30 मार्च 2011

‘बुडती हे जन देखवेना डोळा - म्हणोन हा जनजागृतीचा कळवळा’

जेहत्ते कालाचे ठायी औरंगाबाद महानगरी बडी बांका. येथ रात्रीचे वास्तव्य करौन आम्ही दुसरे दिवसी भले प्रभाती प्रथमप्रहरी बाहेर पडलो. रात्रीचा निवास कोठ म्हणता? येथ सत्यकथन करावे की असत्य हेच आम्हास उमगत नाही. अखेर आम्ही असत्य कथन करतो. आम्ही क्यानाट येरियात आडोसा शोधून रात काढिली. येथ आम्हास बरेच साक्षात्कार जाहले. प्रभातसमयी उठोन आम्ही प्रभात फेरीस बाहेर पडलो. विविध येरियांमध्ये फिरलो. विविध जणांशी चर्चा केली. हाती आलेले निष्कर्ष बहुत धक्कादायक वाटले. ये महानगरीचे नारदकुलोत्पन्न जमातीविषयी कळवळा म्हणोन काही निरीक्षणे सादर करणेचे ठरविले.

पहिले हे की ‘दिवा जळू दे सारी रात’ म्हणता सध्या ‘दिव्याच्या राकेला’साठी मनमानी रेट देणेचा जो धडाका सध्या लागलेला आहे, त्या पार्श्वभागीची कारणमिमांसा लै भारी आहे ऐसे वर्तमान आहे. मुदलात सध्या राकेलावर इतर दुकानांत भयंकर नियंत्रण. निळे राकेल - पांढरे राकेल ऐसा भेद. तेथ सध्या काळे राकेलचा बाजारही मोठा चालू असलेचे वर्तमान दूरदेशीच्या सेठजींना लागले आणि तेणेकरून ऐसे ठरले की ऐशा काळ्या राकेलाची विच्छा मनी धरावीही लागो नये ऐसा समस्त नारदकुलोत्पन्न सद्ग्रहस्थांना राकेलाचा भरमसाठ कोटा वाढवून देयाचा. तेसाठी रेशन कार्डाचीपण सक्ती करावयाची नाही. येकदा का हे राकेल कोटा मंजूर जाहलेले सद्ग्रहस्थ रिंगणात उतरले की मग फुडे काय म्हाराजा?

मुदलात गोष्ट ही की कोब्र्यासारखे डोळे असणारे ग्रहस्थ मुंबैत वापस जाणार आणिक शिवरायांच्या पावन भूमीतून आलेले काळीपांढरी दाढीवाले तेथ परतणार. तनख्याची बोली यांणी केली आणिक देणार ते ग्रहस्थ म्हंजे शेठजी. तेन्चे पाशी राकेलाचा वाढीव कोटा देणेखेरीज पर्याय तर नव्हता पण तेची वसूली करणेची भारी स्कीम आहे ऐसे ऐकूण आहोत. ती ऐशी, की हळो हळो राकेलाच्या वाढीव कोट्याची याद करोन देत ते कोट्याची किंमत वसोल होत नसलेली तक्रार सुरू करोन देयाची. फकस्त वर्तमान सांगोन ये समयी चालते काय, ऐसे वार्ता करीत भविष्याचे भेव दाखवित ये नारदकुलोत्पन्नांना मार्केटी बाहेर उतरवून वर्तमानासोबतच महसुलाचीही टार्गेट देयाची आणि ऐशा प्रकारे वाढीव कोट्याची वसुली सुरू करावयाची.

ऐसे केल्याने जे नारदकुलोत्पन्न ऐसे करू शकतील तयांचा टिकाव लागेल आणिक जे ऐसे करू शकणार नाही अथवा करणेस नकारघंटा वाजवितील तेंणा दाखविणेस औरंगाबाद महानगरीत बरेच रस्ते अस्तित्वात आहेत, ऐसे वर्तमान आहे. ऐसी नाकाबंदी जाहलेवर मग फुडे काय? तयांचा राकेलाचा कोटा 33 - 50 - 66 प्रतिशताने उतरविण्याचा. ऐसे केल्याने एका फत्तरात कितिएक जायबंदी होतील? अस्मादिकांनी तेचीही मोजदाद केली. पहिले जायबंदी होतील सध्याचे शेट किंवा मालक. मग जायबंदी होतील हे नारदकुलोत्पन्न. हे दोघांचे जायबंदी होणेमुळे दिव्याची वात मोठ्ठी होऊन पेटून भरपूर प्रकाश फाकवेल. उदईक चालून चार चिमण्या विझल्या तरी काय फिकिर? बाकीचे दिवे मंदावलेने हा दिवा भक्क दिसेल.

बरे, भक्क दिव्याला ह्या विझलेल्या चिमण्यांचीही फिकिर करणेचे काम नाही, कारण कठिण प्रसंग येता झाड सोडून गेलेल्या चिमण्यांना परत आपल्या फांद्यांवर कोण बरे बसो देणार? ऐशी देशोधडीला लागणेची येळ दूरदेशीच्या नारदकुलोत्पन्नांवर आलेचे ऐकीवात असोन तयाचे अनुभवकथनही अस्मादिकांनी श्रवण केले. ऐसे सारे कळो आले असता आपलेच ज्ञातीबांधवांची ‘बुडती हे जन देखवेना डोळा - म्हणोन हा जनजागृतीचा कळवळा’ ऐसी आम्हची गत जाहली आहे.

ये संदर्भात औरंगाबाद महानगरी आज निमंत्रणे धाडणेत पुढाकार घेताना दिसणारा कोणीही महाभाग फुडे येथ दिसणेची चिन्हे नाही. उदयीक भानगड उत्पन्न जाहलीच तर या महाभागांचे काय जाणार? तयांची पत्नी कमावती आहे. आणिक विचारवंतांची जातकुळी येच लक्षणावरोन वळखता येते. आठवून पाहा - जे जे समाजवादी - कमुनिष्ट विचारवंत होऊन गेले तयांचा सोताचा पोटापाणीयाचा धंदा काय व्हता? कायपण नव्हता. तयांचे पत्नीमहोदयांची राशी सिंव्ह असलेकारणाने आणिक त्या शिकार करोन खाद्य आणित हे विचारवंत फडशा पाडीत. एशे भाग्य समस्त नारदकुलोत्पन्नांस कोठे? 

डोंगर हमेशा दुरूनच हिरवे असतात आणिक चढताना काटे बोचतात. पायीचे जोडे मजबूत असलेस मात्र काटे बोचू नयेत...
इति.
लेखनसीमा.

आम्हास खेद वाटतो...

मित्र-मैत्रीणींनो,
आपल्या वाढ्त्या सहकार्याबद्दल आभार. पण खेदाने नमूद करावेसे वाटते की काही लोक आमच्या blog वर अप्रिय भाषेत प्रतिक्रिया पाठ्वीत आहेत. त्या मुळे आम्ही आमची प्रतिक्रियांची लिंक बंद केली आहे. आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्या ई मेल वर पाठवाव्यात. आपण आम्हाला माहीती सुद्धा पाठ्वू शकता. आपले नाव गोपनीय राहील याची खात्री बाळगा. मात्र ही माहीती कुणाची अकारण बदनामी करणारी असू नये.
पुन्हा एकवार आभार.

