16 मार्च 2011

महामहोपाध्याय कुमारस्वामी व श्रीमंत यमराज


जेहत्ते कालाचे ठायी औरंगाबाद नामक नगरी वसलेली असे. या ऐतिहासिक महान नगरीत लोकांना शहाणे करून सोडावयास विविध शेटजी - भटजींकडून अनेकानेक वर्तमानपत्रे प्रकाशित होत. मध्येच मध्यप्रांती असलेल्या शेटजींच्या मनी ऐसे आले की आपणही या ऐतिहासिक नगरीत जाऊन लोकांसि शहाणे करून सोडावे. तत्पर त्यांनी या कामी त्यांचे प्रधान तथा सल्लागार तथा ब्रेन तथा संपादक श्री श्री अभिलाष खांडेकर महोदयांना नियुक्त केले. खांडेकर मूळचे इंदौरनिवासी. पण ‘कर’कारांन्त असलेकारणाने सर्व ‘करां’चा त्यांना भारी लोभ. म्हणोन त्यांनी औरंगाबाद स्वारीच्या मोहिमेच्या सेनापतीपदी महामहोपाध्याय कुमारस्वामींना नियुक्त केले. कुमारस्वामींची तपस्या भारी थोर पण त्यांच्या जिवाला हमेशाच भारी घोर. मागून आले ते पुढे गेले. खासदारपदाने सन्मानित झाले. पण यांंसी कोणी हिंग लावोन पुसेना... वरती स्वामींच्या स्वामींनी त्यांच्या द्वारपालपजी साक्षात कुबेरांचीच नियुक्ती केली. ते कारणे कुमारस्वामींची भारीच गुदमर सुरू जाहली. बरे, बराक ओबामांना सल्ला द्यावा तर तो कुमारस्वामींनीच. पण येथ साक्षात कुबेर लक्ष्मी सोडून (पक्षी इकॉनॉमिक टाईम्स) सरस्वतीची उपासना करणेत मग्न जाहले तेव्हा कुमारस्वामींची मोनोपली खतम जाहली... मगा आता काय? सटवाईला मिळाला म्हसोबा...!

एकेकाळी हे महोदय टाईम्सात घाम गाळत. आमच्या आदर्णीय नेत्या मा. मा. मा. (हे आमुचे त्यांच्याप्रति त्रिवार वंदन) सोन्याजी यांच्या राजकारण प्रवेशावेळी कुमारस्वामींनी त्यांच्या पाठोपाठ भारतवर्षाच्या सार्‍या प्रांतोप्रांती जाओन घाम गाळत रिपोर्टिंग केले. पण कॉंग्रेसला कुमारस्वामींच्या घामाची काय कदर? मराठी सारस्वतातील एवढा मोठा बोरुबहाद्दर उन्हातान्हात आपल्या परमादरणीय नेत्यांच्या पाठीशी लागत सार्‍या देशभर हिंडतो, रसभरित वर्णने करून या देशात साक्षात परमेश्वरी अवतार जन्माला आल्याचे सोडून सारे काही दावे करतो अशा खंद्या बोरुबहाद्दराची दखल कॉंग्रेसने घेतली नाही. कॉंग्रेसने नाही तर नाही, पण टाईम्सानेतर घ्यावी. पण नाहीच ! अखेर कुमारस्वामींनी टाईम्सची वस्त्रे उतरविली आणि लोकांच्या मताचा कानोसा घेतला. पण तेथ कोणाची कानोकानी खबर लागत नस्ते. कुमारस्वामी तेथ आले पण रमले नाहीत. पहिल्याच दिसापासून त्यांचे टुमणे चालू होते - मी काही फार काळ येथ राहणे नाही...

ऐसी माणसे कितिही थोर असोत पण शेटजींना कैसे चालणार ? शेटजींनी श्रीफळाची खरेदी करून ठेवलेलीच होती. पण मराठी सारस्वतातील एव्हढा मोठ्ठा बोरुबहाद्दर आपल्या दावणीला आणून बांधणेचा आनंद काय वर्णावा? यास्तव त्यांणी समयहरण केले. ये दरम्यान कुमारस्वामींनी लोकांची सत्ता कैसी चालेल याची चाचपणी केली. तेथ सत्ता चालणेचा सुगावा लागताच तयांनी रात्रीतून खांदेपालट केला... छी छी ... काय हा शब्द ! ऐसे शब्द फक्त स्मशानीच शोभती... असो तर ते तेथ गेले. तेथील तयांचा रुबाब काय वर्णावा? ‘जाऊ तेथे भाऊ’ ऐशा कहावतीप्रमाणे त्यांनी आपली ‘भाऊमंडळे’ सार्‍या महाराष्ट्रदेशी स्थापन केली.

या भाऊमंडळात सहभागी होणेस अनेकानेक थोर्थोर (पक्षी - थोर थोर) महानुभाव लाईनीत उभे. ते काळी औरंगाबादी स्वतंत्र लोकसत्ताक सुरू होणार ऐसी कुणकुण सुरू होती. (वास्तविक ऐसि कुणकुण मागील शतकापासोन होती ऐसे आम्ही दस्तुरखुद्द ऐकूण आहो) पण या स्वतंत्र लोकसत्ताकाच्या औरंगाबादच्या सुभेदारपदीचा राज्याभिषेक करणेस महामहोपाध्याय श्रीमंत यमराज मॉल-कर बहुत उत्सुक होते. वास्तविक भल्या सकाळी उभ्या महाराष्ट्रदेशीच्या दारोदारी जाणार्‍या वर्तमानपत्राने औरंगाबादची सुभेदारी आधीच त्यांना बहाल केली होती. पण तेथ काही गोष्टी बिनसत होत्या. म्हणोन महामहोपाध्यायांनी त्या काळी या भूतलावरील प्रेसिडेंट पार्क नामक वाटिकेत जावोन कुमारस्वामींची भेट घेतली....!

पत्रकार जमात म्हंजे नारदमुनींची वारस (खरे तर औलाद म्हणावयाचा आम्हास मोह झाला. पण नको. उगाच गैरसमजास वाव नको.) तयांना या गोष्टीचा सुगावा लागला. हा सुगावा ताबडतोब पुण्यनगरीत पोहोचला. सम्राट आणि प्रधान बाईंनी तयांची हजेरी घेतली. ऐसे प्रसंगी आदर्णीय उदय, आदर्णीय भाऊसाहेब ऐसी हस्ती हजर असे. पण खिरीचा नैवेद्य दाखवोन हे प्रकरण मिटले. आपण भेटायला गेलोच नव्हतो, ऐसे उद्गार तयांनी काढले. उभय पक्षांनी उभयपक्षी समाधान करोन घेतले.

पण श्रीमंत यमराज हे कुमारस्वामींच्या मर्जीतले. उभयतांनी परस्परांना अनेकदा आलिंगन देओन चर्चा केल्याचे ऐकिवात आहे. तर अशा समरप्रसंगी स्वामींनी श्रीमंत यमराजमहोदयांची आठवण केली आणि ते सुदिक आर्थिक क्रांती तुर्तास स्थगित ठेवोन औरंगाबाद मुक्कामी दाखल जाहले...

पुढील कथा काय वर्णावी महाराजा... 
पण पुढील कथेआधी मागील कथाही फार्फार महत्वाची आहे. ऐसी मागची पुढची कथा आपले समक्ष लौकरच कथन करू...