********
तर, आम्ही कोठे होतो? (असा प्रस्न विचारला की उगाचच आपण ज्येष्ठ झाल्यासारखे जाणवते.) सध्या मर्हाटी वृत्तपत्रसृष्टीत (सृष्टी कसली? हे तर वाळवंट.) कुमारस्वामींच्या खलित्याने खळबळ माजलेली आहे. आम्ही दस्तुरखुद्द मराठीचे दिव्य पार पाडणार आसोन सध्या या दिव्याचा प्रकाश फक्त औरंगाबाद नगरीच्याच नशिबात असोन आगामी दोन संवत्सरात त्याची आभा अखिल महाराष्ट्रदेशी फाकेल, असा विश्वास स्वामींनी आपल्या एसेमेसच्या द्वारे आपल्या भक्तगणांना दिला. या दिव्याच्या प्रकाशाच्या शोधात आम्ही औरंगाबाद महानगरीत पोहोचलो तेव्हा यष्टीस्टँडवर, रिक्षा स्टँडवर, कोपर्याकोपर्यावर, गटागटाने, अटीतटीने या दिव्याच्या प्रकाशाचीच चर्चा चालू होती. आजवर येथल्या दिव्यांनी पाजळलेल्या प्रकाशाचा विसर पडावा अशी ही धक्कादायक घटना होती !
आम्ही यष्टीस्टँडवर उतरोन रिक्षात बसलो आणि रिक्षावाल्यास म्हटले, हॉटेलात चला. त्याने एकवार आमचेकडे निरखून पाहिले आणि म्हटले, ‘तुम पत्रकार है क्या?’ आम्हास धक्का बैसला. आल्याक्षणी आमच्या पत्रकारितेची कीर्ती इथवर पोहोचावी? आम्ही मोठ्या मायेने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणालो, ‘हौ। तुमको कैसा समझ्या?’ तर तो म्हणतो कसा, ‘आजकल कोईभी आताय हौर होटेलको चलो बोलताय. तो हम उस्को अम्बॅसडेरमे पहुंचाते है। तुम्हारीभी हालत वैसीच दिखरी है, इसलिये अंदाज किया।’ आम्ही थोडेसे खिन्न जाहलो. पण म्हटले, चला - दिव्याची वातावरणनिर्मिती तर चांगली जाहली आहे.हाटेलात पोहोचलो. शेजारीच रामा इंटरन्याशनल होते. आम्हास जुनी आठवण जाहली. आदर्णीय शिसेप्रबाठा साहेबांच्या (म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या) ‘घुबड’ या शब्दावरून उडालेले रणकंदन आठवले. त्या पवित्र भूमीवर आमच्या बांधवांचे सांडलेले रक्त आठवले. आम्ही दस्तुरखुद्द तेथ पोहोचलो. त्या रक्तलांच्छित मातीचा टिळा आमच्या कपाळी लावला. आम्चे काही बांधव ज्या झाडावर प्राणरक्षणार्थ चढून बसले होते, त्या पवित्र ज्ञानवृक्षाचे आम्ही दर्शन घेतले. मनोमन पत्रपंडितांच्या जमातीचा जैजैकार केला आणि पुनश्च अम्बॅसडेरमध्ये आलो. आमच्या मातृदेवतेला स्मरोन सांगतो, अशा होटेलात येणेची मराठी पत्रकारांची हिम्मत फक्त पत्रकार परिषदेच्या वेळीच होते. अशा वेळी दमबाजी करोन चार पेग जादा रिचविण्याचा हट्टही आम्ही कधी काळी पुरा केला आहे, अन्यथा अशा ‘आहे रे’च्या होटेलावर आमचा ‘बहिष्कार’ असतो.
********
तर मंडळी, आम्ही कोठपर्यंत आलो होतो? (असा प्रस्न विचारला की पुन्हा एकवार उगाचच आपण ज्येष्ठ झाल्यासारखे जाणवते.) आतमध्ये टेबलावर दोन दाढीवाली आणि दोन बिनादाढीची माणसे बसलेली होती. एक दाढी पांढरीशुभ्र होती. दुसरी अर्धी पांढरी झाली होती. उरलेल्या बिनादाढीच्या दोघांपैकी एकाचे डोळे ‘कोब्र्या’सारखे भेदक होते तर दुसरा तसा शामळू वाटत होता. म्हंजे, तसा धीटपणाचा आव आणणे चालू होते पण आमची नजर म्हंजे पारखी नजर. एका झटक्यात आपण सगळे वळखतो. पैलाझूट आम्ही फूल पांढरी दाढीवाल्याला सवाल केला, (खरे तर येव्हडे दिवस हे लोक मुलाखतीवर मुलाखती घ्येत होते. पैल्यांदाच त्यांचेवर असा प्रसंग गुदरला. एक तर सगळ्यांना अरध्या अरध्या घटिकेचे अंतर ठेवोन पाचारण केलेले होते. आधीचा लवकर उरकला व्हता तर नंतरचा नेहेमीप्रमाणे जरा लेट पोहोचणार होता)
********
तर आम्ही सवाल केला, ‘महाराष्ट्रदेशी कैसे काय येणे केले?’
