1 सितंबर 2011

खुषखबर... कुमारस्वामी आता ‘खा.’ होणार...!

खुष खबर... खुष खबर... खुष खबर... महाराष्ट्र देशीचे महान पत्रककार श्री श्री कुमारस्वामी यांच्या गळ्यात लवकरच ‘खा.’ पदाची माळ (अखेर) पडणार असल्याचे आमच्या खात्रीलायक सूत्राकडून (म्हणजे आमच्या मनातल्या मनात) कळते. 


श्री श्री कुमारस्वामी (श्री श्री ही दुहेरी उपाधी त्यांच्याबद्दल आमच्या मनातील परम आदर दर्शविणारी आहे. गैरसमज नसावा) म्हणजे निधड्या छातीचा पत्रकार! आतापर्यंत त्यांनी आपल्या स्वतःच्या छातीत कित्येक गोष्टी दाबून ठेवल्या. योग्य वेळी त्या त्यांनी बाहेर काढल्या. त्यांच्या अनेक इच्छा होत्या. महाराष्ट्रदेशीच्या सर्वाधिक दैनिकांच्या प्रमुखपदावर काम करून दाखवीन ही प्रतिज्ञा त्यांनी त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईसमोर केली होती असे मध्यंतरी त्यांच्या मावशीकडून आम्हाला कळले. (या मावशींचा चिरोटे तयार करून विकण्याचा व्यवसाय आहे. पुण्यात आमच्या शेजारीच राहतात.) लहानपणी आपल्या आईला दिलेले वचन म्हातारपणापर्यंत जाताना (खरे तर आम्ही त्यांना म्हातारा म्हणू इच्छित नव्हतो. पण शब्दांचा परिणाम उठून दिसण्यासाठी हा शब्द वापरण्याचा नाईलाज आहे. क्षमस्व) स्मरणात ठेवण्याची त्यांची शक्ती खरोखरच स्पृहणीय आहे म्हणायची. आतापर्यंत इंग्रजी-मराठी धरून मुदलात पाच पेप्रांच्या मेन मेन पोस्टवर श्री श्री कुमारस्वामी यांनी आपली योग्यता सिद्ध केली. सध्या त्यांच्या ‘दिव्य’ बुद्धिमत्तेचा प्रकाश सार्‍या संबंध अख्ख्या अखिल महाराष्ट्रभर फाकतो आहे. 


अर्धा भारत व्यापणार्‍या गटाच्या, अर्धा महाराष्ट्र व्यापणार्‍या पत्राचे आता ते अध्वर्यू आहेत. (पण याला अर्धवट म्हणायचे नाही. सांगून ठेवतो.) त्यांच्या लोकविलक्षण प्रतिभाविलासाने अख्खा महाराष्ट्र मंत्रमुग्ध झाला आहे. त्यांच्या पेप्रात छापून आलेल्या असंख्य चुकांकडे तमाम वाचक इतक्या मोठ्या मनाने पाहतात की ज्याचे नाव ते. त्यांचे अग्रलेख म्हणजे साक्षात सरस्वतीचे तांडवनृत्य ! (अरेरे ... उपमा चुकली वाटते) 
तर श्री श्री कुमारस्वामी यांच्या ‘खा.’ पदाबद्दल आम्ही बोलत होतो. ज्या प्रमाणे त्यांनी आपल्या मातुःश्रींना सर्वाधिक पेप्रांच्या प्रमुखपदांवर काम करून दाखविण्याचे वचन दिले होते तद्वतच त्यांनी आपल्या (तत्कालीन) प्रेयसीस (प्रोबेशनवर असताना इंप्रेशन मारण्यासाठी) कधी ना कधी ‘खा.’ होऊन दाखवीन अशी बढाई मारली होती. ‘खा.’ झाल्यावरच आपण (आपल्या लग्नाचे) लाडू खाऊ असे तिने सांगितल्याने त्यांचा नाईलाज झाला. तो नाईलाज कायम राहिला. (एरव्हीही पत्रकारांना पोरी देण्यासाठी त्यांचे बाप नाराजच असत. दरिद्री पत्रकाराला पोरगी देण्यापेक्षा विहिरीत ढकललेली बरी, असे त्यांचे म्हणणे असते. त्यामुळे आमचीही खूप अडचण झाली होती. आता बरे आहे.) तर सांगायचा मुद्दा हा, की आताही ती त्यांना (आपल्या पती व मुलांसह) भेटत असते आणि नजरेनेच ‘खा.’बद्दल विचारत असते ! ती नजर (म्हणजे काय बाप्पा...!) त्यांना बोचत असते. त्यामुळे ते आता जिद्दीला पेटले आहेत.

