19 सितंबर 2011

दिव्य मराठीने पाजळले अकलेचे दिवे, ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे मार्केटिंग हवे’


औरंगाबाद येथील एका वाचकाने पाठवलेला हा लेख जशास तसा देत आहोत.
- बोरुबहाद्दर

दैनिक दिव्य मराठीने 17 सप्टेंबरच्या मुहुर्तावर ‘हैदराबाद मुक्तीलढा आणि मराठवाडा’ या नावाने एक कॉफीबुक (टपरीवर काचेच्या गिल्लासात कट चहा पिणार्‍या आम्हा मराठवाड्यातील जन्तेला कॉफी कशी माहिती असणार? कॉफीबुक म्हणजे काय ते कसे कळणार?) प्रकाशित केले. मराठवाडी जनतेच्या भावनांना हा विषय नेहेमीच हात घालणारा आहे. मराठवाडी अस्मितेला चुचकारताना मात्र ‘दिव्य मराठीकारांनी’ ज्या असंख्य चुका करून ठेवल्या आहेत, त्या पाहता ‘दिव्य मराठी’चे मार्केटिंग करताना त्यांनी काहीच तारतम्य बाळगलेले नाही, असेच स्पष्ट होते आहे.


1) या ‘कॉफीटेबल बुक’च्या मुखपृष्ठावरील शीर्षकापासूनच चुकांना सुरवात झाली आहे. ‘हैदर अलीने आबाद केलेले ते हैदराबाद’ असा संदर्भ असताना इथे तो शब्द चक्क ‘हैद्राबाद’ असाच आला आहे. हे ‘हैद्रा’ कोण? ही चूक आतील पानांवर मात्र दुरूस्त झालेली दिसते!

2) ‘स्टेट एडिटर’ हे पद भूषविणारे श्री. अभिलाष खांडेकर यांना भारताचा नकाशा वाचता येत नसावा. त्यांनी या पुस्तकाच्या प्रारंभी लिहिलेल्या प्रस्तावनेत हैदराबाद संस्थानाचा ‘देशातील हा असा एक कोपरा होता, जो निजामाच्या जोखडातच राहिला’ असा उल्लेख केला आहे. कोणत्या अर्थाने हैदराबाद संस्थान ‘कोपरा’ ठरते?

3) ‘आपण खेकड्याची वृत्ती स्वीकारल्याने मुक्तीलढ्याचे स्मारक अद्याप होऊ शकले नाही, हे एक कारण हे पुस्तक लिहिण्यामागे आहे’ (‘कॉफीटेबल बुक’ - प्रकरण पहिले - पृष्ठ 13) असे एक वाक्य यात आहे. यामधील ‘आपण’ म्हणजे कोण? मराठवाड्यातील जनता हे पुस्तक लिहिते आहे का?

4) ‘पर्यटनाचे वा पेंग्विन नॅशनल जिऑग्राफीचे आकर्षक प्रत्येक पान ग्लॉसी. सुंदर छायाचित्रांसह असावे, जेणेकरून लोक कुतुहलापोटी पाहतील, त्याची जास्त जाहिरात होईल. तरुण पिढी, परप्रांतीय व मराठवाड्याबाहेरील लोकही हे पुस्तक चाळतील ही देखील एक कल्पना. अगदीच व्यावसायिक भाषेत बोलायचे झाले तर ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे मार्केटिंग वा ब्रँडिंग होईल.’ इथे ‘दिव्य मराठी’ नेमके कशाचे मार्केटिंग करू पाहत आहे? मुक्तीसंग्रामाचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मार्केटिंग आणि ब्रँडिंग केले तर नेमके कोणाचे आणि काय भले होणार आहे? अण्णा हजारेंच्या आंदोलनात कुठलेही मार्केटिंग व ब्रँडिंग नसताना उत्स्फुर्तपणे लाखोंच्या संख्येने सहभागी होणारी तरुण पिढी ‘दिव्य मराठी’च्या मार्केटिंगमुळे हैदराबाद मुक्तीसंग्रामाकडे आस्थेने बघेल, असे त्यांना वाटते! जणू हे दैनिक नसल्याने आजवर मुक्तीलढ्याची काहीच माहिती जनतेला झाली नव्हती!

5) या ‘कॉफीटेबल बुक’च्या पृष्ठ क्रमांक 14 वर ‘का हा अन्याय? याचं कारण एकच की याचं मार्केटिंग स्टेट, राष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे कधी झालंच नाही. ते व्हावे म्हणून हा प्रपंच.’ ... ‘माझ्या मते मुक्तीलढ्याला प्रसिद्ध तंत्र नसल्याने या लढ्याबद्दल अधिक माहिती पुढे यावी’ या वाक्यांचा अर्थ काय? पहिले संपूर्ण प्रकरण अशा अनेक विसंगत व अप्रस्तुत विधानांनी भरलेले आहे. 