29 मार्च 2011

‘आजकल कोईभी आताय हौर होटेलको चलो बोलताय. तो हम उस्को अम्बॅसडेरमे पहुंचाते है।

पुनश्च एकवार जेहत्ते कालाचे ठायी औरंगाबाद महानगरी आम्ही दस्तुरखुद्द दाखल होवोन अवलोकनार्थ दौरा करीत असता आम्हच्या चक्षुंसमोर येत असलेली दृष्टे पाहोन मन उल्हसित जाहले. मर्‍हाटी पत्रपंडितांच्या मुलाखती चक्क पंचतारांकित होटेलांत होत्साते पाहोन मर्‍हाटी वृत्तपत्रसृष्टीची बाळशास्त्र्यांपासोनची खडतर वाटचाल आमच्या अंतःचक्षुंसमोरून तरळोन गेली. मर्‍हाटी चित्रपट म्हंजे प्रभात थेटर (पुण्यातले), मर्‍हाटी पिक्चर म्हंजे 10 लाखाच्या रिफंडसाठीचा लो बजेट पिक्चर, मर्‍हाटी अभिनेत्री म्हंजे 45-35-45 ची फीगर, मर्‍हाटी पुस्तक म्हंजे साडेपाचशेची आवृत्ती अशी मर्‍हाटीची सवय लागलेली. तेव्हा थेट फाईवस्टारात मुलाखती म्हंजे लै भारी. आता, ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांना कशायपेयाचाही घोट मिळाला नाही, ही बाब विसरायची आणि त्यांच्या मुलाखती घेणार्‍यांची सोय फाईव्हस्टारात लागल्याबद्दल (आणि पुढे मागे समस्त मर्‍हाटी पत्रपंडितांचीही सोय अशा होटेलात व्हावी अशी मनोकामना करीत) समाधान व्यक्त करावयाचे, झाले.
********
तर, आम्ही कोठे होतो? (असा प्रस्न विचारला की उगाचच आपण ज्येष्ठ झाल्यासारखे जाणवते.) सध्या मर्‍हाटी वृत्तपत्रसृष्टीत (सृष्टी कसली? हे तर वाळवंट.) कुमारस्वामींच्या खलित्याने खळबळ माजलेली आहे. आम्ही दस्तुरखुद्द मराठीचे दिव्य पार पाडणार आसोन सध्या या दिव्याचा प्रकाश फक्त औरंगाबाद नगरीच्याच नशिबात असोन आगामी दोन संवत्सरात त्याची आभा अखिल महाराष्ट्रदेशी फाकेल, असा विश्वास स्वामींनी आपल्या एसेमेसच्या द्वारे आपल्या भक्तगणांना दिला. या दिव्याच्या प्रकाशाच्या शोधात आम्ही औरंगाबाद महानगरीत पोहोचलो तेव्हा यष्टीस्टँडवर, रिक्षा स्टँडवर, कोपर्‍याकोपर्‍यावर, गटागटाने, अटीतटीने या दिव्याच्या प्रकाशाचीच चर्चा चालू होती. आजवर येथल्या दिव्यांनी पाजळलेल्या प्रकाशाचा विसर पडावा अशी ही धक्कादायक घटना होती !
आम्ही यष्टीस्टँडवर उतरोन रिक्षात बसलो आणि रिक्षावाल्यास म्हटले, हॉटेलात चला. त्याने एकवार आमचेकडे निरखून पाहिले आणि म्हटले, ‘तुम पत्रकार है क्या?’ आम्हास धक्का बैसला. आल्याक्षणी आमच्या पत्रकारितेची कीर्ती इथवर पोहोचावी? आम्ही मोठ्या मायेने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणालो, ‘हौ। तुमको कैसा समझ्या?’ तर तो म्हणतो कसा, ‘आजकल कोईभी आताय हौर होटेलको चलो बोलताय. तो हम उस्को अम्बॅसडेरमे पहुंचाते है। तुम्हारीभी हालत वैसीच दिखरी है, इसलिये अंदाज किया।’ आम्ही थोडेसे खिन्न जाहलो. पण म्हटले, चला - दिव्याची वातावरणनिर्मिती तर चांगली जाहली आहे.
हाटेलात पोहोचलो. शेजारीच रामा इंटरन्याशनल होते. आम्हास जुनी आठवण जाहली. आदर्णीय शिसेप्रबाठा साहेबांच्या (म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या) ‘घुबड’ या शब्दावरून उडालेले रणकंदन आठवले. त्या पवित्र भूमीवर आमच्या बांधवांचे सांडलेले रक्त आठवले. आम्ही दस्तुरखुद्द तेथ पोहोचलो. त्या रक्तलांच्छित मातीचा टिळा आमच्या कपाळी लावला. आम्चे काही बांधव ज्या झाडावर प्राणरक्षणार्थ चढून बसले होते, त्या पवित्र ज्ञानवृक्षाचे आम्ही दर्शन घेतले. मनोमन पत्रपंडितांच्या जमातीचा जैजैकार केला आणि पुनश्च अम्बॅसडेरमध्ये आलो. आमच्या मातृदेवतेला स्मरोन सांगतो, अशा होटेलात येणेची मराठी पत्रकारांची हिम्मत फक्त पत्रकार परिषदेच्या वेळीच होते. अशा वेळी दमबाजी करोन चार पेग जादा रिचविण्याचा हट्टही आम्ही कधी काळी पुरा केला आहे, अन्यथा अशा ‘आहे रे’च्या होटेलावर आमचा ‘बहिष्कार’ असतो.
********
तर मंडळी, आम्ही कोठपर्यंत आलो होतो? (असा प्रस्न विचारला की पुन्हा एकवार उगाचच आपण ज्येष्ठ झाल्यासारखे जाणवते.) आतमध्ये टेबलावर दोन दाढीवाली आणि दोन बिनादाढीची माणसे बसलेली होती. एक दाढी पांढरीशुभ्र होती. दुसरी अर्धी पांढरी झाली होती. उरलेल्या बिनादाढीच्या दोघांपैकी एकाचे डोळे ‘कोब्र्या’सारखे भेदक होते तर दुसरा तसा शामळू वाटत होता. म्हंजे, तसा धीटपणाचा आव आणणे चालू होते पण आमची नजर म्हंजे पारखी नजर. एका झटक्यात आपण सगळे वळखतो. पैलाझूट आम्ही फूल पांढरी दाढीवाल्याला सवाल केला, (खरे तर येव्हडे दिवस हे लोक मुलाखतीवर मुलाखती घ्येत होते. पैल्यांदाच त्यांचेवर असा प्रसंग गुदरला. एक तर सगळ्यांना अरध्या अरध्या घटिकेचे अंतर ठेवोन पाचारण केलेले होते. आधीचा  लवकर उरकला व्हता तर नंतरचा नेहेमीप्रमाणे जरा लेट पोहोचणार होता) 