खरे तर याची सुरवात झाली ते महाराष्ट्र वर्तमानाच्या काळात. ते समयी (म्हणजे साधारण 1997 साली) भारतवर्षी सोनियाचा दिनु उगविला होता. या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघत श्री श्री कुमारस्वामी यांनी भारतभर त्या किरणांचा पिच्छा पुरविला आणि सार्‍या आयुष्याची लेखणी एका महिन्यात झिजविली. हे फिरणे इतके होते, की एखाद्यास कमरेची व्याधी जडावी.) हे महाराष्ट्र वर्तमान की सोनियाचा दिनविशेष हेच कोणाला कळेनासे झाले होते. याचा उत्तरार्ध म्हणून त्याच वेळी सोनियाचा उंबरा ओलांडून ‘खा.’ होता येईल असे त्यांना वाटो लागले. पण हाय रे रामा... (सॉरी. श्री श्री कुमारस्वामी यांना रामाची ऍलर्जी आहे.) हाय रे दैवा... (पुन्हा सॉरी. त्यांना दैववादाचीही ऍलर्जी आहे) जाऊ दे... मरू दे... बाईंना मराठी पेप्रं पाहण्याची रुची नव्हती आणि विंग्रजीतून निघणारे त्यांचे भावंड वर्तमान श्री श्री कुमारस्वामी यांचे ट्रान्सलेशन विंग्रजीत छापणेस तयार नव्हते. ते मुळे ती मेहनत मागे पडली. मग कालौघात श्री श्री कुमारस्वामींनी खूप मेहनत घेतली. कधी महाराष्ट्राचे वर्तमान वापरले तर कधी लोकांची सत्ता. कधी शेठजींचा पदर धरला तर कधी भोपाळसेठांचे धोतर. पण अद्यापपर्यंत उपेग काही झाला नाही. 

पण काळाच्या ओघात त्यांची धार (म्हणजे त्यांच्या लेखणीची धार) भाजप-संघाच्या बाबतीत खूपच तीक्ष्ण होत गेली. जे प्रमाणे मुंबईतील गटारांचा प्रश्न मांडताना ते पॅरिसच्या नाईटक्लबबाहेरील सांडपाण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतात तसेच दुष्काळ, दंगली, राजकारण, परीक्षेतील गैरव्यवहार, राजकारणातील भ्रष्टाचार, रस्त्यांची दुरवस्था, कूपनलिकेत अडकलेली बालके, हातपंपांचा प्रश्न, वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण, अण्णांचे आंदोलन, कोकण रेल्वेमार्गावर कोसळणार्‍या दरडी, रेल्वेस्टेशनवरील चहाचा दर्जा या प्रत्येक गोष्टींचा संबंध ते संघपरिवाराशी जोडून त्याचा खरपूस समाचार घेऊ शकतात. याच मुद्‌द्यावर चिदंबरम गृहमंत्री होऊ शकतात तर आपण ‘खा.’ कसे होऊ शकत नाही, या विचाराने त्यांना सध्या पछाडले आहे म्हणे.

दिव्याचा प्रकाश पसरवताना पहिल्या दिवसापासून त्यांनी ही काळजी घेतली आहे. त्यामुळे अनेक वेळा चमत्कारिक स्थितीही उद्भवली. पण असे चमत्कार त्यांच्याच लीलेचे भाग आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य. पर्वा अण्णांच्या आंदोलनाला संघाचा पाठिंबा असल्याची खबर लागताच त्यांना परमसंतोष झाला आणि त्या संतोषाच्या भरात (आवेगात म्हणायचे होते) त्यांनी खरपूस अग्रलेख लिहून टाकला! अग्रलेखात भाजप, संघपरिवाराचा उल्लेख नसेल तर त्यांचा ऑपरेटर कामच करत नाही म्हणे!

मध्यंतरी मा. पंतप्रधानांनी निवडक संपादकांना चर्चेसाठी बोलावले तेव्हा श्री श्री कुमारस्वामी पहिल्या पाचात (म्हणजे निमंत्रित केलेल्या पाच जणांत पाचवे) आले. एक पत्रकार म्हणजे एक स्तंभ म्हणायचे झाले तर हा पाचवा स्तंभ. तर त्यांनी तेव्हाही आपल्यात पंतप्रधान अवतरल्याचे दाखवून देताना ‘खा.’ ची चव अनुभवण्याचा प्रयत्न केला. टीव्हीवर त्यांचे दर्शन सार्‍या मराठी जगाला जाहले.

टीव्हीवर आल्याशिवाय ‘खा.’चा मार्ग प्रशस्त होणार नाही म्हणून आता त्यांनी तार्‍यांच्या चौकटीत आपला चेहरा प्रकट करण्यास सुरवात केली आहे. या बदल्यात तार्‍यांच्या राज्यातील राजाला आपल्या कॉलमातील चौकट त्यांनी बहाल केली. दोघांचेही बरे चालले आहे, असे म्हणतात.

तर मूळ मुद्दा हा, की उद्या-परवा कॅन्सर उपचारांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या रुग्णालयातून उपचार घेऊन बाईसाहेब परतल्या की श्री श्री कुमारस्वामी आपल्या अग्रलेखांची आणि रविवारच्या लेखांची आणि मागील 20 वर्षांतील लेखांची फाईल घेऊन भेटीला जाणार आहेत म्हणे. एवढ्या फायली पाहूनच बाईसाहेब त्यांना ‘खा’ म्हणतील अशी त्यांना आशा आहे. 

मागून आलेले अनेकजण पुढे गेले, महाराष्ट्राच्या वर्तमानातूनच गेले याचे त्यांना फार वाईट वाटते, असे त्यांची कामवाली सांगत होती. कामवालीला तिच्या मालकिणीने सांगितल्याचे कळते. त्यांची आमची कामवाली एकच. म्हणून आम्हाला हे वर्तमान कळले. असो. एक मराठी माणूस ‘खा.’ होणार असेल, तर राज ठाकरेंच्या खालोखाल आनंद आम्हाला होणार. या आनंदातच ही बातमी आपणापर्यंत पोहचविण्याचे आम्ही ठरविले.
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे भोपाळकडे...