20 जून 2011

‘सल्लागार’ म्हणजे काय रे भाऊ?

(आम्ही नुकतेच औरंगाबाद नगरीत जाऊन आलो. तेथील एका ग्रुपमध्ये एक मजेदार गोष्ट ऐकण्यास मिळाली. ती आपणासमोर सादर...)

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. नेहेमीप्रमाणे मध्यरात्री तो स्मशानात पोहोचला. काळोखात सळसळणार्‍या पिंपळाच्या फांदीवर उलट्या लटकणार्‍या वेताळाला त्याने खाली खेचले आणि एका झटक्यात त्याला खांद्यावर टेकून तो स्मशानाच्या बाहेर निघाला. वेताळ खरे तर आता म्हातारा झाला होता. मागच्या अनेक पिढ्यांच्या साक्षीने राजा विक्रमादित्य त्याला खांद्यावर टाकून बाहेर पडत असे आणि आपल्या खाशा युक्तीने त्याच्या तावडीतून सुटून तो परत आपल्या आवडत्या पिंपळावर येऊन लटकत असे. 
आजही तसेच झाले. बाहेर पडताच विक्रमादित्याने आपल्या बुलेटला किक मारली. रात्रीच्या भयाण अंधारात फायरिंगचा ‘डुग डुग डुग’ असा भेसूर आवाज करीत बुलेट शहराच्या दिशेने निघाली. विक्रमादित्याने आज काहीही न बोलण्याचा निश्चय केला होता. कारण त्याने तोंड उघडले तर वेताळ पुन्हा एकदा हातातून सटकून जाईल, याची त्याला खात्री होती. वेताळ नेहेमीप्रमाणे विक्रमादित्याच्या कानाशी झुकला आणि त्याने विचारले, ‘‘हे विक्रमादित्या, तू तुझा हट्ट सोडत नाहीस आणि मी माझा क्रम चुकत नाही. तुला ठावूक असतानाही माझ्या प्रश्नाचे खरे उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील.’’ त्याच्या धमकीला विक्रमादित्य आजही घाबरला नाही. त्याने आपली बुलेट रस्त्याच्या कडेला घेतली आणि एका बस स्टॉपशेजारी उभी केली. दोघेही बस स्टॉपच्या आतील आसनावर येऊन बसले. 

वेताळ म्हणाला, ‘‘हे विक्रमादित्या, आजकाल सर्वत्र ‘सल्लागार’ या पदाची खूप चलती आहे. कोणत्याही पदामागे हे नाव लावून काही जण लक्षावधींची कमाई करीत आहेत. हे ‘सल्लागार’ कसे जन्मतात? कसे बनतात? तसे होण्यासाठी कोणते कौशल्य लागते? ते मिळविण्यासाठी काय मेहनत करावी लागते? याची उत्तरे तुला ठावून असतील तर मला सांग. खोटे बोललास, तर तुझ्या डोक्याची....’’

त्याचे बोलणे मध्येच अर्धवट तोडत विक्रमादित्य म्हणाला, ‘‘हे वेताळा, आता तुझे ब्लॅकमेलिंग बस्स झाले. मला ब्लॅकमेल करण्यास तू पत्रकार आहेस की ‘आरटीआय’चा कार्यकर्ता? तुला उत्तरच हवे आहे, तर मी देईन. माझ्या डोक्याची शकले करून घेण्याची माझी इच्छा नाही. ऐक तुझ्या प्रश्नाचे उत्तर. पण हे उत्तर मी तुला एका गोष्टीच्या रूपाने देणार आहे. ही इसापनीतीतील गोष्ट आहे. त्यामुळे प्राणी कसे काय बोलू शकतात वगैरे फालतू प्रश्न मला विचारू नकोस.’’
वेताळ म्हणाला, ‘‘विक्रमादित्या, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की बस्स झाले. उगाच हट्टीपणा करण्यासाठी मी रामदेव थोडाच आहे? चल बोल...’’

विक्रमादित्य सांगू लागला ः
एक छानसं कुरण होतं. तिथं अनेक गायी आणि बैल गुण्यागोविंद्याने नांदत असत. सर्वजण तेथे एकसमान होते पण त्यातील काही जण विशेष होते. स्वतःला धष्टपुष्ट समजणारा एक बैल त्या कळपात होता. आपल्या कळपातील नव्या, गुणवान गोवंशाचा जनक आपणच, असा दावा तो करीत असे. आपल्या वीर्यवान वृत्तीमुळेच आपल्या कळपाची भरभराट होत असल्याचे त्याचे म्हणणे होते. आपण चांगलेच पुष्ट असल्याची त्याची बतावणी अशी होती की त्या कुरणाच्या मालकाला त्याच्यावर भलताच लोभ जडला. आपल्या कुरणात अधिक चांगल्या वंशाची पैदास व्हावी यासाठी या बैलाचा उपयोग करण्याचे त्याने ठरविले. या बैलाचा अधिक चांगल्या प्रकारे पुष्ट करण्यासाठी त्याने या बैलाला आपल्या महालातील खास गोठ्यात आणून बांधले. त्याला उत्तम खुराक सुरू केला. हाच बैल आपल्या कळपाचा उद्घार करील, याची त्याला खात्री वाटत होती. कृत्रिम रेतनाद्वारे त्याच्या वीर्याचा उपयोग करण्यासाठीही मालकाने तयारी चालविली होती. पण हाय रे दैवा, दोन-चार वर्षे उलटली, तरी या बैलाद्वारे गोवंशवृद्धी होईना. आधी त्याला वाटले, आपल्या गोधनातच काही फॉल्ट असेल. पण तपासणीअंति हे बैलोबा बिन‘कामा’चे असल्याचे मालकाच्या लक्षात आले. मग मालकाने त्याला गोठ्याबाहेरच काढले.

