काही दिवसांपूर्वी कुमार केतकर यांच्याबद्दल गिरीश कुबेर यांनी लिहिलेना एक लेख आम्ही अपलोड केला होता. आम्ही बदनामीसाठी हा ब्लोग चालवत नाही. आज आम्ही औरंगाबाद्च्या दत्ता जोशी यांनी फेसबुकवरून पाठविलेले पत्र येथे प्रकाशित करीत आहोत. वास्तविक कोणालाही दुखावण्याचा आमचाही हेतू नाही. या ब्लॉगवर जे चालू आहे ती निखळ गंम्मत म्हणून घ्यावी, अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे.
मी स्वतः पुण्यात असतो. एकेकाळी मीही पत्रकार होतो. आता कंटेट ऍनालिसिसचा बिझनेस करतो. कोंढवा भागात माझे ऑफिस आहे. मी उल्लेख केलेल्या प्रत्येक शहरांत माझे जुने मित्र आहेत. त्यांच्याकडून मला बित्तंबातमी कळते.
औरंगाबादेतील माझे मित्र तेथील एका दैनिकात काम करतात, एवढेच सध्या सांगतो.
माझी खरी ओळख मी 1 जानेवारी 2012 रोजी देईन. तोवर... जस्ट गेस... टेक इट ईझी...
---------------------------------------------------
काही हितगुज ...
by Datta Joshi on Tuesday, 22 March 2011 at 17:35
पत्रकारितेत कार्यरत असणार्या आणि नसणार्या माझ्या बंधू भगिनींशी आज मी काही हितगुज करू इच्छितो.
मागील काही दिवसांत औरंगाबादेत नवे वृत्तपत्र येणार असल्याच्या हालचाली मोठ्या वेगाने सुरू आहेत. या नव्या दैनिकात जाण्यासाठी अनेक जण रांगेत उभे होते आणि आहेत. अशा विषयांच्या बित्तंबातम्या इंटरनेटवरील ब्लॉगच्या स्वरुपात येण्यास काही दिवसांपुर्वी सुरवात झाली आणि त्यामुळे वातावरण उगाचच ढवळले गेले. याच संदर्भात आपणाशी हा संवाद.
यातील एका ब्लॉगशी माझे नाव जोडले जात आहे. मागील एका लेखात माझे नाव औरंगाबादेतील पत्रकारांच्या यादीत छापून आले. त्यामुळे ही चर्चा सुरू झाली असावी. ही चर्चा माझे नाव त्यामध्ये आल्यामुळे आहे की त्या पुढे दिलेल्या माझ्या पगाराच्या अपेक्षेमुळे आहे, या बद्दल माझ्या मनात द्विधा मनःस्थिती आहे. पत्रकारितेत परत जायचे नाही, हे ठरवून मी 2005 मध्ये पत्रकारिता सोडली होती. कधी कधी मित्रपरिवारात गमतीने नोकरीच्या गप्पा रंगायच्या तेव्हा मीही तेवढ्याच गमतीने लाखभर पगाराच्या अपेक्षा सांगून टाकल्या. वचने किं दरिद्रता? पण हे सत्य मानून त्याचा संदर्भ देणे खरोखरच अस्थानी आहे. ज्याने कोणी हे काम केले असेल ते योग्य नाही. मात्र एक बाब नक्की, त्या लेखनाची शैली चांगली आहे.
