1 जुलाई 2011

बावचळलेल्या मालकाची वेठबिगारीची 'ऑफर'!

जेहत्ते काळाचे ठाई महाराष्ट्र देशी मराठी वृत्त सृष्टीमध्ये बहुत बावचळलेपणा भरलेला दिसतो आहे. भोपाळशेठ यांच्या अमराठी आक्रमणापुढे साऱ्या मराठी पुत्रांनी नांगी टाकली. ट्रायल भूमी औरंगाबाद मध्ये जबरदस्त मुसंडी मारून आता दिव्य प्रकाश साऱ्या महाराष्ट्र देशी पसरणार आहे. या प्रकाशात उजळून निघण्यासाठी नारदाचे वंशज सरसावले आहेत. याला कोणाही मालकाचे बंदे अपवाद नाहीत. ये कारणे, काळ्या पांढऱ्या दाढीमुळे औरंगाबादेत प्रचंड मोठे खिंडार पडल्याने त्रस्त झालेल्या मालकांनी शनिवारवाड्याच्या पाठीमागून एक मनोरंजक फर्मान काढले असल्याचे कळते. त्यांनी दिलेल्या या वेठबिगारीच्या ऑफरमुले पुण्यापासून नागपूरपर्यंत आनंदी आनंद पसरल्याचे वृत्त आहे. काय आहे या मध्ये? -
ऐका...
नवी पगारवाढ मिळण्याआधी कर्मचाऱ्यांनी एक करार करणे आवश्यक आहे. या नुसार तीन वर्षे आमचा पेपर सोडून कुट्ठे कुट्ठे जायचे नाही. (आम्ही नाही जा !) समजा, जायचेच झाले तर ३ महिन्याची नोटीस द्यायची. (कित्ती मज्जा) नाही तर ३ महिन्याचा पगार कापणार! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे - बाहेर जायचे तर जा पण प्रतिस्पर्ध्याकडे जायचे नाही !!!! आता प्रतिस्पर्धी कोण, हे यात स्पष्ट नाही! प्रत्येक पेपर प्रतिस्पर्धी ठरू शकतो! मग काय? - मर मेल्या उपाशी!
साम्प्रतला समस्त उभ्या महाराष्ट्रात या नव्या वेठबिगारीची चर्चा चालू आहे. पगारवाढीआधी करारावर सही हवी, पण पगारवाढ किती, हे गुलदस्त्यात आहे. तीन वर्षे सोडायचे नाही, पण तीन वर्षे किती पगार वाढवणार, हे सांगणार नाही... काय करावे? कुठे जावे? 
पत्रकारांवरील या 'हल्ल्या'विरुद्ध कोणी आवाज उठविणार का हो एस. एम. सर?