********

तर आम्ही सवाल केला, ‘महाराष्ट्रदेशी कैसे काय येणे केले?’
पांढरी दाढीवाला : सेठ म्हणाले औरंगाबादी स्वारी व्हावी. दख्खन दिग्विजयाची गरज आहे. सोबतीसाठी दख्खनचे शिलेदार निवडा आणि कामाला लागा. म्हणोन आम्ही येणे केले. निवडेलेले तीन हीरे आपल्या समक्षच आहेत.
आम्ही : या तिघांना हीरे म्हणता?
पांढरी दाढीवाला : सेठ म्हणाले, काम सुरू होईपर्यंत असेच म्हणायचे.
********
मग आम्ही कोब्र्यासारख्या डोळेवाल्याकडे वळलो.
आम्ही : आम्ही ऐकतो ते खरे आहे?
कोब्रा : खरे आहे.
आम्ही : काय खरे आहे?
कोब्रा : तुम्ही ऐकता ते.
आम्ही : आम्ही काय ऐकतो?
कोब्रा : ते तुम्हासच ठावूक.
आम्ही : अशी उडवाउडवी चालणार नाही.
कोब्रा : एवढी वर्षे आम्ही हेच केले.
आम्ही :  थेट उत्तर द्या.
कोब्रा : आमच्या कानाच्या वर कोणी गेले तर आम्हास चालत नाही. म्हणोन आम्ही आमची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला.
आम्ही : इथे उंची वाढेल असे वाटते?
कोब्रा : सेठजी म्हणाले, वाढवून देतो.
आम्ही : तिथे उंची नव्हती?
कोब्रा : होती ना.
आम्ही : मग?
कोब्रा : आणखी हवी होती.
आम्ही : हा हावरटपणा नाही का?
कोब्रा : नाही.
********
हे अवघड प्रकरण असल्याचे पाहून आम्ही पुढे वळलो, तर काळी-पांढरी दाढीवाले कोणाशीतरी मोबाईलवर बोलत होते. सकाळी निघणार्‍या वृत्तपत्राच्या कोणा महत्वाच्या व्यक्तीशी त्यांची चर्चा सुरू असल्याचे लक्षात येत होते. बामणाची कोंडी करायची, असे काही तरी बोलणे सुरू होते. तोवर म्हटले चौथ्याशी बोलू. ते शामळू गृहस्थ आम्ची चर्चा कान टवकारून ऐकत होते. या सर्वांमध्ये ते कसे पोहोचले असतील, याची उत्सुकता आम्हाला होती. आम्ही त्यांच्याशी चर्चा सुरू केली.
आम्ही : येथे कैसे?
शाम : आम्हीही तोच विचार करीत आहोत.
आम्ही : म्हंजे?
शाम : आमची इच्छा होतीच. तिथे आम्हास सार्‍या कामांवर तुळशीपत्र ठेवावे लागले. काहीच काम उरले नव्हते. पान चार लावणे किती वेळ चालणार? उरलेला वेळ टीव्ही पाहात होतो. स्टार माझावर या पेपरची जाहिरात पाह्यली आणि अर्ज केला. लाटरी काढण्यात आली आणि आमचे नाव निघाले.
आम्ही : आम्हास वाटले आपली पत्रकारितेतील योग्यता वगैरे पाहून, मराठवाडा - नवभारत वगैरेतील अनुभव पाहून, पत्रकारितेतील योगदान जोखून येथे घेतले असावे...
शाम : आम्हीही बाहेर तेच सांगतो.
आम्ही : इथे पुढे काय?
शाम : शेटजी सांगतील तसे.
आम्ही : किती दिवस?
शाम : शेटजी ठेवतील तसे.
आम्ही : पुढे काय?
शाम : (डावीकडे - उजवीकडे पाहात, ओठांवरून जीभ फिरवत) पुन्हा सद्गुरु दर्शनाला जाऊ.
आम्ही : मानेपाटलांना तुम्ही रोखले?
शाम : (काळी पांढरी दाढीवाल्याकडे पाहात) नाय बा.
आम्ही : बाहेर चर्चा आहे...
शाम : हो. खरे आहे.
आम्ही : काय?
शाम : चर्चा आहे, हे खरे आहे.
********
इथे फार काही हाती लागत नाही, हे पाहून आम्ही निराश झालो. एव्हाना काळीपांढरी दाढीवाल्याचे मोबाईलवरून बोलणे संपले होते. त्यांच्या मुखकमलावर हास्य फाकले होते. टेबलवरील बेल शोधत ते वेटरला बोलावण्याच्या धडपडीत असल्याचे आम्हाला जाणवले. त्यांना त्या वेळी काय हवे असेल याचा कयास आम्ही बांधला आणि जोरात आवाज दिला - ‘पिंट्या’... तसा होटलातील वेटर धावत आला. काळीपांढरी दाढीवाल्याने आमच्याकडे कृतज्ञतेने पाहिले. अशी प्रसंगानुरुप मदत करणे त्यांना खूप आवडायचे, हे आम्हास पुण्यातच कळले होते. पैल्याझूट मदत करोन आम्ही पैली फेरी जिन्कली!
********
मग आम्ही त्यांच्याकडे वळलो -
आम्ही : इकडे कसे?
काळीपांढरी : सूड घ्यायचाच...
आम्ही दचकलो. मराठी तमाशापट पाहतो आहोत की काय असेच आम्हास वाटले. आम्ही पुन्हा विचारले...
आम्ही : काय म्हणालात?
काळी पांढरी : सूड घ्यायचाय. या ब्राम्हणशाहीचा सूड घ्यायचाय.
आम्ही : पण तुमच्या शेजारी ब्राह्मणच आहेत ना...
काळीपांढरी : या ब्राम्हणांचा नाही.
आम्ही : मग?
काळीपांढरी : त्या ब्राम्हणांचा.
आम्ही : पण ते तर छत्रपतींचे वंशज...
काळीपांढरी : पण ते आतून ब्राम्हणच आहेत.
आम्ही : तुम्हाला कसे कळले?
काळीपांढरी : आम्हाला पुण्यात बोलावून उघडे पाडले.
आम्ही : पण तुम्हीच ब्राम्हण अब्राम्हण वाद सुरू केला असे म्हणतात.
काळीपांढरी : हा वाद कहाडला कोनी? त्यांनीच ना? मी औरंगाबादी दरबार यशस्वी केला. दिग्विजयाच्या पताका रोवल्या, सगळीकडे माझा जैजैकार चालायचा. लोक पोग्रामला बोलवत. मी त्यांच्या बातम्या छापून देई. इथे घर सुद्धा बांधून झाले होते.
आम्ही : पण औरंगाबाद दरबार तर उरकुडे, फटाले, महाजन, जोशी, वरकड यांच्या जोरावर जिंकला म्हणतात.
काळीपांढरी : ते खोटे आहे. मीच जिंकला.
आम्ही : मग पुण्यात काय झाले?
काळीपांढरी : मला ब्राम्हणांनी उघडे पाडले. मला काही कामच ठेवले नाही.
आम्ही : म्हंजे या शाम सारखेच ना?
काळीपांढरी : हो.
आम्ही : म्हंजे या कोब्र्यासारखेच ना?
काळीपांढरी : हो.
आम्ही : मग अशी बिनाकामाची माणसं जमून तुम्ही लोकांच्या मताला धोबीपछाड देणार?
काळीपांढरी : मी असं कधी म्हणालो?
आम्ही : मग. तुम्ही इथं काय करताय?
काळीपांढरी : भगदाड पाडतोय. मला बाहेर काढता का? मी तुमचा सूड घेणार.
आम्ही : पण त्यांनी तुम्हाला काढलं? आम्हाला वाटलं की तुम्ही बेलापुरात सुखी होता.
काळीपांढरी : मी ही सगळ्यांना तेच सांगितलं. कहाडले जायच्या आधी  पण खरं मलाच माहिती. मी आता सूड घेणार.
आम्ही : पण उत्तम कांबळे तुमच्या डोक्यावर आल्यामुळे दलिताच्या हाताखाली काम कसे करायचे म्हणून तुम्ही सोडले असेही म्हणतात. कांबळे यांच्याशी तुम्ही आधीपासूनच उद्धटपणे वागत होता असे ऐकिवात आहे.
काळीपांढरी : हो खरे आहे. नाही नाही खोटे आहे.
आम्ही : असो. इथे तुमची स्ट्रॅटेजी काय?
काळीपांढरी : काहीही झाले तरी सकाळी निघणार्‍या पेपरची माणसे फोडायची. सूड घ्यायचा. त्यांना जन्मात ऐकला नाही येव्हडा पगार द्यायचा. ते येतील.
आम्ही : पण एवढा पगार कायम राहणार? या मालकाची ख्याती वाईट आहे म्हणतात. आधी खूप पगार देऊन ते बोलावून घेतात. मग पगार 66 टक्क्यांनी कमी करतात किंवा घरी जायला सांगतात. जागरणवाल्यांचे खूप वाईट हाल केले म्हणे त्यांनी.
काळीपांढरी : तो त्यांचा विषय आहे. मला कहाडले... मी ह्यांचा सूड घेणार. त्यांच्या पगाराचे त्यांना माहीत. पुढे काय करायचे हे ज्याने त्याने ठरवावे. मी पगार वाढवायला बसलो आहे. द्यायला नाही. द्यायचे काम शेटजींचे.
आम्ही : पण लोक मतावर काही परिणाम? तेथून काही रसद मिळवणार?
काळीपांढरी : फारशी शक्यता नाही. तिथं कुंपण घातलंय. राखणदार बसवलेत. पेंड - चाराही चांगल्या क्वालिटीचा घातलाय. त्यामुळं तिथून रसद मिळायची नाही.
आम्ही : पण चांगली रसद तिथंच आहे, कारण दिवे लागायच्या चर्चेआधीच त्यांना कुणकुण लागली होती. म्हणून त्यांनी सगळी रसद पळवून कडीकुलपात बंद केली म्हणतात. बाहेर आता कचराच उरला आहे, अशी चर्चा आहे.
काळीपांढरी : असेल. मला जेव्हडे जमेल तेव्हडे करणार. सूड घेणार. ब्राम्हणशाही नष्ट करणार.
आम्ही : पण तुमच्या आयुष्याच्या जोडीदार ब्राह्मण आहेत...
काळीपांढरी : तो माझा वैयक्तिक विषय आहे.
आम्ही : पण तुम्ही इथे किती काळ टिकणार?
काळीपांढरी : मला त्याची पर्वा नाही. माझी बायको कमावती आहे. मला घरची चिंता नाही. ठेवले तेव्हडे दिवस राहणार. नंतर निघून जाणार. त्याची मला सवय आहे. पण मी ब्राम्हणशाही संपवणार.
आम्ही : मग आता अर्थक्रांतीचे काय होणार?
काळीपांढरी : कसली अर्थक्रांती?
********
ह्या टीमला शुभेच्छा देऊन आम्ही बहिर्गमन करीत होतो, तर होटेलच्या बाह्यभागात गर्दी जमली होती. प्रेस कान्फरन्समध्ये गिफ्ट वाटताना जशी झुंबड उडते तशी झुंबड तिथे होती. आम्ही लक्ष देओन पाहिले तर ते तनख्याच्या आकड्याचे व्हावचर होते. ज्याच्या हाताला जे व्हावचर लागले, ते घेओन त्याने आत जायचे. त्याला तेव्हडा पगार मिळणार, अशी स्कीम होती !
आम्ही तेथोन सकाळी निघणार्‍या वृत्तपत्राच्या ऑफिसात गेलो. तेथे ‘मोठे लोक’ सचिंत मुद्रेत बसले होते. काय करावे हा पेच त्यांचे समोर होता. भोवती दिव्यात न खपलेला माल बसलेला होता. ह्यांना घेऊन उद्याचा पेपर कसा काढायचा या चिंतेत बसले असताना एकाने पर्याय सुचवला - ‘सर, पुण्यात तक्रार करा. माणसे वाढवायला सांगा.’ त्यांनी तातडीने पुण्यात फोन केला. माणसं कमी असल्याची तक्रार नोंदविली. आता त्यांचे टेन्शन संपले होते. उद्याचा अंक कसाही निघाला तरी आता चिंता नव्हती. कसाही पेपर काढला तरी विकून दाखवतो या बोलीवर तिथे ‘सरकुलेशन म्यानेजर’ पदावर जॉईन झालेल्यांनी ‘चॉलेंज’ स्वीकारले होते. वाढलेल्या रेटने जाहिराती मिळेनात म्हणून तेथील ‘आड म्यानेजर’ सोडून गेले होते. खरे तर त्यांनाही काळीपांढरी दाढीवाल्यानेच फितवल्याची चर्चा जोरात होती. तिथे अशी ‘चंमतग’ सुरू होती.
मग आम्ही ‘लोकांच्या मता’च्या ऑफिसात शिरलो. तिथे सुकाणूधारी व्यक्तिमत्व घाईघाईने केबिनमध्ये - केबिनबाहेर अशा चकरा काटत होते. आत जाताना त्यांच्या मुखकमलावर टेन्शन असे. बाहेर येताना मुखकमल फुललेले असे. बाहेर जमलेली तमाम जन्ता त्यांनी जाहिर केलेले आकडे ऐकू खुष होत होती. ज्यांना काढायची लायकी त्यांना धा धा हजाराची तनखावाढ मिळाल्यावर काय होणार? आणि ज्यांना जपून ठेवायचे त्यांना 30-40 हजाराची तनखावाढ मिळाल्यावर ते कशास दिवे ओवाळून घेणार? ऐशा प्रकारे लोकांच्या मतातील मतमतांतरे जाणून घेतल्यानंतर आम्ही या महानगरीतील जवळजवळ सर्व पत्रपंडितांच्या कार्यालयास सदिच्छा भेटी दिल्या. काही एफेम च्यानेलनाही (म्हंजे फोक्या मारु) भेटी दिल्या. सर्वत्र आनंदीआनंद दिसत होता.
अखेरीस रात्री आम्हास क्षुधाशांतिची गरज वाटो लागली. मनस्वी इच्छा फाईव्ह स्टारात जाण्याची होती पण तेथ आम्हास फुकटात कोण हादडू देणार? तेव्हा असेच एक टपरी होटल निवडले. आमचे सोबत कोणीच नव्हते पण आम्ही सर्वांसोबत होतो. तेथ अनेक जण पत्रपंडित आम्हास नजरेस पडले. माने सरकार, जेवळीचे सरदार, बोलकढीकार, इन्शुरन्सचे येजंट ऐसे अनेकोनेक जण ‘दो आंखे बारा हात’ प्रमाणे ‘दो बॉटल बारा हात’ करीत बसले होते. सर्वांच्या तोंडी काळीपांढरीला पटवायचे कैसे याचीच चर्चा होती. कोणी म्हणे त्यांना अर्थपूर्ण सहकार्य आवडत असते. त्यातूनच त्यांनी पुण्यात - औरंगाबादेत प्रापर्टी कमावली. नाही तर नुस्त्या कोरड्या पत्रकारितेत काय व्हणार? दुसरा एक म्हणे - माझ्या बिटाचा सगळा हिशेब मी त्यांन्ला देईन. तिसरा म्हणे - ..... असे सगळे म्हणणे सुरू होते...
*********
तर औरंगाबाद महानगरीत ऐसे वर्तमान आहे. कोण कोठे आहे, कोण कोठे नाही या बाबत चर्चेला उधाण आलेले आहे. थकलेले घोडे आणि सायडिंगला पडलेले इंजिन जोडून ही 22 डब्यांची रेल्वे ओढण्याची कसरत होणेची शक्यता येथ दृष्टीपथात येते आहे. तेणेमुळे ही टसल न राहता फिक्स म्याच जाहली की काय अशी चर्चाही सांप्रतला जोर धरोन आहे.
दोन्ही सेठ एकाच समाजातील बंधू आहेत. तेणेमुळे आपल्याच समाजबंधूस त्रास देवोन कैसे भागणार म्हणोन दिल्लीदरबारच्या शेटजींनी मध्यस्थ राहोन सलुख घडविला आणि ऐसे धोरण ठरविले की परस्परांना त्रास देणे नाही. नव्या सेठनी जुन्या शेटच्या शहरात तर जायचे आणि मराठीतून समाजप्रबोधन तर करायचे पण फार जोर लावायचा नाही. परस्परांच्या माणसांस हात लावायचा नाही. बाहेरची माणसे भरघोस पगार देऊन बोलावायची. मार्केटमध्ये इतर पत्रांची खिजगणती ठेवायची नाही. त्यांना संपवायचे आणि नंतर जागरण पॅटर्नने भरती झालेल्या बाशिंद्यांना 30-40 टक्क्यांवर आणून ठेवायचे. ते वेळी लोकांच्या मतानेही तयांना आश्रय देण्याचा नाही. ऐसे ठरोन मराठी पत्रपंडितांचे हाती मोठ्ठे भोपळे देण्याचे ठरविले जात असलेले वर्तमाण आहे.
*********
संबंधितांनी योग्य काळजी घ्यावी. कारण मोठ्यांच्या लढतीत आणि सूडाच्या प्रवासात बळी फक्त सामान्यांचेच जातात हा रामायणापासूनचा इतिहास आहे असे आम्ही ऐकोण आहोत...
कळावे, लोभ नसावा.

