23 मार्च 2011

किरण मोघे हे नाव कधी ऐकलंय?

किरण मोघे हे नाव कधी ऐकलंय? नसेलच. हे तसं खूप गाजलेलं नाव नाही. पण सध्याच्या औरंगाबादी पत्रकारितेत या नावाला बरंच महत्व आहे. भास्कर ग्रुपने मराठीत पेपर काढायचा ठरवल्यानंतर किरण मोघे यांना औरंगाबादेत पाठविण्यात आलं. ते हिंदी भास्करमध्ये मोठी जबाबदारी पार पाडत. मागचे सहा महिने ते औरंगाबादेत होते. तिथे बसून त्यांनी औरंगाबादच्या पत्रकारितेची खडा न्‌ खडा माहिती काढली आणि वरिष्ठांकडे पाठविली. त्यांच्या माहितीच्या आधारावर भास्कर ग्रुपने व्यूहरचना ठरविली. त्यानुसार आजच्या हालचाली सुरू आहेत.

तर सांगण्याची गोष्ट ही, की हे मोघे महाशय दोन दिवसांपूर्वी लोकमतला जॉइन झाले! आता बोला...! आज काल नैतिकतेच्या आयचा घो च झाला आहे म्हणायचं!

एकीकडे केतकरी बाण्याने जमवाजमव सुरू आहे. दुसरीकडे मालकरी बाण्याने सकाळ - सामनाला भगदाडे पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठवाड्यात लोकसत्तेचे भगदाडच शिल्लक आहे, त्यामुळे तिथे पाडण्यासारखे काही राहिलेले नाही. ही पाडापाडी सुरू असताना दर्डाशेठनी भास्कर ग्रुपचा अख्खा पिलरच हलविला आहे. या दर्डा सेठना मानावेच लागेल. आता हे डोके दिल्लीतल्या दर्डासेठचे की मुंंबईच्या की औरंगाबादच्या हे काही आम्हाला अजून कळलेले नाही.

या मोघे गुरुजांनी त्यांनी मुंबईतील डेस्कची सहयोगी संपादकपदाची जबाबदारी सोपविली. वार्षिक 10 लाखांचे पॅकेज त्यांना दिले. म्हणजे महिना साधारण 85 हजार पगार पडला. यामुळे तिकडे विवेकक्षमता कुंठित झाली. कारण तो निधी फक्त 80 पर्यंत पोहोचतो. यांना 5 जास्त मिळाले. आता काम करता? इकडे आड-तिकडे विहीर. आता तर विहिरीवर झाकणही टाकून झाले आहे!

हे मोघे महोदय आज रोजी औरंगाबादी दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनामुळे शेटजींना वाघ मारल्याचे समाधान मिळत असले, तरी त्यांनी खरोखरच वाघ मारला आहे की आपल्या तंबूत उंट घेतला आहे, हे काळच ठरवणार आहे. कारण अग्रवालशेटजीही कच्च्या गुरुंचे चेले नाहीत. शक्यता अशीही आहे की त्यांनीच मोघेगुरुजींना लोकमतात घुसवले असावे! अन्यथा भास्करमधील मोठे पद सोडून हे महोदय इकडे कशाला आले असते? खरे खोटे काही काळाने कळेल. कारण लोकमताने ही स्ट्रॅटेजी विविध पेपरवर चालविली आहे.

बाकी काही असो, या गुरुजींच्या आगमनाने लोकमतात अस्वस्थता आहे. एवढे दिवस एकसंघ वाटणारी लोकमतची टीम या एका निर्णयामुळे थोडीशी हलली आहे. ऐन लढाईच्या वेळी अशी शत्रुपक्षातीलच माणसे आपले नेतृत्व करणार असतील, तर एवढे दिवस लढविलेल्या आघाडीचा काय उपयोग झाला? अशी नैराश्याची भावना त्यांच्यात येते आहे.
या भावनेचा स्फोट झाला तर तिथला निम्मा संघ शेठजी टू शेठजी स्थलांतर करू शकतो!
थोडक्यात काय तर अब लढाई दूर नहीं...