आम्ही : या तिघांना हीरे म्हणता?
पांढरी दाढीवाला : सेठ म्हणाले, काम सुरू होईपर्यंत असेच म्हणायचे.
********
मग आम्ही कोब्र्यासारख्या डोळेवाल्याकडे वळलो.
आम्ही : आम्ही ऐकतो ते खरे आहे?
कोब्रा : खरे आहे.
आम्ही : काय खरे आहे?
कोब्रा : तुम्ही ऐकता ते.
आम्ही : आम्ही काय ऐकतो?
कोब्रा : ते तुम्हासच ठावूक.
आम्ही : अशी उडवाउडवी चालणार नाही.
कोब्रा : एवढी वर्षे आम्ही हेच केले.
आम्ही : थेट उत्तर द्या.
कोब्रा : आमच्या कानाच्या वर कोणी गेले तर आम्हास चालत नाही. म्हणोन आम्ही आमची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला.
आम्ही : इथे उंची वाढेल असे वाटते?
कोब्रा : सेठजी म्हणाले, वाढवून देतो.
आम्ही : तिथे उंची नव्हती?
कोब्रा : होती ना.
आम्ही : मग?
कोब्रा : आणखी हवी होती.
आम्ही : हा हावरटपणा नाही का?
कोब्रा : नाही.
********
हे अवघड प्रकरण असल्याचे पाहून आम्ही पुढे वळलो, तर काळी-पांढरी दाढीवाले कोणाशीतरी मोबाईलवर बोलत होते. सकाळी निघणार्या वृत्तपत्राच्या कोणा महत्वाच्या व्यक्तीशी त्यांची चर्चा सुरू असल्याचे लक्षात येत होते. बामणाची कोंडी करायची, असे काही तरी बोलणे सुरू होते. तोवर म्हटले चौथ्याशी बोलू. ते शामळू गृहस्थ आम्ची चर्चा कान टवकारून ऐकत होते. या सर्वांमध्ये ते कसे पोहोचले असतील, याची उत्सुकता आम्हाला होती. आम्ही त्यांच्याशी चर्चा सुरू केली.
आम्ही : येथे कैसे?शाम : आम्हीही तोच विचार करीत आहोत.
आम्ही : म्हंजे?
शाम : आमची इच्छा होतीच. तिथे आम्हास सार्या कामांवर तुळशीपत्र ठेवावे लागले. काहीच काम उरले नव्हते. पान चार लावणे किती वेळ चालणार? उरलेला वेळ टीव्ही पाहात होतो. स्टार माझावर या पेपरची जाहिरात पाह्यली आणि अर्ज केला. लाटरी काढण्यात आली आणि आमचे नाव निघाले.
आम्ही : आम्हास वाटले आपली पत्रकारितेतील योग्यता वगैरे पाहून, मराठवाडा - नवभारत वगैरेतील अनुभव पाहून, पत्रकारितेतील योगदान जोखून येथे घेतले असावे...
शाम : आम्हीही बाहेर तेच सांगतो.
आम्ही : इथे पुढे काय?
शाम : शेटजी सांगतील तसे.
आम्ही : किती दिवस?
शाम : शेटजी ठेवतील तसे.
आम्ही : पुढे काय?
शाम : (डावीकडे - उजवीकडे पाहात, ओठांवरून जीभ फिरवत) पुन्हा सद्गुरु दर्शनाला जाऊ.
आम्ही : मानेपाटलांना तुम्ही रोखले?
शाम : (काळी पांढरी दाढीवाल्याकडे पाहात) नाय बा.
आम्ही : बाहेर चर्चा आहे...
शाम : हो. खरे आहे.
आम्ही : काय?
शाम : चर्चा आहे, हे खरे आहे.
********
इथे फार काही हाती लागत नाही, हे पाहून आम्ही निराश झालो. एव्हाना काळीपांढरी दाढीवाल्याचे मोबाईलवरून बोलणे संपले होते. त्यांच्या मुखकमलावर हास्य फाकले होते. टेबलवरील बेल शोधत ते वेटरला बोलावण्याच्या धडपडीत असल्याचे आम्हाला जाणवले. त्यांना त्या वेळी काय हवे असेल याचा कयास आम्ही बांधला आणि जोरात आवाज दिला - ‘पिंट्या’... तसा होटलातील वेटर धावत आला. काळीपांढरी दाढीवाल्याने आमच्याकडे कृतज्ञतेने पाहिले. अशी प्रसंगानुरुप मदत करणे त्यांना खूप आवडायचे, हे आम्हास पुण्यातच कळले होते. पैल्याझूट मदत करोन आम्ही पैली फेरी जिन्कली!
********मग आम्ही त्यांच्याकडे वळलो -
आम्ही : इकडे कसे?
काळीपांढरी : सूड घ्यायचाच...
आम्ही दचकलो. मराठी तमाशापट पाहतो आहोत की काय असेच आम्हास वाटले. आम्ही पुन्हा विचारले...
आम्ही : काय म्हणालात?
काळी पांढरी : सूड घ्यायचाय. या ब्राम्हणशाहीचा सूड घ्यायचाय.
आम्ही : पण तुमच्या शेजारी ब्राह्मणच आहेत ना...
काळीपांढरी : या ब्राम्हणांचा नाही.
आम्ही : मग?
काळीपांढरी : त्या ब्राम्हणांचा.
आम्ही : पण ते तर छत्रपतींचे वंशज...
काळीपांढरी : पण ते आतून ब्राम्हणच आहेत.
आम्ही : तुम्हाला कसे कळले?
काळीपांढरी : आम्हाला पुण्यात बोलावून उघडे पाडले.
आम्ही : पण तुम्हीच ब्राम्हण अब्राम्हण वाद सुरू केला असे म्हणतात.
काळीपांढरी : हा वाद कहाडला कोनी? त्यांनीच ना? मी औरंगाबादी दरबार यशस्वी केला. दिग्विजयाच्या पताका रोवल्या, सगळीकडे माझा जैजैकार चालायचा. लोक पोग्रामला बोलवत. मी त्यांच्या बातम्या छापून देई. इथे घर सुद्धा बांधून झाले होते.
आम्ही : पण औरंगाबाद दरबार तर उरकुडे, फटाले, महाजन, जोशी, वरकड यांच्या जोरावर जिंकला म्हणतात.
काळीपांढरी : ते खोटे आहे. मीच जिंकला.
आम्ही : मग पुण्यात काय झाले?
काळीपांढरी : मला ब्राम्हणांनी उघडे पाडले. मला काही कामच ठेवले नाही.
आम्ही : म्हंजे या शाम सारखेच ना?
काळीपांढरी : हो.
आम्ही : म्हंजे या कोब्र्यासारखेच ना?
काळीपांढरी : हो.
आम्ही : मग अशी बिनाकामाची माणसं जमून तुम्ही लोकांच्या मताला धोबीपछाड देणार?
काळीपांढरी : मी असं कधी म्हणालो?
आम्ही : मग. तुम्ही इथं काय करताय?
काळीपांढरी : भगदाड पाडतोय. मला बाहेर काढता का? मी तुमचा सूड घेणार.
आम्ही : पण त्यांनी तुम्हाला काढलं? आम्हाला वाटलं की तुम्ही बेलापुरात सुखी होता.
काळीपांढरी : मी ही सगळ्यांना तेच सांगितलं. कहाडले जायच्या आधी पण खरं मलाच माहिती. मी आता सूड घेणार.
आम्ही : पण उत्तम कांबळे तुमच्या डोक्यावर आल्यामुळे दलिताच्या हाताखाली काम कसे करायचे म्हणून तुम्ही सोडले असेही म्हणतात. कांबळे यांच्याशी तुम्ही आधीपासूनच उद्धटपणे वागत होता असे ऐकिवात आहे.
काळीपांढरी : हो खरे आहे. नाही नाही खोटे आहे.
आम्ही : असो. इथे तुमची स्ट्रॅटेजी काय?
काळीपांढरी : काहीही झाले तरी सकाळी निघणार्या पेपरची माणसे फोडायची. सूड घ्यायचा. त्यांना जन्मात ऐकला नाही येव्हडा पगार द्यायचा. ते येतील.
