25 जून 2011

आम्ही खूप घाबरलो आहोत

आज सकाळ पासून आम्ही खूप घाबरलो आहोत. मराठवाड्याचे पवित्र पत्र असलेल्या दैनिकात आमच्यावर कारवाई होणार असल्याचे वाचले, आणि आमचे हातपाय गळाले. त्यामुळे आम्ही हे लेखन डोक्याने करीत आहोत. आता आमच्या मनात एकाच विचार आहे, आमच्या बायका-पोरांचे काय होणार? परमेश्वरी कृपेने आम्हाला एक बायको, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पुण्यात एका छोट्याशा सदनिकेत आम्ही राहतो. आमची सगळी ग्राच्युईती खर्चून १० टक्के कोट्यातून आम्हाला ही जागा मिळाली. त्याचे कर्जही अजून फिटले नाही. आम्हाला अटक झाली आणि आम्हाला तुरुंगात टाकले तर त्यांचे काय होणार? माझी आपणा सर्वाना जाहीर नम्र विनंती आहे, की मला माफ करा.

मी कोणाची बदनामी केली नाहीआम्ही पुण्यात बसतो पण देशभर असतो. आमच्यावर कारवाई झाली, तर मायावती, जयललिता यांची कामे कोण करणार? एक मराठी माणूस देशभर जाऊन नाव कमावतो हे किती महत्वाचे आहे!

अशा परिस्थितीत आम्ही मराठी वृत्तपत्र सृष्टीचा मनोरंजक आढावा घेत आहोत. असे करताना थोडे इकडे-तिकडे होतही असेल पण ते तर कुमार स्वामींच्या पहिल्या लेखातही झाले होते! तर असे हे होतच असते. त्याकडे दुर्लक्ष करावे आणि उदार मानाने आम्हाला माफ करून आमच्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही असे पहावे. यापुढे आम्ही कुण्णा-कुण्णावर टीका करणार नाही. काळी-पांढरी म्हणून डिवचणार नाही, श्याम म्हणून हिणवणार नाही, चक्रधर स्वामींचे लीळाचरित्र वाचणार नाही, ऋषी मुनी म्हणनार नाही, ये-पी संबोधणार नाही. डोंगरधारी असे चिडवणार नाही. आम्ही अगदी सरळ वागू. एख्याद्या क्राईम रिपोर्टरने एखाद्या पोलीसावाल्याशी वागावे, तसे आम्ही तुमच्याशी वागू. त्यासाठी ग्यारेंटर म्हणून आम्ही कुणाच्या सह्या आणायच्या हे तुम्हीच सांगा.

कृपया आमच्यावर कारवाई करू नका. आम्ही बालबच्चेवाले आहोत. पाठीवर मारा पोटावर नको.

आपलाच पण कुणाचाच नसलेला

बोरूबहाद्दर प्रेसवाले