भुकेजलेला हा बैल नव्या कुरणाच्या शोधात निघाला. निघण्याआधी मात्र त्याने एक शक्कल लढविली. आपल्या तमाम जातभाईंना आणि इतर कळपांना, आता आपण अधिक चांगल्या कुरणाच्या शोधात निघण्यासाठी सध्याच्या कुरणाचा त्याग करीत आहोत, अशी बतावणी त्याने केली. ज्यांनी हे ऐकले, त्यांना या विषयाशी फारसे देणेघेणे नव्हते!

तर, हा बैलोबा रान हुंंगत हुंगत पुढे निघाला. तसे पाहिले, तर त्याने जागोजागी तहानलाडू-भूकलाडूचे गुप्त साठे करून ठेवले होते, त्यामुळे भूक लागली की भूक भागत होती. पण साठे किती दिवस पुरणार? काही दिवसातच त्याचे फाके पडू लागले. तो रोडावू लागला. तशातच एक छोटे कुरण त्याला लागले. सध्याची भूक तर भागली. पण मोठ्या कुरणाचे आकर्षण त्याला गप्प बसू देई ना. मध्येच एखादा फेरफटका मारण्यासाठी तो बाहेर पडे. 

एके दिवशी असेच झाले. तो बाहेर पडून अंमळ दूरच पोहोचला. खूप दूरवर त्याला एक हिरवेगार कुरण दिसलेे. एवढे सुंदर कुरण त्याने कधीच पाहिले नव्हते. त्याच्या मनातील आशेला पालवी फुटली. आपल्या दुडक्या चालीने तो कुरणाच्या रोखाने निघाला. कुरण जवळ जवळ येऊ लागले. आहाहा... काय ते कुरण. हिरवे गार. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ. थंडगार स्वच्छ पाण्याचे जागोजागी साठे. गवतात तरी किती प्रकार. तो आणखी जवळ आला. पाहतो, तर काय... छान, धष्टपुष्ट गायी या कुरणात स्वच्छंदपणे मौजमस्ती करीत चरत होत्या. त्याच्या जिभेला पाणी सुटले. मस्त हिरवेगार गवत खाऊन खूपच दिवस झाले होते. नव्हे, वर्षे लोटली होती. इथे तर इतके पौष्टिक गवत होते, की खाई त्याला खवखवे! सोबत थंडगार पाणी आणि साथीला पुष्ट गायींचे मनोरंजन...! तो कुरणाच्या आणखी जवळ आला. आता मात्र त्याला राहवेना. तो धावतच सुटला. पण हे काय...? कुरणाच्या सीमेवर काटेरी तारांचे कुंपण? अरे देवा... घात झाला. आता काय करायचे? समोर हिरवेगार कुरण. छानसे पाण्याचे साठे. पुष्ट गायींची सोबत आणि वाटेत हे अभद्र काटेरी कुंपण? त्याची चाल थांबली.

तो विचारात पडला. आता काय करायचे? कुंपण चांगले शिंगाइतके उंच होते. तो तिथेच थांबला. इकडेतिकडे पाहू लागला. काही वेळातच, एक म्हातारा बैल त्याच्याकडे येत असल्याचे त्याला दिसते. त्याला हायसे वाटले. बरे झाले, सोबत झाली... थोड्या गप्पा मारू... थोडा विचार करू आणि मार्ग काढू असे त्याने ठरविले. 

म्हातारा बैल जवळ आला. त्याने आस्थेवाईकपणे बैलोबाची विचारपूस केली. हवापाण्याच्या गप्पा झाल्या. म्हातार्‍या बैलाने हळूच विचारले...‘समोरचे कुरण आवडले?’... बैलाबाने लाजून मान हलविली, तसा त्याच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ ध्वनी सार्‍या शिवारात घुमला.

‘कुरण आवडले, की गायी?’... म्हातार्‍या बैलाने विचारले, तसा बैलोबा आणखीच लाजला. एव्हाना त्याच्या पौरुषाची चलबिचल सुरू झाली होती! सुष्ट कुरण... पुष्ट गायी... पण दुष्ट कुंपण. त्याला राग आला. पण क्षणभरच. पुन्हा एकदा पौरुषाची चलबिचल सुरू झाली.

