10 जुलाई 2011

औरंगाबादकराना घडले भेटीच्या `भिक`वस्तूचे दिव्य दर्शन !

औरंगाबाद्करांची मर्जी जाणून घेण्याची चढाओढ काही महिन्यापूर्वी रंगली होती. मर्जीच्या या खेळात भोपाळसेठ यांनी २०० रुपयात दिव्यदर्शनाची ऑफर देऊन वाचकांची मर्जी जिंकली. त्याच वेळी तमाम वाचकांना एक भेटवस्तू देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. दिव्य दर्शनाच्या भाराने झुकलेल्या पब्लिकने खूप रेटा सुरु केल्याने अखेर या भेटवस्तू वाटण्याचे ठरवण्यात आले. 

लोकांना वाटले, कि मर्जी जाणून घ्यायला हे लोक दारोदार फिरले, मग भेट देण्यासाठी पुन्हा दारी येतील. पण हाय रे दैवा, या वेळी उलटेच घडले. दारीच काय, गल्लीत सुद्धा कोणी फिरकले नाही! समस्त गरजू भेटइच्छुकांनी आता आपल्या दारी येऊन भेट स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. तब्बल २०० रुपयांच्या भेटीसाठी आतुरलेले हजारो जीव दिव्याखाली धावले... आणि काय सांगायचे महाराजा... सर्व जण अतिशय तृप्त झाले आहेत. 

भोपाळसेठ यांनी पार दूर देशीहून प्लास्टिकच्या ३ बरण्या आणि बायकांनी नाक पुसण्याचे ३ फडके असा साधारण ४० रुपयात खरेदी केलेला ऐवज आणून वाटण्यास सुरवात केली. ही मौल्यवान भीक स्वीकारण्यास सध्या दिव्याच्या अंगणात भल्यामोठ्या रांगा लागलेल्या आहेत. असली फालतू भिक स्वीकारण्यापेक्षा ती सोडून देण्याचे विचार लोक करतात पण पुन्हा - चोराची लंगोटी - म्हणून रांगेत उभे राहतात. 
रांगा लागल्या पण तिथे पावसापासून संरक्षण नाही. बिचारे ४० रुपयाच्या भिकेसाठी आपला लाखमोलाचा जीव अडकवून उभे आहेत. 

अशा प्रकारे वाचकांची मर्जी जाणून घेवून आता औरंगाबादेत आपलीच मर्जी चालविण्याचा प्रकार सुरु झाला असून उर्वरित महाराष्ट्रासाठी हा प्रेमाचा संदेश देण्यासाठी आम्ही हे लेखन केले आहे. यात कोणाची बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही. त्यामुळे कोणीही आम्हाला कायदेशीर इलाज करण्याचा इशारा देयू नये, ही विनंती...!