज बुधवारी स्थापन करण्यात आली. या बाबत आजवर फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा सुरु होती. आज यावर अंतीम निर्णय झाला. या अंतर्गत बरेच काही ठरले असल्याचे कळते.
अंतिम निर्णयानंतर सर्वांनी औरंगाबाद - जालना रोडवर केंब्रिज स्कुल समोर असलेल्या काळे यांच्या धाब्यावर सामिष भोजनाचा आस्वाद घेतला. यात दिनकर रायकर, उत्तम कांबळे, चक्रधर दळवी, विवेक गिरिधारी, जयंत महाजन यांच्यासह आणखी काही प्रमुख लोक उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती लवकरच मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे.