3 मार्च 2011

औरंगाबाद ः मिडियातील भूकंपाचे सध्याचे ‘इपिसेंटर’...!

पत्रकार आणि साहित्यिक जमातींना वाहिलेल्या आमच्या ‘बोरुबहाद्दर’ या ब्लॉगचे उदघाटन अशा जंगी स्वरुपात करताना आम्हाला प्रचंड, म्हणजे काळजात मावणार नाही येवढा आनंद होत आहे. याचा शुभारंभ मराठवाड्यापासून कर्ताना(आम्हाला ‘करताना’ असे लिहिता येते बरे !)तर हा आनंद गगनाला जाऊन टेकतो. मराठवाड्याच्या अनुशेषाकडे आम्ही केव्हढ्या गांभीर्याने पाहातो, हेच यातून आपल्या लक्षात येईल.
औरंगाबादकरांनी मोजून दीडशे ‘मर्सिडिझ’ काय घेतल्या आणि सार्‍या जगाचे लक्ष, मोजून दहा लक्ष लोकसंख्येच्या या महानगराकडे वेधले गेले. या महानगरात भर्पूर (भरपूर - आम्हाला हे ही लिहिता येते बरें) पैसा आहे, असाच सगळ्यांचा गोड गैरसमज झाला. आदरणीय लोकमतकार माननीय बाबुजी दर्डा (धाकटी पाती उर्फ ऋषीजी) यांनी आपल्या लोकमतातून या घटनेची येवढी टिमकी वाजवली की सगळे पेपरवाले आपली कामेधामे सोडून औरंगाबादी निघाले. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या (की मराठवाडा मुक्ती संग्राम? न्या. चपळगावकरांना विचारून खात्री करू या) पासूनचा अनुशेष एका झटक्यात भरून काढायला सगळे जण सरसावले आहेत. सगळे म्हणजे ‘मिडिया’वाले. सध्या मिडियावाल्यांचे एक बरे आहे. ते म्हणतील ती पुर्व दिशा. मग वाचकांची ‘मर्जी’ काहीही असो. या मर्जीवरून आठवले, मराठवाड्यात लवकरच पेपरवाले तमाशा बार्‍यांचे आयोजन करणार आहेत, असे कळते. सध्या सगळेच पेपरवाले इव्हेंटमध्ये घुसल्याने भयंकर मारामारी सुरू आहे. कुणी वाहनं विकतात, कुणी घरं विकतात, कोणी कन्झ्युमर अप्लायन्सेस विकतात... जमलं तर पेपर विकतात...! तर अशा मराठवाड्यात सध्या ‘मर्जी जाणून घेण्या’ची आणि ‘मर्जी चालविण्या’ची अहमहमिका लागली आहे. कोण कसा नाचतो, कुणाच्या पायातले चाळ खणखण वाजतात त्यावर त्यांच्या धंद्याचा छनछनाट अवलंबून राहणार आहे असे कळते. त्यामुळे सगळेच दारोदार भटकत जन्तेच्या फर्माईशी गोळा करण्यात लागले आहेत.
भास्करवाल्यांचा मराठी सूर्य आता एक मे पासून औरंगाबादी उगवणार असल्याचे कळले आहे. मराठीचा सूर्य उगवताना त्याला जोड देण्यासाठी हिंदीचा भास्करही अकोल्याचा पेपर औरंगाबादी छापून मराठवाड्यात देणार असल्याचे वर्तमान आहे. जागरणवालेही येऊन गेल्याचे कळले आहे. मग पुढारी का मागे राहणार? ते तर चार वर्षे ‘सुरू होणार - सुरू होणार...’ असे ऐकवत आहेत. आता ते पुण्याची एडीशन औरंगाबादेत छापून विकणार असल्याचे कळले. म्हंजे (म्हणजे - आम्हाला हेही लिहिता येतं) हे ‘सकाळ’सारखंच झालं की - ‘मराठवाड्याचे पाणी - पुणेरी वाणी’.
असो, पण एकंदरीत सध्या औरंगाबादी धम्माल चालली असल्याचे आमच्या सूत्रांकडून कळते. सूत्रांची नावे सांगायची नसतात !

