30 सितंबर 2011

भोपाळसेठ, How do you do?


आदरणीय भोपाळसेठ यांना,


जय अग्रसेन,

महाराष्ट्रातील समस्त वाचकवर्गांतर्फे साष्टांग प्रणिपात. आम्ही मराठी माणसे काही ‘भव्य-दिव्य’ असेल तरच साश्तांग प्रणिपाताच्या भानगडीत पडतो. अन्यथा साध्या नमस्कारावर भागवतो. ज्या अर्थी आम्ही आपणास साष्टांग प्रणिपात करीत आहोत, त्या अर्थी त्याचे कारणही काही ‘भव्य-दिव्यच’ असणार, हे नक्की. वास्तविक आपल्या प्रॉडक्टच्या नावातच ‘दिव्य’ असल्यामुळे सर्वांनी आपल्या चरणी पर्मनंट साष्टांग दंडवत घालत आले पाहिजे अशी आपली अपेक्षा असणे साहजिकच आहे. म्हणोनच आम्ही आमचा साष्टांग प्रणिपात आपले चरणी रुजू करतो.

तर पत्रास कारण की सध्या आपल्या ‘प्रॉडक्ट’चे अश्व चौखूर उधळताना दिसत आहेत. फक्त चौखूर उधळताना एका वेळी किमानपक्षी दोन खूर तरी जमिनीवर टेकावेत अशी अपेक्षा असते. चारही खूर हवेत असतील आणि मांड पक्की नसेल तर तोंडघशी आपटावे लागते. तसेच घडताना सध्या दिसत आहे. मलिक अंबरच्या नगरीतील आमच्या एका जबाबदार वाचकाने पाठविलेले निवेदन आम्ही नुकतेच प्रकाशित केले होते. (आमचे बंधू बेरक्या यांनाही त्यांनी ते पत्र पाठविलेले दिसले. कारण तेथेही ते प्रकाशित झाले. एकच लेख दोन ठिकाणी छापण्यास आम्ही हरकत घेत नाही, कारण आमचा वसा लोकशिक्षणाचा आहे.) तर सांगण्यास हरकत नाही की आपल्या संशोधकांनी मोठ्या संशोधनांति प्रकाशित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कॉफीटेबल बुकमधून आपल्या दैनिकालाच मुक्ती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाच पुस्तकात किती घोटाळे असावेत? कोण आहेत याचे कर्ते-करविते?

महाराष्ट्रातील सर्वात जास्त पगाराची नोकरमंडळी आपण नेमली आहे. हा पगार नेमका कशासाठी देता बरे? बरे, माणसे नेमतानाही आपण अशी अशी माणसं नेमली की ज्याचे नाव ते...! कुमारस्वामींबद्दल तर आम्ही खूप आधी आपणास सावध केले होते. ‘सटवाईला मिळाला म्हसोबा’ अशी जगप्रसिद्ध कॉमेंटही आम्ही त्यावर केली. हे कुमारस्वामी काय करतात बरे? त्यांनी ही प्रुफे पाहिली नव्हती का? की ते प्रुफे पाहत नसतात? असो, हा तुमचा परस्पर व्यवहार आहे. आम्ही त्यात कशास पडावे?

आपले ‘सल्लागार’ काय करतात? की ते तुमचे पोटभाडेकरू आहेत? ते आर्थिक क्रांतीत मग्न असतात. तिकडे जीव असलेला माणूस इकडे तुमचा सल्लागार! छान आहे. तुमचा पगार खाऊन तुमच्याचकडे ते दर रविवारी आर्थिक क्रांतीचे धडे देतात! खरे सांगायचे तर ते आर्थिक क्रांतीच्या क्षेत्रातील आद्य क्रांतीकारक आहेत. एकेकाळी मलिकअंबरच्या नगरीत सकाळीच प्रकाशित होणार्‍या एका नियतकालिकाचे प्रमुखपद त्यांच्याकडे असताना त्यांनी अशा अनेक आर्थिक क्रांत्या तेथे घडविल्या. त्या जोरावर त्यांनी पुण्यनगरीत एक फ्लॅट असताना मलिकअंबरनगरीत बंगला बांधला आणि पुण्यनगरीत आणखी एक फ्लॅट बुक केला! आपल्या आगमनापूर्वी पत्रकारितेतील पगार होतेच किती? एवढ्या पगारात इतकी घोडदौड? कमाल है! ही खरी आर्थिक क्रांती. यात किती रिपोर्टरांचे योगदान आहे, हा संशोधनाचा विषय!

तर, अशा या सल्लागाराची मदत या पुस्तकासाठी आपण का नाही घेतली बरे? पण घेतली असती तरी काय झाले असते? हे मुळातच घोटाळेबाज! परवा अमेरिकेवरील हल्ल्याची दशकपूर्ती साजरी झाली. या निमित्ताने आम्हास काही गोष्टी आठवल्या. त्या बाबत इंटरनेटवर बरेच काही काही समोर येत असते. तशातच शेजारचा फोटो समोर आला. ते पाहून आमच्या पूर्वस्मृती जागल्या. या सद्गृहस्थांनी त्या काळी हा फोटो पहिल्या पानावर छापून ‘WTCवरील हल्ल्याआधीचा दुर्मीळ फोटो’ असे वर्णन केले होते. वास्तविक हा फोटो म्हणजे मोठाची विनोद होता. अखेर त्या दैनिकाची राज्यभर पुरती नाचक्की झाली आणि दुसर्‍या दिवशी त्यांना राज्यभरातून छी-थू सहन करावी लागली. वर माफीही मागावी लागली. हा वारसा असणारी माणसे आपणास काय मदत करणार?

याशिवाय आपण नेमलेले वेगवेगळे ‘हेड’ काय करतात? एकदा खराखुरा हेडकाउंट कराच. खरे हेड किती हे कळल्यानंतर आपले हेड नक्कीच जागेवर राहणार नाही? बघा, काहीतरी चांगले करा. आपण एवढ्या दूरवरून आला आहात. जरा जवळून निरीक्षणाची सवय लावून घ्या. फायद्यात राहाल.

जय भोपाळ.