23 मार्च 2011

किरण मोघे हे नाव कधी ऐकलंय?

किरण मोघे हे नाव कधी ऐकलंय? नसेलच. हे तसं खूप गाजलेलं नाव नाही. पण सध्याच्या औरंगाबादी पत्रकारितेत या नावाला बरंच महत्व आहे. भास्कर ग्रुपने मराठीत पेपर काढायचा ठरवल्यानंतर किरण मोघे यांना औरंगाबादेत पाठविण्यात आलं. ते हिंदी भास्करमध्ये मोठी जबाबदारी पार पाडत. मागचे सहा महिने ते औरंगाबादेत होते. तिथे बसून त्यांनी औरंगाबादच्या पत्रकारितेची खडा न्‌ खडा माहिती काढली आणि वरिष्ठांकडे पाठविली. त्यांच्या माहितीच्या आधारावर भास्कर ग्रुपने व्यूहरचना ठरविली. त्यानुसार आजच्या हालचाली सुरू आहेत.

तर सांगण्याची गोष्ट ही, की हे मोघे महाशय दोन दिवसांपूर्वी लोकमतला जॉइन झाले! आता बोला...! आज काल नैतिकतेच्या आयचा घो च झाला आहे म्हणायचं!

एकीकडे केतकरी बाण्याने जमवाजमव सुरू आहे. दुसरीकडे मालकरी बाण्याने सकाळ - सामनाला भगदाडे पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठवाड्यात लोकसत्तेचे भगदाडच शिल्लक आहे, त्यामुळे तिथे पाडण्यासारखे काही राहिलेले नाही. ही पाडापाडी सुरू असताना दर्डाशेठनी भास्कर ग्रुपचा अख्खा पिलरच हलविला आहे. या दर्डा सेठना मानावेच लागेल. आता हे डोके दिल्लीतल्या दर्डासेठचे की मुंंबईच्या की औरंगाबादच्या हे काही आम्हाला अजून कळलेले नाही.

या मोघे गुरुजांनी त्यांनी मुंबईतील डेस्कची सहयोगी संपादकपदाची जबाबदारी सोपविली. वार्षिक 10 लाखांचे पॅकेज त्यांना दिले. म्हणजे महिना साधारण 85 हजार पगार पडला. यामुळे तिकडे विवेकक्षमता कुंठित झाली. कारण तो निधी फक्त 80 पर्यंत पोहोचतो. यांना 5 जास्त मिळाले. आता काम करता? इकडे आड-तिकडे विहीर. आता तर विहिरीवर झाकणही टाकून झाले आहे!

हे मोघे महोदय आज रोजी औरंगाबादी दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनामुळे शेटजींना वाघ मारल्याचे समाधान मिळत असले, तरी त्यांनी खरोखरच वाघ मारला आहे की आपल्या तंबूत उंट घेतला आहे, हे काळच ठरवणार आहे. कारण अग्रवालशेटजीही कच्च्या गुरुंचे चेले नाहीत. शक्यता अशीही आहे की त्यांनीच मोघेगुरुजींना लोकमतात घुसवले असावे! अन्यथा भास्करमधील मोठे पद सोडून हे महोदय इकडे कशाला आले असते? खरे खोटे काही काळाने कळेल. कारण लोकमताने ही स्ट्रॅटेजी विविध पेपरवर चालविली आहे.

बाकी काही असो, या गुरुजींच्या आगमनाने लोकमतात अस्वस्थता आहे. एवढे दिवस एकसंघ वाटणारी लोकमतची टीम या एका निर्णयामुळे थोडीशी हलली आहे. ऐन लढाईच्या वेळी अशी शत्रुपक्षातीलच माणसे आपले नेतृत्व करणार असतील, तर एवढे दिवस लढविलेल्या आघाडीचा काय उपयोग झाला? अशी नैराश्याची भावना त्यांच्यात येते आहे.
या भावनेचा स्फोट झाला तर तिथला निम्मा संघ शेठजी टू शेठजी स्थलांतर करू शकतो!
थोडक्यात काय तर अब लढाई दूर नहीं...

22 मार्च 2011

कुमार केतकर, गिरीश कुबेर आणि इतर...

प्रिय मित्रांनो, 


काही दिवसांपूर्वी कुमार केतकर यांच्याबद्दल गिरीश कुबेर यांनी लिहिलेना एक लेख आम्ही अपलोड केला होता. आम्ही बदनामीसाठी हा ब्लोग चालवत नाही. आज आम्ही औरंगाबाद्च्या दत्ता जोशी यांनी फेसबुकवरून पाठविलेले पत्र येथे प्रकाशित करीत आहोत. वास्तविक कोणालाही दुखावण्याचा आमचाही हेतू नाही. या ब्लॉगवर जे चालू आहे ती निखळ गंम्मत म्हणून घ्यावी, अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे.

मी स्वतः पुण्यात असतो. एकेकाळी मीही पत्रकार होतो. आता कंटेट ऍनालिसिसचा बिझनेस करतो. कोंढवा भागात माझे ऑफिस आहे. मी उल्लेख केलेल्या प्रत्येक शहरांत माझे जुने मित्र आहेत. त्यांच्याकडून मला बित्तंबातमी कळते.

औरंगाबादेतील माझे मित्र तेथील एका दैनिकात काम करतात, एवढेच सध्या सांगतो.

माझी खरी ओळख मी 1 जानेवारी 2012 रोजी देईन. तोवर... जस्ट गेस... टेक इट ईझी...

---------------------------------------------------


काही हितगुज ...



by Datta Joshi on Tuesday, 22 March 2011 at 17:35

पत्रकारितेत कार्यरत असणार्‍या आणि नसणार्‍या माझ्या बंधू भगिनींशी आज मी काही हितगुज करू इच्छितो.




मागील काही दिवसांत औरंगाबादेत नवे वृत्तपत्र येणार असल्याच्या हालचाली मोठ्या वेगाने सुरू आहेत. या नव्या दैनिकात जाण्यासाठी अनेक जण रांगेत उभे होते आणि आहेत. अशा विषयांच्या बित्तंबातम्या इंटरनेटवरील ब्लॉगच्या स्वरुपात येण्यास काही दिवसांपुर्वी सुरवात झाली आणि त्यामुळे वातावरण उगाचच ढवळले गेले. याच संदर्भात आपणाशी हा संवाद.

यातील एका ब्लॉगशी माझे नाव जोडले जात आहे. मागील एका लेखात माझे नाव औरंगाबादेतील पत्रकारांच्या यादीत छापून आले. त्यामुळे ही चर्चा सुरू झाली असावी. ही चर्चा माझे नाव त्यामध्ये आल्यामुळे आहे की त्या पुढे दिलेल्या माझ्या पगाराच्या अपेक्षेमुळे आहे, या बद्दल माझ्या मनात द्विधा मनःस्थिती आहे. पत्रकारितेत परत जायचे नाही, हे ठरवून मी 2005 मध्ये पत्रकारिता सोडली होती. कधी कधी मित्रपरिवारात गमतीने नोकरीच्या गप्पा रंगायच्या तेव्हा मीही तेवढ्याच गमतीने लाखभर पगाराच्या अपेक्षा सांगून टाकल्या. वचने किं दरिद्रता? पण हे सत्य मानून त्याचा संदर्भ देणे खरोखरच अस्थानी आहे. ज्याने कोणी हे काम केले असेल ते योग्य नाही. मात्र एक बाब नक्की, त्या लेखनाची शैली चांगली आहे.