म्हातारा बैल म्हणाला, ‘माझ्याजवळ एक आयडिया आहे.’
बैलोबा उतावीळपणा लपवत म्हणाला, ‘सांगा ना.’
म्हातारा बैल म्हणाला, ‘एक काम कर. वीस पावले मागे जा. जोराने धावत सूट. कुंपण 10 फुटांवर आले, की जोराची झेप घे. तू थेट कुरणात जाशील.’

बैलोबा मोठ्या खुशीत पावले मोजत निघाला. वीस पावले जाताच थांबला. गर्रकन मागे वळला. मोठ्या खुशीने मान हलविली. घुंगरांचा आवाज घुमला. खुराने जमीन उकरीत बैलोबा धावत निघाला... प्रचंड वेगाने धावत धावत तो कुंपणापासून 15 फुटांपर्यंत पोहोचला आणि करकचून ब्रेक लावल्यागत जागीच थांबला. जागीच थांबल्याने त्याचे खूर जमिनीत घुसले होते. म्हातारा बैल पुन्हा जवळ आला. बैलोबा म्हणाला, ‘कॉन्फिडन्स येत नाही.’ म्हातारा बैल म्हणाला, ‘आणखी दहा पावलं मागे जा.’ पुन्हा तोच क्रम. पुन्हा करकचून ब्रेक! इकडे पौरुषाची चलबिचल वाढली होती. आकार बदलू लागला होता. जुन्या काळी जनावरांच्या दवाखान्यात नैसर्गिक रेतनासाठी आणलेल्या खास बैलाची जशी अवस्था असायची, तसे बैलोबाचे पौरुष आता डोकावूही लागले होते. 

आता त्याने ठरविले, थांबायचे नाही. इनफ इज इनफ. एव्हाना बैलोबा 60 फुटांपर्यंत पोहोचला होता. त्याने आता ठामपणे ठरविले. सारी शक्ती पणाला लावली. तो अतिप्रचंड वेगाने धावत निघाला. पन्नास... चाळीस... तीस... वीस... पंधरा... दहा... पाच... चार... हाय जंप...झूंऽऽऽ... फटाक्‌.... आई गं... मेलो...

सारा सत्यानाश झाला... हाय जंप थोडीशीच तोकडी पडली. काटेरी जाळीत पौरुष अडकले... पार नासाडी झाली... सारं अंग काटेरी तारांवरून सोलवटून निघालं आणि त्यातही आणखी दुर्दैव म्हणजे बैलोबा अलिकडेच पडले... कुरण राहिले दूर... कुरणाचा लोभ... पुष्ट गायींचे दर्शन... काटेरी तारा... म्हातारा बैल.... लॉंग रन... हाय जंप....झूंऽऽऽ... फटाक्‌.... आई गं... मेलो... पुन्हा पुन्हा बैलोबाच्या नजरेसमोरून हा सारा क्रम एखाद्या चित्रफितीसारखा दिसत होता... वेदनांनी अंग ठणकत होते. पौरुष तर लुप्तच झाले होते... फक्त रक्ताचे ओघळ दिसत होते...

म्हातारा बैल जवळ आला. आस्थेवाईकपणे डोक्यावरून जीभ फिरवीत त्याने सौम्यपणे विचारले, ‘खूप लागलं का रे बाळा?’ ... आता बैलोबाला रडू आवरत नव्हते. तो मुसमुसून रडू लागला. म्हातारा बैल धीराचा होता. त्याने शेजारी जाऊन फर्स्ट एड बॉक्स आणला. जुजबी मलमपट्टी केली. ‘टीटी’चं इंजेक्शन दिलं. पाठीने आधार देत त्याला थोड्याशाच अंतरावर असलेल्या एका पाणीसाठ्याजवळ नेले. चार घोट घशाखाली उतरताच त्याला बरे वाटते. म्हातारा बैल त्याला धीर देऊ लागला. असे अपघात होतच असतात, धीराने घ्यायचे... असे सांगू लागला.

आता मात्र बैलोबाचा संयम सुटला. मनापासून कातावून तो म्हणाला... ‘ते सगळं ठीक आहे. पण आता माझ्या आयुष्याचं नुकसान झालं ना ! सगळं ठेचलं गेलं. आता मी काय कामाचा?’

म्हातारा बैल म्हणाला, ‘अरे. आताच तर तू जास्त कामाचा. आजपासून तू कन्सल्टंट... सल्लागार. आता आपण दोघं मिळून पार्टनरशीपमध्ये नव्या पिढीला सल्ले देण्याचं काम करू...!’

वेताळाला सारा अर्थ कळला. पण विक्रमादित्याने मौनाची अट तोडली होती त्यामुळे काहीच न बोलता वेताळ भुर्रकन उडून निघून गेला. विक्रमादित्य डोके गच्च धरून बसला...!