आम्ही : पण एवढा पगार कायम राहणार? या मालकाची ख्याती वाईट आहे म्हणतात. आधी खूप पगार देऊन ते बोलावून घेतात. मग पगार 66 टक्क्यांनी कमी करतात किंवा घरी जायला सांगतात. जागरणवाल्यांचे खूप वाईट हाल केले म्हणे त्यांनी.
काळीपांढरी : तो त्यांचा विषय आहे. मला कहाडले... मी ह्यांचा सूड घेणार. त्यांच्या पगाराचे त्यांना माहीत. पुढे काय करायचे हे ज्याने त्याने ठरवावे. मी पगार वाढवायला बसलो आहे. द्यायला नाही. द्यायचे काम शेटजींचे.
आम्ही : पण लोक मतावर काही परिणाम? तेथून काही रसद मिळवणार?
काळीपांढरी : फारशी शक्यता नाही. तिथं कुंपण घातलंय. राखणदार बसवलेत. पेंड - चाराही चांगल्या क्वालिटीचा घातलाय. त्यामुळं तिथून रसद मिळायची नाही.
आम्ही : पण चांगली रसद तिथंच आहे, कारण दिवे लागायच्या चर्चेआधीच त्यांना कुणकुण लागली होती. म्हणून त्यांनी सगळी रसद पळवून कडीकुलपात बंद केली म्हणतात. बाहेर आता कचराच उरला आहे, अशी चर्चा आहे.
काळीपांढरी : असेल. मला जेव्हडे जमेल तेव्हडे करणार. सूड घेणार. ब्राम्हणशाही नष्ट करणार.
आम्ही : पण तुमच्या आयुष्याच्या जोडीदार ब्राह्मण आहेत...
काळीपांढरी : तो माझा वैयक्तिक विषय आहे.
आम्ही : पण तुम्ही इथे किती काळ टिकणार?
काळीपांढरी : मला त्याची पर्वा नाही. माझी बायको कमावती आहे. मला घरची चिंता नाही. ठेवले तेव्हडे दिवस राहणार. नंतर निघून जाणार. त्याची मला सवय आहे. पण मी ब्राम्हणशाही संपवणार.
आम्ही : मग आता अर्थक्रांतीचे काय होणार?
काळीपांढरी : कसली अर्थक्रांती?
********
ह्या टीमला शुभेच्छा देऊन आम्ही बहिर्गमन करीत होतो, तर होटेलच्या बाह्यभागात गर्दी जमली होती. प्रेस कान्फरन्समध्ये गिफ्ट वाटताना जशी झुंबड उडते तशी झुंबड तिथे होती. आम्ही लक्ष देओन पाहिले तर ते तनख्याच्या आकड्याचे व्हावचर होते. ज्याच्या हाताला जे व्हावचर लागले, ते घेओन त्याने आत जायचे. त्याला तेव्हडा पगार मिळणार, अशी स्कीम होती !
आम्ही तेथोन सकाळी निघणार्या वृत्तपत्राच्या ऑफिसात गेलो. तेथे ‘मोठे लोक’ सचिंत मुद्रेत बसले होते. काय करावे हा पेच त्यांचे समोर होता. भोवती दिव्यात न खपलेला माल बसलेला होता. ह्यांना घेऊन उद्याचा पेपर कसा काढायचा या चिंतेत बसले असताना एकाने पर्याय सुचवला - ‘सर, पुण्यात तक्रार करा. माणसे वाढवायला सांगा.’ त्यांनी तातडीने पुण्यात फोन केला. माणसं कमी असल्याची तक्रार नोंदविली. आता त्यांचे टेन्शन संपले होते. उद्याचा अंक कसाही निघाला तरी आता चिंता नव्हती. कसाही पेपर काढला तरी विकून दाखवतो या बोलीवर तिथे ‘सरकुलेशन म्यानेजर’ पदावर जॉईन झालेल्यांनी ‘चॉलेंज’ स्वीकारले होते. वाढलेल्या रेटने जाहिराती मिळेनात म्हणून तेथील ‘आड म्यानेजर’ सोडून गेले होते. खरे तर त्यांनाही काळीपांढरी दाढीवाल्यानेच फितवल्याची चर्चा जोरात होती. तिथे अशी ‘चंमतग’ सुरू होती.