असा ब्लॉग मी लिहावा असेही काही कारण नाही. मला माझा व्यवसाय चालविण्यासाठी पुरेशी कामे मिळतात. ती कामे पूर्ण करण्यासाठी मला वेळ पुरत नाही. त्यामुळे मी कधीही कट्‌ट्यांवर दिसत नाही की बारमध्ये सापडत नाही. माझा वेळ मी माझ्या कामांवर घालवतो आणि यदाकदाचित फुरसत मिळालीच तर चांगली पुस्तके विकत घेऊन वाचतो. ‘कनेक्टिंग द डॉट्‌स’ आणि ‘स्टे हंग्री - स्टे फुलिश’ ही रश्मी बन्सल या ‘आयआयएम’ ग्रॅज्युएट्‌सची पुस्तके सर्वांनी आवर्जुन वाचावीत अशी आहेत. मराठीतही ढीगभर पुस्तके मिळतील. ललित साहित्याच्या दृष्टीने अख्खा एस. एल. भैरप्पा वाचून काढावा, असे मी सर्वांना सांगेन. मूळ मुद्दा हा, की मला अशा गोष्टींसाठी वेळ नाही.

मी सहा वर्षांपुर्वीच सक्रिय पत्रकारिता सोडली आहे आणि मागील तीन वर्षांपासून पी.आर.ची कामेही हळूहळू कमी केलेली आहेत. माझी वेगळी कार्यपद्धती, कार्यकक्षा आणि कार्यसंस्कृती मी विकसित करीत आहे. मी नेमके काय करतो आहे, हे कळायलाही अनेकांना पुढची काही वर्षे जाऊ द्यावी लागतील!

पत्रकारितेच्या या व्यवसायात 1991 मध्ये मी स्वेच्छेने आणि तयारीने उतरलो होतो. बी. जे. ला मी विद्यापीठात द्वितीय आलो होतो आणि एम.एम.सी.जे.सुद्धा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालो. विजय कुवळेकर, उत्तम कांबळे यांच्यासारखे राज्य - राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार आणि नागनाथ फटाले यांच्यासारखे स्थानिक पातळीवरील पत्रकार यांच्या निष्कलंक पत्रकारितेचा आदर्श घेऊन मी पत्रकारितेत राहिलो आणि काही तडजोडी करण्याचा प्रसंग आला तेव्हा खंबीरपणे निर्णय घेत बाहेर पडलो. घाणेरड्या राजकारणाचा बळी म्हणून सकाळच्या औरंगाबाद आवृत्तीतून राजीनामा देऊन बाहेर पडण्याआधीच मला व्यवस्थापनाने नाशिकच्या वृत्तसंपादक/सहसंपादक पदावर जाण्याचा पर्याय दिला होता. पण मला औरंगाबाद सोडायचे नव्हते म्हणून मी पत्रकारिता सोडली. माझ्या त्यागपत्रातही मी यापुढे कुठेही नोकरी करणार नसल्याचे नमूद केले आहे.

 संधी मिळताच पत्रकारिता आणि व्यवसायात तळ्यात-मळ्यात करणारे अनेकजण आहेत, पण मी मात्र सलगपणे सहा वर्षे यापासून दूर राहिलो आहे. या काळात माझ्यसमोरही संधी आल्या होत्या. पण मी त्या स्वीकारल्या नाहीत. मी जो काही व्यवसाय करतो आहे, त्यात मी समाधानी आहे. इतरांच्या बॅनरला शरण जाण्याऐवजी मी माझे स्वतःचे बॅनर विकसित करतो आहे, कारण माझ्यात ती धमक आहे. पाठीशी असलेले बॅनर बाजूला काढले की ज्यांचे अस्तित्व संपते, असा पत्रकार मी नाही. मला कुणाच्या कुरापती काढण्यात रस नाही. दुखावण्यात आनंद नाही. कारण हे पत्रकारितेचे जग खूप छोटे आहे आणि पृथ्वी गोल आहे, यावर माझा विश्वास आहे.

 त्यामुळे माझ्या सर्व मित्रांना माझी अशी विनंती आहे की माझ्या नोकरीची चिंता कोणी करू नये आणि अशा कोणत्याही ब्लॉगशी माझा संबंध जोडू नये.

 इतःउपर जोडायचाच असेल, तर मर्जी तुमची...
कारण जमाना ‘मर्जी’चा आहे!

- आपला
दत्ता जोशी
मिडिया केअर
औरंगाबाद

मनःपूर्वक आभार

आपल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. 
एक महिन्याच्या आत, खरे तर २० दिवसांतच
 १०,००० हिट्स ! 

16 मार्च 2011

महामहोपाध्याय कुमारस्वामी व श्रीमंत यमराज


जेहत्ते कालाचे ठायी औरंगाबाद नामक नगरी वसलेली असे. या ऐतिहासिक महान नगरीत लोकांना शहाणे करून सोडावयास विविध शेटजी - भटजींकडून अनेकानेक वर्तमानपत्रे प्रकाशित होत. मध्येच मध्यप्रांती असलेल्या शेटजींच्या मनी ऐसे आले की आपणही या ऐतिहासिक नगरीत जाऊन लोकांसि शहाणे करून सोडावे. तत्पर त्यांनी या कामी त्यांचे प्रधान तथा सल्लागार तथा ब्रेन तथा संपादक श्री श्री अभिलाष खांडेकर महोदयांना नियुक्त केले. खांडेकर मूळचे इंदौरनिवासी. पण ‘कर’कारांन्त असलेकारणाने सर्व ‘करां’चा त्यांना भारी लोभ. म्हणोन त्यांनी औरंगाबाद स्वारीच्या मोहिमेच्या सेनापतीपदी महामहोपाध्याय कुमारस्वामींना नियुक्त केले. कुमारस्वामींची तपस्या भारी थोर पण त्यांच्या जिवाला हमेशाच भारी घोर. मागून आले ते पुढे गेले. खासदारपदाने सन्मानित झाले. पण यांंसी कोणी हिंग लावोन पुसेना... वरती स्वामींच्या स्वामींनी त्यांच्या द्वारपालपजी साक्षात कुबेरांचीच नियुक्ती केली. ते कारणे कुमारस्वामींची भारीच गुदमर सुरू जाहली. बरे, बराक ओबामांना सल्ला द्यावा तर तो कुमारस्वामींनीच. पण येथ साक्षात कुबेर लक्ष्मी सोडून (पक्षी इकॉनॉमिक टाईम्स) सरस्वतीची उपासना करणेत मग्न जाहले तेव्हा कुमारस्वामींची मोनोपली खतम जाहली... मगा आता काय? सटवाईला मिळाला म्हसोबा...!

एकेकाळी हे महोदय टाईम्सात घाम गाळत. आमच्या आदर्णीय नेत्या मा. मा. मा. (हे आमुचे त्यांच्याप्रति त्रिवार वंदन) सोन्याजी यांच्या राजकारण प्रवेशावेळी कुमारस्वामींनी त्यांच्या पाठोपाठ भारतवर्षाच्या सार्‍या प्रांतोप्रांती जाओन घाम गाळत रिपोर्टिंग केले. पण कॉंग्रेसला कुमारस्वामींच्या घामाची काय कदर? मराठी सारस्वतातील एवढा मोठा बोरुबहाद्दर उन्हातान्हात आपल्या परमादरणीय नेत्यांच्या पाठीशी लागत सार्‍या देशभर हिंडतो, रसभरित वर्णने करून या देशात साक्षात परमेश्वरी अवतार जन्माला आल्याचे सोडून सारे काही दावे करतो अशा खंद्या बोरुबहाद्दराची दखल कॉंग्रेसने घेतली नाही. कॉंग्रेसने नाही तर नाही, पण टाईम्सानेतर घ्यावी. पण नाहीच ! अखेर कुमारस्वामींनी टाईम्सची वस्त्रे उतरविली आणि लोकांच्या मताचा कानोसा घेतला. पण तेथ कोणाची कानोकानी खबर लागत नस्ते. कुमारस्वामी तेथ आले पण रमले नाहीत. पहिल्याच दिसापासून त्यांचे टुमणे चालू होते - मी काही फार काळ येथ राहणे नाही...

ऐसी माणसे कितिही थोर असोत पण शेटजींना कैसे चालणार ? शेटजींनी श्रीफळाची खरेदी करून ठेवलेलीच होती. पण मराठी सारस्वतातील एव्हढा मोठ्ठा बोरुबहाद्दर आपल्या दावणीला आणून बांधणेचा आनंद काय वर्णावा? यास्तव त्यांणी समयहरण केले. ये दरम्यान कुमारस्वामींनी लोकांची सत्ता कैसी चालेल याची चाचपणी केली. तेथ सत्ता चालणेचा सुगावा लागताच तयांनी रात्रीतून खांदेपालट केला... छी छी ... काय हा शब्द ! ऐसे शब्द फक्त स्मशानीच शोभती... असो तर ते तेथ गेले. तेथील तयांचा रुबाब काय वर्णावा? ‘जाऊ तेथे भाऊ’ ऐशा कहावतीप्रमाणे त्यांनी आपली ‘भाऊमंडळे’ सार्‍या महाराष्ट्रदेशी स्थापन केली.