असा ब्लॉग मी लिहावा असेही काही कारण नाही. मला माझा व्यवसाय चालविण्यासाठी पुरेशी कामे मिळतात. ती कामे पूर्ण करण्यासाठी मला वेळ पुरत नाही. त्यामुळे मी कधीही कट्ट्यांवर दिसत नाही की बारमध्ये सापडत नाही. माझा वेळ मी माझ्या कामांवर घालवतो आणि यदाकदाचित फुरसत मिळालीच तर चांगली पुस्तके विकत घेऊन वाचतो. ‘कनेक्टिंग द डॉट्स’ आणि ‘स्टे हंग्री - स्टे फुलिश’ ही रश्मी बन्सल या ‘आयआयएम’ ग्रॅज्युएट्सची पुस्तके सर्वांनी आवर्जुन वाचावीत अशी आहेत. मराठीतही ढीगभर पुस्तके मिळतील. ललित साहित्याच्या दृष्टीने अख्खा एस. एल. भैरप्पा वाचून काढावा, असे मी सर्वांना सांगेन. मूळ मुद्दा हा, की मला अशा गोष्टींसाठी वेळ नाही.
मी सहा वर्षांपुर्वीच सक्रिय पत्रकारिता सोडली आहे आणि मागील तीन वर्षांपासून पी.आर.ची कामेही हळूहळू कमी केलेली आहेत. माझी वेगळी कार्यपद्धती, कार्यकक्षा आणि कार्यसंस्कृती मी विकसित करीत आहे. मी नेमके काय करतो आहे, हे कळायलाही अनेकांना पुढची काही वर्षे जाऊ द्यावी लागतील!
पत्रकारितेच्या या व्यवसायात 1991 मध्ये मी स्वेच्छेने आणि तयारीने उतरलो होतो. बी. जे. ला मी विद्यापीठात द्वितीय आलो होतो आणि एम.एम.सी.जे.सुद्धा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालो. विजय कुवळेकर, उत्तम कांबळे यांच्यासारखे राज्य - राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार आणि नागनाथ फटाले यांच्यासारखे स्थानिक पातळीवरील पत्रकार यांच्या निष्कलंक पत्रकारितेचा आदर्श घेऊन मी पत्रकारितेत राहिलो आणि काही तडजोडी करण्याचा प्रसंग आला तेव्हा खंबीरपणे निर्णय घेत बाहेर पडलो. घाणेरड्या राजकारणाचा बळी म्हणून सकाळच्या औरंगाबाद आवृत्तीतून राजीनामा देऊन बाहेर पडण्याआधीच मला व्यवस्थापनाने नाशिकच्या वृत्तसंपादक/सहसंपादक पदावर जाण्याचा पर्याय दिला होता. पण मला औरंगाबाद सोडायचे नव्हते म्हणून मी पत्रकारिता सोडली. माझ्या त्यागपत्रातही मी यापुढे कुठेही नोकरी करणार नसल्याचे नमूद केले आहे.
संधी मिळताच पत्रकारिता आणि व्यवसायात तळ्यात-मळ्यात करणारे अनेकजण आहेत, पण मी मात्र सलगपणे सहा वर्षे यापासून दूर राहिलो आहे. या काळात माझ्यसमोरही संधी आल्या होत्या. पण मी त्या स्वीकारल्या नाहीत. मी जो काही व्यवसाय करतो आहे, त्यात मी समाधानी आहे. इतरांच्या बॅनरला शरण जाण्याऐवजी मी माझे स्वतःचे बॅनर विकसित करतो आहे, कारण माझ्यात ती धमक आहे. पाठीशी असलेले बॅनर बाजूला काढले की ज्यांचे अस्तित्व संपते, असा पत्रकार मी नाही. मला कुणाच्या कुरापती काढण्यात रस नाही. दुखावण्यात आनंद नाही. कारण हे पत्रकारितेचे जग खूप छोटे आहे आणि पृथ्वी गोल आहे, यावर माझा विश्वास आहे.
त्यामुळे माझ्या सर्व मित्रांना माझी अशी विनंती आहे की माझ्या नोकरीची चिंता कोणी करू नये आणि अशा कोणत्याही ब्लॉगशी माझा संबंध जोडू नये.
इतःउपर जोडायचाच असेल, तर मर्जी तुमची...
कारण जमाना ‘मर्जी’चा आहे!
- आपला
दत्ता जोशी
मिडिया केअर
औरंगाबाद