6)  या ‘कॉफीटेबल बुक’च्या पृष्ठ क्र. 15 वर ‘गोविंदभाई श्रॉफ यांनी सोशालिस्ट (समाजवादी पक्ष) पार्टी काढली.’ असा उल्लेख आहे. खरं तर गोविंदभाईंनी काढलेल्या पक्षाचे नाव ‘लीग ऑफ सोशालिस्ट वर्कर्स’ असे आहे. याच पानावर पुढे असे म्हटले आहे, की ‘स्वातंत्र्यसैनिकांचे सत्तेतील व सत्तेबाहेरील असे समाजवादी विरुद्ध कॉंग्रेस असे गट पडले. त्यांनी एकमेकांकडे, त्यांच्या मुक्तीसंग्रामातील कामगिरीकडे दुर्लक्ष केले. मात्र, गोविंदभाई श्रॉफ हे टॉवरिंग पर्सनॅलिटी असल्यामुळे व नंतर ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यर्‍त झाल्यामुळे नेहेमी चर्चेत व पुस्तकात राहिले. इतर मात्र तेवढे राहिले नाहीत.’ या वाक्यातून दिव्य मराठीच्या विद्वानांना आपले नेमके कुठले ज्ञान पाजळायचे आहे? सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत पार आधीपासून गोविंदभाई सक्रीय होते. आणि दिव्य मराठी 
मात्र ते नंतर कार्यरत झाल्याचे सांगते!

7) या ‘कॉफीटेबल बुक’च्या दुसर्‍या प्रकरणातील दुसर्‍याच ओळीत ‘14 जिल्ह्यांचे मिळून हैदराबाद संस्थान झाले’ म्हटले आहे. यापुढे ‘नकाशात पाहा’ असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात नकाशात पाहिल्यानंतर तेथे मात्र 15 जिल्हे नोंदविलेले दिसतात. नकाशातील एकूण जिल्हे तीन पाने मागे आल्यानंतर 1 ने कमी होतात, ही जादू कुठल्या स्टॅटिस्टिक्सचे द्योतक आहे? यापुढे या दैनिकाने उपसंपादक, प्रुफरीडर, आर्टिस्ट यांच्याबरोबरच एक ‘स्टॅटेस्टिशियन’ही नेमायचा का?

8) या एकंदर 122 पानी पुस्तकात अक्षरशः पानोपानी चुका आहेत. केवळ वानगीदाखल वरील उल्लेख केलेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ यांचे या लढ्यावरील मूळ पुस्तक ‘हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या आठवणी’ याचा कुठेही उल्लेख सापडत नाही. अखेरच्या पानावर दिलेल्या संदर्भ ग्रंथांच्या यादीतही. या लढ्याच्या सेनापतीने लिहिलेल्या पुस्तकाचीही दखल दिव्य मराठीला घ्यावीशी वाटली नाही. बहुधा स्वामीजींचे ‘मार्केटिंग व ब्रँडिंग’ कमी पडले असावे!

9) हे संपूर्ण पुस्तक मराठीत लिहिले गेले आहे. (यातील काही इंग्रजी शब्दही - उदा. : ‘शो’, ‘टॉवरिंग पर्सनॅलिटी’, ‘ग्लॉसी’, ‘मार्केटिंग व ब्रँडिंग’, ‘ऑप्शनला’, ‘पोलिस ऍक्शन’ इ. - देवनागरी लिपीतच लिहिले गेल्याने या पुस्तकाला मराठीतील पुस्तकाचा दर्जा देण्यास हरकत नाही. पण सहाव्या पानावर ‘प्रोजेक्ट टीम’ अशा इंग्रजी शीर्षकाखाली ‘प्रोजेक्ट कोआर्डिनेटर - वृषाली घाटणेकर, रिसर्च - डॉ. महेश सरवदे, एडिटोरियल टीम - रमेश धाबे, प्रवीण देशपांडे, रोहन पावडे, शरद काटकर, बाबासाहेब डोंगरे, सय्यद नजाकत, दिनेश लिंबेकर, फोटोग्राफी - किशोर निकम, माजीद खान आणि डिझाईन व छपाईवाला अशी सर्व नावे शुद्ध इंग्रजीतून दिली आहेत. हे का म्हणून बरे? पान 5 वर या वृत्तपत्रसमूहाचे अध्यक्ष अग्रवालसेठ स्वतः आपले मनोगत ‘लढवय्यांबद्दल कृतज्ञता’ मराठीत व्यक्त करतात. पण इतरांना इंग्रजीचा आधार का घ्यावासा वाटतो? अशामुळे हे पुस्तक - सॉरी कॉफीटेबल बुक - इंटरनॅशनल दर्जाचे होईल, असे वाटते का?

या ‘कॉफीटेबल बुक’ला ‘महात्मा गांधी मिशन’ या संस्थेने प्रायोजित केले आहे. यात काय व्यवहार झाला, याच्याशी आम्हाला काहीही देणेेघेणे नाही. पण जेव्हा या संस्थेचे सचिव अं. ना. कदम आपल्या छायाचित्रासह या ‘कॉफीटेबल बुक’च्या सातव्या पृष्ठावर ‘स्मरण हुतात्म्यांचे’ व्यक्त करतात, तेव्हा या पुस्तकात काय छापून येते आहे या विषयीही त्यांनी तज्ज्ञांकरवी खातरजमा करून घ्यावयास हवी होती. दान सत्पात्री पडावे, असे थोरामोठ्यांनीच सांगून ठेवले आहे...!

- एक जागरूक वाचक