या भाऊमंडळात सहभागी होणेस अनेकानेक थोर्थोर (पक्षी - थोर थोर) महानुभाव लाईनीत उभे. ते काळी औरंगाबादी स्वतंत्र लोकसत्ताक सुरू होणार ऐसी कुणकुण सुरू होती. (वास्तविक ऐसि कुणकुण मागील शतकापासोन होती ऐसे आम्ही दस्तुरखुद्द ऐकूण आहो) पण या स्वतंत्र लोकसत्ताकाच्या औरंगाबादच्या सुभेदारपदीचा राज्याभिषेक करणेस महामहोपाध्याय श्रीमंत यमराज मॉल-कर बहुत उत्सुक होते. वास्तविक भल्या सकाळी उभ्या महाराष्ट्रदेशीच्या दारोदारी जाणार्‍या वर्तमानपत्राने औरंगाबादची सुभेदारी आधीच त्यांना बहाल केली होती. पण तेथ काही गोष्टी बिनसत होत्या. म्हणोन महामहोपाध्यायांनी त्या काळी या भूतलावरील प्रेसिडेंट पार्क नामक वाटिकेत जावोन कुमारस्वामींची भेट घेतली....!

पत्रकार जमात म्हंजे नारदमुनींची वारस (खरे तर औलाद म्हणावयाचा आम्हास मोह झाला. पण नको. उगाच गैरसमजास वाव नको.) तयांना या गोष्टीचा सुगावा लागला. हा सुगावा ताबडतोब पुण्यनगरीत पोहोचला. सम्राट आणि प्रधान बाईंनी तयांची हजेरी घेतली. ऐसे प्रसंगी आदर्णीय उदय, आदर्णीय भाऊसाहेब ऐसी हस्ती हजर असे. पण खिरीचा नैवेद्य दाखवोन हे प्रकरण मिटले. आपण भेटायला गेलोच नव्हतो, ऐसे उद्गार तयांनी काढले. उभय पक्षांनी उभयपक्षी समाधान करोन घेतले.

पण श्रीमंत यमराज हे कुमारस्वामींच्या मर्जीतले. उभयतांनी परस्परांना अनेकदा आलिंगन देओन चर्चा केल्याचे ऐकिवात आहे. तर अशा समरप्रसंगी स्वामींनी श्रीमंत यमराजमहोदयांची आठवण केली आणि ते सुदिक आर्थिक क्रांती तुर्तास स्थगित ठेवोन औरंगाबाद मुक्कामी दाखल जाहले...

पुढील कथा काय वर्णावी महाराजा... 
पण पुढील कथेआधी मागील कथाही फार्फार महत्वाची आहे. ऐसी मागची पुढची कथा आपले समक्ष लौकरच कथन करू... 

8 मार्च 2011

आम्ही भास्कर ग्रुपला सादर केलेला अहवाल

सांप्रतात महाराष्ट्रदेशी प्रचंड चरवीतचरवण (पक्षी - चर्वितचर्वण) चालू आहे. मिडिया सारा देश हलवून टाकू शकतो हे खरेच पण मिडियाचे येणेही देश हलवणारे असते हे आम्ही प्रथमच ऐकले - वाचिले - पाहिले. दिल्लीपासून गल्लीपर्यंत (म्हंजे फक्त म्हणण्यापुरते हो... एरव्ही दिल्लीत मराठी माणसाला कोण पुसतो?) नुस्ती चर्चाच चर्चा. हे इकडे जाणार. ते तिकडे जाणार. ह्यांनी राजीनामा दिला. नाही दिला. उगाच सांगितले. आश्विन लागला. विवेक सुटला. प्रश्न मिटला... हे सग्ळे आम्ही एन्जॉय करीत होतो. कारण याचे खरे साक्षीदार आम्ही आहोत. हे सारे आमच्या समोर, काही ठिकाणी तर आमच्या मध्यस्थीने घडत होते. अनेक जण आम्हाला भेटले. आम्ही अनेकांना भेटलो. आम्ही काही जणांना निरोप पाठविले. काहींनी आम्हाला निरोप पाठविले. काहींनी नुस्तीच हूल उठवली. ज्याला सग्ळे माहिती अस्ते त्याच्यासमोर अशी ‘चंमतग’ चालू असेल तर कित्त्त्त्ती मज्जज्जजा...!

आज हे सारे खरे खरे सांगून टाकण्याची वेळ आली आहे. आदरणीय कुमार केतकर साहेबांची बातमी जाहिर झाली आणि आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त झालो. आता सांगण्यास हरकत नाही, की ‘दिव्य मराठी’साठी संपादकीय मनुष्यबळ शोधण्याची जबाबदारी आमच्यावर टाकण्यात आली होती. (कारण, भास्कर ग्रुपचे सर्वेसर्वा मा. अभिलाष खांडेकर हे इंदुरी. आम्हीही इंदुरी. त्यांनीच आम्हाला ही जबाबदारी सोपविली होती. अधिक माहितीसाठी फेसबुकवरचे आमचे प्रोफाईल पाहा.) सार्‍या महाराष्ट्रभरातील मिडियाशी आमचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध इथे आमच्या कामी आले आणि माननीय खांडेकर साहेबांनी आमच्यावर ही जबाबदारी टाकली. म्यानेजमेंटची केतकर साहेबांशी गंभीरपणे चर्चा सुरू होती. कारण पूर्ण राज्यात पुढच्या दोन वर्षांत दिव्य मराठीचा विस्तार करायचा आहे. त्याचे प्लानिंग मागचे दोन महिने चालू होते. हे प्लानिंग झाल्यावरच केतकर साहेबांची घोषणा होणार होती. जो पर्यंत केतकर साहेबांच्या नावाची अधिकृत घोषणा होत नाही, तो पर्यंत आम्ही कुठे चकार शब्द काढायचा नाही, अन्यथा जागरणमधून भास्करमध्ये आलेल्या पत्रकारांचे पगार जसे कमी केले तसे आमचेही मानधन कमी करू असा प्रेमळ इशारा आम्हाला लेखी स्वरुपात दिलेला होता. (हे कॉन्ट्रॅक्ट अस्मादिकांसच कैसे मिळाले? आमचे इंदौर कनेक्शन कामी आले. (आमची इंदौर नगरी भली बांका. इंदौरी पाहुणचाराची तोड नाही. खवैयांनी खावे आणि गवैयांनी गावे तर इंदौरमध्येच, ऐसी या नगरीची ख्याती. ‘खाऊवाली गली’ फक्त आमचे इंदौरमध्ये. मनसोक्त खा. नाहीतर तुमचे पुणे... खरे तर आता आमचेही पुणे! ... एक प्लेट मिसळीवर आधी शांपल फ्री मिळायचे. आम्ही तीन तीन शांपल फ्री चापायचो. आता शांपलला पण पैशे मागतात. असो. कुमार गंधर्व पण इंदौरचेच. म्हंजे जवळच्या देवासचे... तर असे आमचे इंदौर कनेक्शन. सध्याचा तारें जमीं पर चा गीतकार स्वानंद किरकिरे पण इंदौरचाच!) तर, सांगण्यास आनंद वाटतो, की ही सिक्रसी मेंटेन करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की भास्करवाल्यांनी प्रत्येक ठिकाणची खडान्‌खडा माहिती कशी मिळविली? तर ती ही अशी मिळविली -

आम्ही (म्हंजे आदरार्थी एकवचन) गावोगाव (म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद) भास्करच्या खर्चाने फिरलो. आमची राहायची व्यवस्था मात्र फाईव्हस्टारमध्ये नव्हती. आम्ही साध्याच हॉटेलात एसी रुममध्ये राहिलो. एसीत बसून अंदाज बांधणारे आम्ही नाही. मग आम्ही बाहेर पडलो. अनेक जण आम्हाला ओळखतात. आम्ही बहुतेकांना ओळखतो. पण आमची भास्करवाली ओळख मात्र आम्ही दाबून ठेवली. पत्रकार, पत्रक-कार, साहित्यिक, न-साहित्यिक, प्राध्यापक, विचारवंत अगदी सगळ्यांना भेटलो. सखोल माहिती घेतली.

काही ठिकाणी काही जणांना संशय आला. पण आम्हाला संशयाचा फायदा मिळाला. कारण सध्या सगळेच जण चौकशा करीत आहेत. लोकमतवाले सध्या माणसांची साठेबाजी करीत आहेत. (अशी माणसं साठवून झाल्यावर ते पुढे काय करतात, हे महावीरभाई जोंधळेंना विचारायला पाहिजे. त्यान्चा पत्त ‘अक्षर’वाल्याकडे नक्की मिळेल.) सकाळवाल्यांना सध्या कोण महत्वाचं आणि कोण देखाव्याचं हेच कळेनासं झालंय. तिथं जोरदार गळती आहे. पुढारीची नेहेमीप्रमाणे नव्या आवृत्तीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आम्ही नक्की कुणासाठी ‘पात्रसंशोधन’ करतो आहोत, हे नक्की कळत नव्हते. पण अशा स्थितीतही ‘मला सध्याचं सोडायचं आहे’, असं मोघम सांगणारे भेटले. काही जण तर ‘भास्करला जॉईन होता आलं तर बरं होईल’ असा खडा टाकून गेले. काही जणांनी तर ‘आम्हाला भास्करचं बोलावणं आलंय’ हे आम्हालाच सांगून गेले. बिच्चारे... खरे तर आम्ही एकेकाळी याच धंद्याचे पाईक. पण आता आम्ही कंटेंट मॅनेजमेंट करून पोट भरतो.

