14 सितंबर 2011

क्षण एक पुरे ‘प्रेमा’चा... मजनू होतो प्रेम‘दासा’चा...

पेपरवाल्यांनी पेपर काढून विकण्याबरोबरच इतर अनेक उद्योग सुरू केल्याने वृत्तपत्रांच्या कचेरीमध्ये पत्रकारेतर कर्मचार्‍यांची बरीच भाऊगर्दी (आणि बहिणगर्दी) दिसू लागली आहे. एकेकाळी युवामंच असत. आता सख्यांचे मंच असतात. व्यापार्‍यांचे मंच असतात. उद्योगांचे मंच असतात. वाचक सोडून सगळ्यांचेच मंच असतात. (वाचक आपले ‘मुकी बिचारी कुणीही हाका’टाईप असतात. मध्येच ‘मर्जी’ जाणून घेण्याची उबळ काही जणांना येते. पुन्हा सारे काही शांत शांत)

तर अशाच एका मंचाच्या बहिणबाईंची ही कथा. सिद्धेश्र्वरनगरीत एक दैनिक राज्य करीत होते. (‘एक राजा राज्य करीत होता’च्या धर्तीवर ही कल्पना कशी वाटते?) या राज्यात प्रजाजन कमी पगारात भरपूर काम करीत होते. राज्यात सख्यांसाठी विशेष मंच होता. (सख्याहरींसाठीही असाच एक मंच असावा, अशी मागणी अनेकांनी केली होती पण हे प्रकरण आपल्याला आवरणार नाही, हे लक्षात घेऊन राजाने त्याला मनाईहुकुम बजावल्याचे कळते.) या सख्यांच्या मंचाचा गल्ला सांभाळणार्‍या बहिणबाईकडे अधूनमधून सख्यांना एकत्र करण्याचेही काम असते म्हणे. तर या बहिणबाईंनी आपल्या सर्व सख्यांचा समस्त तपशील आपल्या संगणकात बंदिस्त करुन ठेवला. हा तपशील आपल्याकडे बंदिस्त स्वरुपात असल्याचा त्यांचा समज एकदा खोटा ठरला आणि या राज्याच्या जाहिरातमंत्र्यांनी आपल्या संगणकावरून तो पळविला असल्याचे त्यांच्या म्हणे लक्षात आले.

ते जाहिरातमंत्री तर या सखीमंत्री. असे परस्पर चोर्‍या चपाट्या करून कसे चालणार? (अशा चोर्‍या करायला ही काय ‘मर्जी’ची थीम थोडीच आहे?) असो. तर या मंत्रीणबाईंनी त्या मंत्र्यांविरुद्ध राजांकडे तक्रार गुदरली. (गुदरली हा शब्द वापरताना आम्हाला नेहेमीच हसू फुटते) राजांनी तटस्थपणी दाखविण्यासाठी चौकशी सुरू केली. (अशी चौकशी सुरू करावीच लागते. म्हणजे तक्रार करणार्‍याचे समाधान होते आणि ज्याच्याविरुद्ध तक्रार असते त्याच्याववरही वचक बसतो! हे आपले स्वानुभवी तत्वज्ञान!)

अशा तक्रारींचे पुढे काय होते, हे सर्वांनाच माहिती असते. राजाला काय, कुठूनही आपला महसूल वाढण्याशी देणेघेणे असते. त्यामुळे या चोरीचा त्याला मनस्वी आनंदच झाला होता. पण नाटक करणे भाग असते. आपल्या अंमलाखालील विविध ठिकाणच्या इंजिनिअरना बोलावून एक समिती गठित करण्यात आली. या समितीने सिद्धेश्वरनगरीत जाऊन या दोन्ही मंत्र्यांच्या संगणकांची, त्यांच्यातील जोडांची आणि त्यातील साठ्याची बारकाईने पाहणी केली. आता खरी गंमत तर पुढेच आहे.

ही पाहणी मुदलात होती ती जाहिरातमंत्र्यांच्या चोरीसाठी. त्याचे काय काय झाले, ते कळले नाही. पण भलतीच गंमत तेथे घडल्याचे आमच्या कानावर आले. त्याचे झाले असे, की सखीमंत्री आणि बातमीमंत्री यांच्यात सख्यांच्या मंचावरून, राज्याच्या भरभराटीवरून बरीच सखोल चर्चा होत असे म्हणे. या चर्चेसाठी या बहिणबाई संबंधित बातमीमंत्र्यांच्या बंदिस्त कक्षात स्वतःला बराच वेळ बंदिस्त करून घेत असत म्हणे. या बांध-बंदिस्तीबरोबरच त्यांचा संगणकीय संवादही चालू असे म्हणे. नेमका हाच संवाद या तज्ज्ञ इंजिनइरांच्या हाती पडला आणि मग काय महाराजा... काय गंम्म्म्मत झाली म्हणून सांगू... मूळ तक्रार राहिली बाजूलाच...!

प्रेमाचा दास झाल्यावर पत्रकाराचा मजनू होतो आणि मग काय महाराजा, सखी तर अशा वेळी तयारच असते...

तात्पर्य काय? माणसांच्या बदल्या दूर दूर करू नये. कुटुंबापासून दूर राहिले की भावना अनावर होतात आणि दुधाची तहान पर्यायी दुधावर भागवावी लागते...!!!!