कॉन्ट्रॅक्टची पोरं लावून मर्जी चाचपण्याची सोय झाली, मग दुसरा पेपरवाला कुठं काय करतो आहे, याच्या चौकशा सुरू झाल्या. सगळ्या पेपरवाल्यांचे म्यानेजरसायेब उन्हातान्हाचे पाणीबाटल्या सांभाळत ‘एमआयडीशा’ (‘एमआयडीसी’चे अनेकवचन) फिरू लागले. शेंद्रा ते वाळूंज, सगळीकडे फिरूनही अनेकांना खरी माहिती कळेना. वरून मालक प्रवर्गाचा दट्‌ट्या सुरू. येवढी वर्षं म्यानेजरचा पगार घेता, नवा प्रेस कुठं उघडतो ते कळेना? पण खरी फ्याक्ट ही की खरंच काही कळेना...! कसं कळणार, येवढ्या वर्षात एसीची सवय लागली. अशिष्टंट सांगणार, हे ऐकणार. दोघांचाही सरक्यूलेशन ग्राऊंडशी संपर्क तुटला. कोणी तरी कुठून तरी माहिती देतं. हे वर पाठवतात. ‘सुटलो बाबा’ म्हणतात.

तर मंडळी, ह्याच्यात खरी चांदी झाली ती बोरुबहाद्दरांची. जिथं आठ - दहा हजारांना कोणी हिंग लावून विचारत नव्हतं, तिथं त्यांना तीस तीस हजारी  मनसबदारी दिली. आमच्या पुण्यातही येव्हढी पगारी नाहीत, तिथं औरंगाबादी बहाद्दरांचे नशीब फळफळलं. त्यामुळे पुण्यातून औरंगाबादी जाण्याची इच्छा बाळगणारे अनेक जण औरंगाबादच्या गाडीची चौकशी करू लागले. पण सगळ्या गाड्या हाऊसफुल्ल. पण औरंगाबादी पत्रकारांना मानले पाहिजे. काही काही जणांनी तर आपल्याला बोलावणे आल्याची नुसती  हूल उठवत पगार वाढवून घेतले. खरं काम करणारे मात्र तशेच राहिले, अशे म्हणतात.

असो. तर या भूकंपाचे धक्क्यावर धक्के मराठवाड्याला बसत आहेत. सध्या कुणी ‘शेठजी’कडे पुड्या बांधतो, तर कुणी  ‘मालका’कडे. आता नव्या धन्यांच्या सालदारीचे आडाखे बांधणे सुरू आहे. बरेच जण रांगेत आहेत. काही जण ‘मी नाही त्यातली’ म्हणत आतली कडी लावून घेऊन चर्चा करत आहेत. मुंबईचे केतकर मराठीचे दिव्य पार पाडणार असे कळताच विदर्भाचे केतकर मराठवाड्यात येणार असे जबरदस्त वातावरण तयार झाले. त्या पाठोपाठ मराठवाड्याचे केतकर त्यांना सपोर्ट करणार असेही जाहीर झाले. मग लोकांच्या सत्तेचे काय, असा प्रश्न मोजून दोन हजार वाचकांना पडला!

मुंबईत शेठजींच्या पुड्या बांधणार्‍यांनी आपणच नव्या मालकांचे पॅकिंग करणार असल्याची अफवा पसरवली पण झाले असे, की त्यांच्या अश्विन मासाने त्यांचा घात केला. नाक्यावरची रसपूर्ण जाग्रणे आंगलट आली. असो. अशीच आणखीही अनेक नावे चर्चेत आहेत. मुंबई ते औरंगाबादपर्यंतची ही रसाळ चर्चा चालूच राहणार आहे. 
तुर्तास इतकेच. 
लवकरच भेटू.