येक महत्वाची सूचना आम्हास दिली गेलेली होती. येका क्याटागिरीतल्या लोकांचा विचारही करायचा नाही, असे ते कलम होते. जी माणसे अ-विवेकाने वागून ‘मर्जी’ चोरण्याचा प्रयत्न करतात, ज्यांच्या नावावर सहकार्‍यांच्या पगारांच्या पाकिटांच्या चोर्‍यांची अनेक प्रकरणे जमा आहेत, जे सहकार्‍यांची उणीदुणी काढतात, जे लफडेबहाद्दर आहेत पण वरिष्ठांच्या ‘मर्जी’ने त्यांची मनमानी चालते, अशा क्याटागिरीतले लोक टाळावेत असे आम्हाला सांगण्यात आले होते. पण तुर्तास आम्ही त्या कडे दुर्लक्ष केले आहे. एखाद्याचे पोट भरणार असेल तर आम्हि आड येत नाही.

आज आम्ही हे सारे जगजाहिर करणार आहोत. कारण आता कॉन्ट्रॅक्ट संपले. आमचे पूर्ण मानधन आम्हाला मिळाले.

आमच्या कामाचे स्वरुप खालीलप्रमाणे होते -
1) मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद येथे विविध दैनिकांच्या संपादकीय विभागात काम करणार्‍या लोकांचे गुणांकन करायचे. गुणांकनानुसार शहरवार वर्गवारी करायची. यात संख्येचे बंधन नाही आणि सक्तीही नाही.
2) हे करताना पेपर मोठा की छोटा याचा विचार करायचा नाही.
3) आधी या व्यवसायात असलेले आणि आता नसलेले किंवा आता असलेले पण वैतागलेले लोक शोधायचे. सक्षमपणे काम करीत आहेत, त्यांचा शोध घ्यायचा आणि ते भास्कर ग्रुपला जॉईन होऊ शकतील का किंवा बाहेर पडलेले या व्यवसायात परत येणार का, याची चाचपणी करायची.
4) मोठ्या नावांच्या भानगडीत पडायचे नाही. प्रवीण टोकेकर, पराग करंदीकर, विवेक गिरधारी, यमाजी मालकर अशी छोटी छोटी नावं शोधायची. कारण संपादक तर केतकर साहेब होणार हे नक्की होते. मग खालचा कारभार पाहायला कामाची माणसं नकोत का?
5) ही टेस्टिंग करून या याद्या भास्करच्या सुपूर्त करायच्या.
6) केतकर साहेबांची घोषणा झाल्याशिवाय थेट किंवा सांकेतिक स्वरुपात ही माहिती कोणालाही द्यायची नाही.

यानुसार आम्ही आधी माणसांच्या याद्या तयार केल्या आणि नंतर पुढचे शेरे नोंदवले.

तर या नुसार आम्ही तयार केलेला अहवाल आज आपणासमोर मोडत आहोत. गोड मानून घ्यावा, ही विनंती.

‘भास्कर'साठी मनुष्यबळ व्यवस्थापन नियोजन अहवाल.

सद्यस्थिती ः
अ) महाराष्ट्रात सध्या पत्रकारितेत बुद्धीची दिवाळखोरी माजलेली आहे. सगळे पेपर कमर्शियल झाल्यामुळे पत्रकारही (पत्रकार की पत्रक-कार?) कमर्शियल झाले आहेत. अवैध वाहतुकी, वाळूचे पट्टे, महापालिका, पोलिस खाते, सिंचन विभाग, रस्ते महामंडळ हे या मंडळींच्या आपुलकीचे विषय बनले आहेत.
ब) प्रत्येकाला एक तर संपादक व्हायचं आहे किंवा मग वर उल्लेख केलेल्या बीटचे वार्ताहर. टेबलवर बसून एडिटिंग करायला सांप्रतात कोणी तयार नाही.
क) वरील प्रकारची कामे मिळाल्यास कोणीही पगाराची अट वगैरे घालत नाही. अन्यथा अन्य लोकांच्या सरासरी 30 हजार ते पुढे अशा अपेक्षा आहेत.

नव्या मिडियाकडून अपेक्षा ः
अ) थेट पर्मनंट करावे.
ब) कामाची अट नसावी.
क) इंग्रजीचा आग्रह धरू नये. कारण आम्ही मातृभाषेबद्दल आग्रही आहोत. शिवाय पेपरही मराठीतच निघणार आहे.
ड) ट्रान्सलेशन वगैरेची कामे प्रोमेशनल ट्रान्स्लेटरकडे द्यावीत.
ई) घरात व कार्यालयामध्ये इंटरनेटचा अमर्याद वापर संबंधित दैनिकांच्या खर्चाने करावयास मिळावा. जेणेकरून फेसबुक वगैरेंच्या सहाय्याने जगाच्या संपर्कात राहता येईल.

ठिकठिकाणची काही महत्वाची नावे ः
यामध्ये आम्ही सध्या कार्यरत असलेले किंवा बाहेर पडलेले अशा दोन्ही गटांमध्ये शोध घेतला. सूत्रांद्वारे त्यांची मते आजमावण्याचा प्रयत्न केला. इथे हे कबुल करण्यात आम्हास संकोच वाटत नाही, की ही माहिती आम्ही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, सूत्रांद्वारे, मोघम चर्चा सोडून वगैरे वगैरे सर्व प्रकारच्या मार्गांचा अवलंब करून मिळविलेली आहे.

मुंबई ः
1) आल्हाद गोडबोले. / सध्या - प्रहार. बदल करण्याची शक्यता - शक्य.
2) विवेक गिरधारी. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
3) प्रवीण टोकेकर. / सध्या - लोकप्रभा. बदल करण्याची शक्यता - शक्य. (की-पोस्ट मिळाल्यास)
4) अतुल कुलकर्णी. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य (औरंगाबाद मिळणार असेल तर)
5) मुकेश माचकर. / सध्या - प्रहार. बदल करण्याची शक्यता - शक्य.
6) मनोज गडणीस. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
7) संजीव लाटकर. / सध्या - स्वतंत्र व्यवसाय. बदल करण्याची शक्यता - नाही
8) प्रशांत दीक्षित. / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - शक्य
9) संतोष प्रधान. / सध्या - लोकसत्ता. बदल करण्याची शक्यता - शक्य.
10) राजीव साबडे. सध्या - पुढारी. बदल करण्याची शक्यता - शक्य.
11) समीर मणियार. / सध्या - मटा. बदल करण्याची शक्यता - शक्य.

पुणेः
1) पराग करंदीकर. / सध्या - महाराष्ट्र टाईम्स . बदल करण्याची शक्यता - शक्य. (स्वतःच्या पदासह सारा ग्रुप हलवता आला तरच. सकाळ सोडून कुठेही जाण्याची तयारी.)
2) मुकुंद संगोराम. / सध्या - लोकसत्ता. बदल करण्याची शक्यता - सांगता येत नाही.
3) यमाजी मालकर. / सध्या - अर्थक्रांती. बदल करण्याची शक्यता - शक्य. (पण लायब्ररि चान्गली असावी)
4) निशिकांत भालेराव. / सध्या - युनिक फीचर्स. बदल करण्याची शक्यता - तातडीने.
5) सुनील माने. / सध्या - स्वतंत्र व्यवसाय. बदल करण्याची शक्यता - शक्य. (की-पोस्ट मिळाल्यास)
6) सुनील चव्हाण. / सध्या - स्वतंत्र व्यवसाय. बदल करण्याची शक्यता - शक्य.
7) संजय आवटे. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
8) दीपक मुनोत / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - शक्य.
9) शेखर कानेटकर / सध्या - मुक्त. बदल करण्याची शक्यता - शक्य.
10) नरेंद्र जोशी / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - शक्य.
11) पराग पोतदार. / सध्या -लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
12) वर्षा कुलकर्णी. / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - शक्य. (पुरवणीचे काम मिळणार असल्यास)

नागपूरः
1) प्रवीण बर्दापूरकर. / सध्या - लोकसत्ता. बदल करण्याची शक्यता - शक्य. (औरंगाबाद मिळाल्यास)
2) सुरेश द्वादशीवार. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
3) यदु जोशी. / सध्या - मुंबई लोकमत . बदल करण्याची शक्यता - शक्य (नागपूर मिळाल्यास)
4) श्रीपाद अपराजित. / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - शक्य.
5) धनंजय गोडबोले. / सध्या -मटा नागपूर. बदल करण्याची शक्यता - शक्य.
6) सविता हरकारे. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
7) रुपाली तौलिनकर. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.

नाशिकः
1) विश्वास देवकर. / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - सांगता येत नाही.
2) मंगेश वैशंपायन. / सध्या - सकाळ, दिल्ली. बदल करण्याची शक्यता - शक्य (नाशिक िमळणार असेल तर)
3) नंदकुमार टेणी. / सध्या - देशदूत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
4) सुभाष कावळे. / सध्या - मुक्त. बदल करण्याची शक्यता - शक्य.
5) किरण अग्रवाल / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
6) अपर्णा वेलणकर. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
7) मेघना ढोके. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.