मग आम्ही ‘लोकांच्या मता’च्या ऑफिसात शिरलो. तिथे सुकाणूधारी व्यक्तिमत्व घाईघाईने केबिनमध्ये - केबिनबाहेर अशा चकरा काटत होते. आत जाताना त्यांच्या मुखकमलावर टेन्शन असे. बाहेर येताना मुखकमल फुललेले असे. बाहेर जमलेली तमाम जन्ता त्यांनी जाहिर केलेले आकडे ऐकू खुष होत होती. ज्यांना काढायची लायकी त्यांना धा धा हजाराची तनखावाढ मिळाल्यावर काय होणार? आणि ज्यांना जपून ठेवायचे त्यांना 30-40 हजाराची तनखावाढ मिळाल्यावर ते कशास दिवे ओवाळून घेणार? ऐशा प्रकारे लोकांच्या मतातील मतमतांतरे जाणून घेतल्यानंतर आम्ही या महानगरीतील जवळजवळ सर्व पत्रपंडितांच्या कार्यालयास सदिच्छा भेटी दिल्या. काही एफेम च्यानेलनाही (म्हंजे फोक्या मारु) भेटी दिल्या. सर्वत्र आनंदीआनंद दिसत होता.
अखेरीस रात्री आम्हास क्षुधाशांतिची गरज वाटो लागली. मनस्वी इच्छा फाईव्ह स्टारात जाण्याची होती पण तेथ आम्हास फुकटात कोण हादडू देणार? तेव्हा असेच एक टपरी होटल निवडले. आमचे सोबत कोणीच नव्हते पण आम्ही सर्वांसोबत होतो. तेथ अनेक जण पत्रपंडित आम्हास नजरेस पडले. माने सरकार, जेवळीचे सरदार, बोलकढीकार, इन्शुरन्सचे येजंट ऐसे अनेकोनेक जण ‘दो आंखे बारा हात’ प्रमाणे ‘दो बॉटल बारा हात’ करीत बसले होते. सर्वांच्या तोंडी काळीपांढरीला पटवायचे कैसे याचीच चर्चा होती. कोणी म्हणे त्यांना अर्थपूर्ण सहकार्य आवडत असते. त्यातूनच त्यांनी पुण्यात - औरंगाबादेत प्रापर्टी कमावली. नाही तर नुस्त्या कोरड्या पत्रकारितेत काय व्हणार? दुसरा एक म्हणे - माझ्या बिटाचा सगळा हिशेब मी त्यांन्ला देईन. तिसरा म्हणे - ..... असे सगळे म्हणणे सुरू होते...
*********
तर औरंगाबाद महानगरीत ऐसे वर्तमान आहे. कोण कोठे आहे, कोण कोठे नाही या बाबत चर्चेला उधाण आलेले आहे. थकलेले घोडे आणि सायडिंगला पडलेले इंजिन जोडून ही 22 डब्यांची रेल्वे ओढण्याची कसरत होणेची शक्यता येथ दृष्टीपथात येते आहे. तेणेमुळे ही टसल न राहता फिक्स म्याच जाहली की काय अशी चर्चाही सांप्रतला जोर धरोन आहे.
दोन्ही सेठ एकाच समाजातील बंधू आहेत. तेणेमुळे आपल्याच समाजबंधूस त्रास देवोन कैसे भागणार म्हणोन दिल्लीदरबारच्या शेटजींनी मध्यस्थ राहोन सलुख घडविला आणि ऐसे धोरण ठरविले की परस्परांना त्रास देणे नाही. नव्या सेठनी जुन्या शेटच्या शहरात तर जायचे आणि मराठीतून समाजप्रबोधन तर करायचे पण फार जोर लावायचा नाही. परस्परांच्या माणसांस हात लावायचा नाही. बाहेरची माणसे भरघोस पगार देऊन बोलावायची. मार्केटमध्ये इतर पत्रांची खिजगणती ठेवायची नाही. त्यांना संपवायचे आणि नंतर जागरण पॅटर्नने भरती झालेल्या बाशिंद्यांना 30-40 टक्क्यांवर आणून ठेवायचे. ते वेळी लोकांच्या मतानेही तयांना आश्रय देण्याचा नाही. ऐसे ठरोन मराठी पत्रपंडितांचे हाती मोठ्ठे भोपळे देण्याचे ठरविले जात असलेले वर्तमाण आहे.
*********
संबंधितांनी योग्य काळजी घ्यावी. कारण मोठ्यांच्या लढतीत आणि सूडाच्या प्रवासात बळी फक्त सामान्यांचेच जातात हा रामायणापासूनचा इतिहास आहे असे आम्ही ऐकोण आहोत...
कळावे, लोभ नसावा.