30 मार्च 2011

‘बुडती हे जन देखवेना डोळा - म्हणोन हा जनजागृतीचा कळवळा’

जेहत्ते कालाचे ठायी औरंगाबाद महानगरी बडी बांका. येथ रात्रीचे वास्तव्य करौन आम्ही दुसरे दिवसी भले प्रभाती प्रथमप्रहरी बाहेर पडलो. रात्रीचा निवास कोठ म्हणता? येथ सत्यकथन करावे की असत्य हेच आम्हास उमगत नाही. अखेर आम्ही असत्य कथन करतो. आम्ही क्यानाट येरियात आडोसा शोधून रात काढिली. येथ आम्हास बरेच साक्षात्कार जाहले. प्रभातसमयी उठोन आम्ही प्रभात फेरीस बाहेर पडलो. विविध येरियांमध्ये फिरलो. विविध जणांशी चर्चा केली. हाती आलेले निष्कर्ष बहुत धक्कादायक वाटले. ये महानगरीचे नारदकुलोत्पन्न जमातीविषयी कळवळा म्हणोन काही निरीक्षणे सादर करणेचे ठरविले.

पहिले हे की ‘दिवा जळू दे सारी रात’ म्हणता सध्या ‘दिव्याच्या राकेला’साठी मनमानी रेट देणेचा जो धडाका सध्या लागलेला आहे, त्या पार्श्वभागीची कारणमिमांसा लै भारी आहे ऐसे वर्तमान आहे. मुदलात सध्या राकेलावर इतर दुकानांत भयंकर नियंत्रण. निळे राकेल - पांढरे राकेल ऐसा भेद. तेथ सध्या काळे राकेलचा बाजारही मोठा चालू असलेचे वर्तमान दूरदेशीच्या सेठजींना लागले आणि तेणेकरून ऐसे ठरले की ऐशा काळ्या राकेलाची विच्छा मनी धरावीही लागो नये ऐसा समस्त नारदकुलोत्पन्न सद्ग्रहस्थांना राकेलाचा भरमसाठ कोटा वाढवून देयाचा. तेसाठी रेशन कार्डाचीपण सक्ती करावयाची नाही. येकदा का हे राकेल कोटा मंजूर जाहलेले सद्ग्रहस्थ रिंगणात उतरले की मग फुडे काय म्हाराजा?

मुदलात गोष्ट ही की कोब्र्यासारखे डोळे असणारे ग्रहस्थ मुंबैत वापस जाणार आणिक शिवरायांच्या पावन भूमीतून आलेले काळीपांढरी दाढीवाले तेथ परतणार. तनख्याची बोली यांणी केली आणिक देणार ते ग्रहस्थ म्हंजे शेठजी. तेन्चे पाशी राकेलाचा वाढीव कोटा देणेखेरीज पर्याय तर नव्हता पण तेची वसूली करणेची भारी स्कीम आहे ऐसे ऐकूण आहोत. ती ऐशी, की हळो हळो राकेलाच्या वाढीव कोट्याची याद करोन देत ते कोट्याची किंमत वसोल होत नसलेली तक्रार सुरू करोन देयाची. फकस्त वर्तमान सांगोन ये समयी चालते काय, ऐसे वार्ता करीत भविष्याचे भेव दाखवित ये नारदकुलोत्पन्नांना मार्केटी बाहेर उतरवून वर्तमानासोबतच महसुलाचीही टार्गेट देयाची आणि ऐशा प्रकारे वाढीव कोट्याची वसुली सुरू करावयाची.

ऐसे केल्याने जे नारदकुलोत्पन्न ऐसे करू शकतील तयांचा टिकाव लागेल आणिक जे ऐसे करू शकणार नाही अथवा करणेस नकारघंटा वाजवितील तेंणा दाखविणेस औरंगाबाद महानगरीत बरेच रस्ते अस्तित्वात आहेत, ऐसे वर्तमान आहे. ऐसी नाकाबंदी जाहलेवर मग फुडे काय? तयांचा राकेलाचा कोटा 33 - 50 - 66 प्रतिशताने उतरविण्याचा. ऐसे केल्याने एका फत्तरात कितिएक जायबंदी होतील? अस्मादिकांनी तेचीही मोजदाद केली. पहिले जायबंदी होतील सध्याचे शेट किंवा मालक. मग जायबंदी होतील हे नारदकुलोत्पन्न. हे दोघांचे जायबंदी होणेमुळे दिव्याची वात मोठ्ठी होऊन पेटून भरपूर प्रकाश फाकवेल. उदईक चालून चार चिमण्या विझल्या तरी काय फिकिर? बाकीचे दिवे मंदावलेने हा दिवा भक्क दिसेल.

बरे, भक्क दिव्याला ह्या विझलेल्या चिमण्यांचीही फिकिर करणेचे काम नाही, कारण कठिण प्रसंग येता झाड सोडून गेलेल्या चिमण्यांना परत आपल्या फांद्यांवर कोण बरे बसो देणार? ऐशी देशोधडीला लागणेची येळ दूरदेशीच्या नारदकुलोत्पन्नांवर आलेचे ऐकीवात असोन तयाचे अनुभवकथनही अस्मादिकांनी श्रवण केले. ऐसे सारे कळो आले असता आपलेच ज्ञातीबांधवांची ‘बुडती हे जन देखवेना डोळा - म्हणोन हा जनजागृतीचा कळवळा’ ऐसी आम्हची गत जाहली आहे.

ये संदर्भात औरंगाबाद महानगरी आज निमंत्रणे धाडणेत पुढाकार घेताना दिसणारा कोणीही महाभाग फुडे येथ दिसणेची चिन्हे नाही. उदयीक भानगड उत्पन्न जाहलीच तर या महाभागांचे काय जाणार? तयांची पत्नी कमावती आहे. आणिक विचारवंतांची जातकुळी येच लक्षणावरोन वळखता येते. आठवून पाहा - जे जे समाजवादी - कमुनिष्ट विचारवंत होऊन गेले तयांचा सोताचा पोटापाणीयाचा धंदा काय व्हता? कायपण नव्हता. तयांचे पत्नीमहोदयांची राशी सिंव्ह असलेकारणाने आणिक त्या शिकार करोन खाद्य आणित हे विचारवंत फडशा पाडीत. एशे भाग्य समस्त नारदकुलोत्पन्नांस कोठे? 

डोंगर हमेशा दुरूनच हिरवे असतात आणिक चढताना काटे बोचतात. पायीचे जोडे मजबूत असलेस मात्र काटे बोचू नयेत...
इति.
लेखनसीमा.