औरंगाबादः (ग्रुपचे मुख्य सेंटर इथे होणार. केतकरसाहेब मुंबईतच बसणार.)
1) चक्रधर दळवी. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - सांगता येत नाही. (अख्खा ग्रुप घेऊन जाण्याची क्षमता, पण मालकाच्या अत्यंत विश्वासातले.)
2) जयंत महाजन. / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - नाही.
3) दत्ता जोशी. / सध्या - स्वतंत्र व्यवसाय. बदल करण्याची शक्यता - कमी. (सहा आकडी पगार मिळाल्यास शक्य)
4) प्रमोद माने. / सध्या - लोकसत्ता. बदल करण्याची शक्यता - शक्य.
5) गणेश तुळशी. / सध्या - सामना. बदल करण्याची शक्यता - शक्य.
6) धनंजय लांबे. / सध्या - सामना. बदल करण्याची शक्यता - शक्य. (पगार वाढवून मिळाल्यास)
7) अनिल फळे. / सध्या - स्वतंत्र व्यवसाय. बदल करण्याची शक्यता - शक्य. (पण फारसा उपयोग नाही)

कोल्हापूरः
1) वसंत भोसले. / सध्या - पीपल्स पॉलिटिक्स. बदल करण्याची शक्यता - सांगता येत नाही.
2) राजा माने. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
3) दशरथ पारेकर. / सध्या - तरुण भारत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
4) जयसिंग पाटील. / सध्या - मुक्त. बदल करण्याची शक्यता - शक्य.
5) विजय जाधव. / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - शक्य.
6) बाबुभाई येरवाडे. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - नाही.
7) समीर देशपांडे. / सध्या - तरुण भारत. बदल करण्याची शक्यता - शक्य.

(वर उल्लेख केलेली नावे आम्ही आमच्या सर्व प्रकारच्या सोअर्सेसमधून मिळविली आहेत. यदाकदाचित एखादे उत्तम नाव आपल्या माहितीत असेल, तर कृपया आमच्या ई मेलवर आम्हाला ते कळवावे म्हणजे आमच्या अहवालाच्या पहिल्या परीशिष्टात आम्ही त्यांचाही समावेश करू. शेवटी, कर्ते करविते ‘करा’न्त - म्हणजे खांडेकर, केतकर असे लोक आहेत. आम्ही फक्त भारवाही......!)

याशिवाय, बाकी राज्यभरातील छोट्यामोठ्या अशा 157 नावांची यादी आम्ही केतकर साहेबांकडे दिली आहे. त्याची सीसी खांडेकर साहेबांकडेही पाठविली आहे. ही यादी आम्ही पुढील आठवड्यात जाहिर करू. अगदी नक्की.

चलो, बाय.
भेटत राहू.

3 मार्च 2011

औरंगाबाद ः मिडियातील भूकंपाचे सध्याचे ‘इपिसेंटर’...!

पत्रकार आणि साहित्यिक जमातींना वाहिलेल्या आमच्या ‘बोरुबहाद्दर’ या ब्लॉगचे उदघाटन अशा जंगी स्वरुपात करताना आम्हाला प्रचंड, म्हणजे काळजात मावणार नाही येवढा आनंद होत आहे. याचा शुभारंभ मराठवाड्यापासून कर्ताना(आम्हाला ‘करताना’ असे लिहिता येते बरे !)तर हा आनंद गगनाला जाऊन टेकतो. मराठवाड्याच्या अनुशेषाकडे आम्ही केव्हढ्या गांभीर्याने पाहातो, हेच यातून आपल्या लक्षात येईल.
औरंगाबादकरांनी मोजून दीडशे ‘मर्सिडिझ’ काय घेतल्या आणि सार्‍या जगाचे लक्ष, मोजून दहा लक्ष लोकसंख्येच्या या महानगराकडे वेधले गेले. या महानगरात भर्पूर (भरपूर - आम्हाला हे ही लिहिता येते बरें) पैसा आहे, असाच सगळ्यांचा गोड गैरसमज झाला. आदरणीय लोकमतकार माननीय बाबुजी दर्डा (धाकटी पाती उर्फ ऋषीजी) यांनी आपल्या लोकमतातून या घटनेची येवढी टिमकी वाजवली की सगळे पेपरवाले आपली कामेधामे सोडून औरंगाबादी निघाले. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या (की मराठवाडा मुक्ती संग्राम? न्या. चपळगावकरांना विचारून खात्री करू या) पासूनचा अनुशेष एका झटक्यात भरून काढायला सगळे जण सरसावले आहेत. सगळे म्हणजे ‘मिडिया’वाले. सध्या मिडियावाल्यांचे एक बरे आहे. ते म्हणतील ती पुर्व दिशा. मग वाचकांची ‘मर्जी’ काहीही असो. या मर्जीवरून आठवले, मराठवाड्यात लवकरच पेपरवाले तमाशा बार्‍यांचे आयोजन करणार आहेत, असे कळते. सध्या सगळेच पेपरवाले इव्हेंटमध्ये घुसल्याने भयंकर मारामारी सुरू आहे. कुणी वाहनं विकतात, कुणी घरं विकतात, कोणी कन्झ्युमर अप्लायन्सेस विकतात... जमलं तर पेपर विकतात...! तर अशा मराठवाड्यात सध्या ‘मर्जी जाणून घेण्या’ची आणि ‘मर्जी चालविण्या’ची अहमहमिका लागली आहे. कोण कसा नाचतो, कुणाच्या पायातले चाळ खणखण वाजतात त्यावर त्यांच्या धंद्याचा छनछनाट अवलंबून राहणार आहे असे कळते. त्यामुळे सगळेच दारोदार भटकत जन्तेच्या फर्माईशी गोळा करण्यात लागले आहेत.
भास्करवाल्यांचा मराठी सूर्य आता एक मे पासून औरंगाबादी उगवणार असल्याचे कळले आहे. मराठीचा सूर्य उगवताना त्याला जोड देण्यासाठी हिंदीचा भास्करही अकोल्याचा पेपर औरंगाबादी छापून मराठवाड्यात देणार असल्याचे वर्तमान आहे. जागरणवालेही येऊन गेल्याचे कळले आहे. मग पुढारी का मागे राहणार? ते तर चार वर्षे ‘सुरू होणार - सुरू होणार...’ असे ऐकवत आहेत. आता ते पुण्याची एडीशन औरंगाबादेत छापून विकणार असल्याचे कळले. म्हंजे (म्हणजे - आम्हाला हेही लिहिता येतं) हे ‘सकाळ’सारखंच झालं की - ‘मराठवाड्याचे पाणी - पुणेरी वाणी’.
असो, पण एकंदरीत सध्या औरंगाबादी धम्माल चालली असल्याचे आमच्या सूत्रांकडून कळते. सूत्रांची नावे सांगायची नसतात !

कॉन्ट्रॅक्टची पोरं लावून मर्जी चाचपण्याची सोय झाली, मग दुसरा पेपरवाला कुठं काय करतो आहे, याच्या चौकशा सुरू झाल्या. सगळ्या पेपरवाल्यांचे म्यानेजरसायेब उन्हातान्हाचे पाणीबाटल्या सांभाळत ‘एमआयडीशा’ (‘एमआयडीसी’चे अनेकवचन) फिरू लागले. शेंद्रा ते वाळूंज, सगळीकडे फिरूनही अनेकांना खरी माहिती कळेना. वरून मालक प्रवर्गाचा दट्‌ट्या सुरू. येवढी वर्षं म्यानेजरचा पगार घेता, नवा प्रेस कुठं उघडतो ते कळेना? पण खरी फ्याक्ट ही की खरंच काही कळेना...! कसं कळणार, येवढ्या वर्षात एसीची सवय लागली. अशिष्टंट सांगणार, हे ऐकणार. दोघांचाही सरक्यूलेशन ग्राऊंडशी संपर्क तुटला. कोणी तरी कुठून तरी माहिती देतं. हे वर पाठवतात. ‘सुटलो बाबा’ म्हणतात.

तर मंडळी, ह्याच्यात खरी चांदी झाली ती बोरुबहाद्दरांची. जिथं आठ - दहा हजारांना कोणी हिंग लावून विचारत नव्हतं, तिथं त्यांना तीस तीस हजारी  मनसबदारी दिली. आमच्या पुण्यातही येव्हढी पगारी नाहीत, तिथं औरंगाबादी बहाद्दरांचे नशीब फळफळलं. त्यामुळे पुण्यातून औरंगाबादी जाण्याची इच्छा बाळगणारे अनेक जण औरंगाबादच्या गाडीची चौकशी करू लागले. पण सगळ्या गाड्या हाऊसफुल्ल. पण औरंगाबादी पत्रकारांना मानले पाहिजे. काही काही जणांनी तर आपल्याला बोलावणे आल्याची नुसती  हूल उठवत पगार वाढवून घेतले. खरं काम करणारे मात्र तशेच राहिले, अशे म्हणतात.

असो. तर या भूकंपाचे धक्क्यावर धक्के मराठवाड्याला बसत आहेत. सध्या कुणी ‘शेठजी’कडे पुड्या बांधतो, तर कुणी  ‘मालका’कडे. आता नव्या धन्यांच्या सालदारीचे आडाखे बांधणे सुरू आहे. बरेच जण रांगेत आहेत. काही जण ‘मी नाही त्यातली’ म्हणत आतली कडी लावून घेऊन चर्चा करत आहेत. मुंबईचे केतकर मराठीचे दिव्य पार पाडणार असे कळताच विदर्भाचे केतकर मराठवाड्यात येणार असे जबरदस्त वातावरण तयार झाले. त्या पाठोपाठ मराठवाड्याचे केतकर त्यांना सपोर्ट करणार असेही जाहीर झाले. मग लोकांच्या सत्तेचे काय, असा प्रश्न मोजून दोन हजार वाचकांना पडला!

मुंबईत शेठजींच्या पुड्या बांधणार्‍यांनी आपणच नव्या मालकांचे पॅकिंग करणार असल्याची अफवा पसरवली पण झाले असे, की त्यांच्या अश्विन मासाने त्यांचा घात केला. नाक्यावरची रसपूर्ण जाग्रणे आंगलट आली. असो. अशीच आणखीही अनेक नावे चर्चेत आहेत. मुंबई ते औरंगाबादपर्यंतची ही रसाळ चर्चा चालूच राहणार आहे. 
तुर्तास इतकेच. 
लवकरच भेटू.