फार्फार वर्षांपूर्वी, म्हंजे साक्षात ऐतिहासिक महाराजांच्या काळात अनेक प्रसंगी लढाय झडत. किल्ले काबीज होत. निशाणे फडकत आणि सत्तापालट होऊन नवी विटी - नवे राज्य चालू होई. सांप्रतातही ऐसा प्रकार सुरू जाहला आहे की काय ऐसी शंका मनी येणेचे कारण नुकतेच घडले आहे. शेठजींच्या आश्रितांनी नाशिक तीर्थक्षेत्री जाओन लढाई-लढाईचा खेळ खेळल्याचे वृत्त आमचे हाती आले आहे. हे वृत्त ऐकोन आम्हास परमसंतोष जाहला. कारण ये कारणे इतिहास पुनश्च एकवार अवतरत आहे, या बद्दल आमचे मनात यत्किंचितही शंका उरलेली नाही.
जेहत्ते कालाचे ठायी, प्राचीन काळी जेव्हा लढाया होत, तेव्हा एक पक्ष मैदानात असे आणिक दुसरा पक्ष किल्ल्यावर. किल्ल्यावरील पक्षाला नमोहरम करणेसाठी तोफा डागल्या जायच्या. तटाला शिड्या लावून चढाई होयाची... शत्रू मातब्बर असेल तर रात्रीच्या अंधारात किल्ल्याचे दरवाजे उखडोन टाकणेचा प्रयत्न होत असे. आता किल्ल्याचे दरवाजे म्हंजे सामान्य उपसंपादकाची नोकरी थोडीच आहे... उखडली आणि दिली फेकून... किल्ल्याचा दरवाजा म्हंजे महामजबूत काम. खास लाकूड, त्याला लोखंडाच्या पट्ट्यांचे आधार आणि वर भरीस भर म्हणोन अणकुचिदार खिळ्यांची पेरणी. ऐसा दरवाजा फोडायचा तरी कैसा? मग ग्रांऊंडावरील राजे आयडिया करायचे. ते हत्तींना मनसोक्त ‘भरारी’ पाजायचे आणि मग असे मस्तावलेले हत्ती अशा दरवाजांवर जबरदस्त धडका देयाचे...
आता ही ‘भरारी’ म्हंजे काय? तीच तर खास आयडिया हाये ना महाराजा... उस्मानाबाद-ढोकीकडे यास ‘भरारी’ म्हंतात, ठाणे-मुंबईकडे यास ‘ठर्रा’ म्हणतात, बीड-औरंगाबादकडे यास ‘मोसंबी-नारंगी’ म्हणतात... पुण्याकडे यास ‘पहिल्या धारेची’ म्हणतात... तर, शेवटच्या प्रहरात पहिल्या धारेची पिओन हे मदमस्त (हां... आत्ता कळले, हत्तींना ‘मदमस्त’ हे विशेषण का वापरतात...) हत्ती जबरदस्त किल्ल्यांच्या दरवाजावर धडकत राहायचे... मस्तकातून रक्त ओघळून प्रसंगी त्यांचे प्राण जायाचे पण किल्ला सर व्हायचा... ऐसा हा इतिहास...!
ऐशा इतिहासाची पुनरावृत्ती सांप्रतला मराठवाडी होणेची चिन्हे दिसत आहेत. त्याचे ऐसे जाहले, की औरंगाबाद नगरीत एका महाभयंकर युद्धाला सुरवात होणार असल्याचे शिळे वृत्त आहे. या लढाईला आज तोंड फुटेल - मग तोंड फुटेल असे म्हणता म्हणता हे सांगणाराचे तोंड फुटणेची वेळ आली पण युद्ध आणिकही सुरू नाही. नव्या शत्रुपक्षाने तब्बल 45 हजारांची सैन्यनोंदणी केल्याचे वृत्त आहे. मैदानातच नसलेला आणि इतरांवर गुरगुरणेचे आरोप करणारा पक्ष लाखाच्या बाता मारतो आहे पण अतिविश्वसनीय सूत्रांनुसार त्याची शिबंदी फक्त 28 हजाराची असलेचे कळते.
मुख्य शत्रुपक्ष मात्र चिंतित झाला आहे. त्याने नुकताच आपल्या शिलेदारांस वकुबाप्रमाणे पाच हजार ते 15 हजारांचा बुस्टर डोस दिला आहे. त्यामुळे अनेकांचे बाहू फुरफुरू लागले आहेत. जे कॉलेजच्या मुलांचे बाप, ते सेकंड हनिमूनला जाणेच्या तयारीत आहेत, जे शाळेच्या मुलाचे बाप, ते दुसर्या मुलासाठी प्रयत्नास लागले आहेत. जे अद्याप बाप नाहीत, ते बाप होणेचे खटपटीस लागले आहेत आणि ज्यांचे अद्यापही काही जुळले नाही, ऐसे लोक आता जुळविणेच्या हिमतीस आले असल्याचे अतिविश्वसनीय वृत्त आहे.
तर आपण कोठे होतो? (ऐसे म्हटले की आपण ज्येष्ठ झाल्याचा समज करून घेता येतो) तर ऐशा मदमस्त हत्तींप्रमाणेच असलेल्या आपल्या दरबारातील हत्तींना ‘वाईन’ पाजण्याची कल्पना सेटजींच्या मनी उतरली. त्यांनी तातडीने सगळ्या किल्ल्यांवरील किल्लेदार, उपकिल्लेदार, सहकिल्लेदार ऐशा खाशा हत्तींना नाशिक तीर्थक्षेत्री पाचारण केले. तेथ ‘सुला वाईन्स रिसोर्ट’ नामक पुण्यस्थळी तयांच्या ‘लक्झुरियस’ तपश्चर्येची सोय करणेत आली होती. तेथ पाऊल टाकताच सर्वांचे भ्रमणध्वनी बंद करणेत आले आणि सर्वांस द्राक्षांच्या अनेक टप्प्यांचे दर्शन लाईव्ह घडविणेत आले.
याच दरम्यान खास मुंबाईतून आलेल्या सात पुरुष आणि तीन महिलांनी सर्वांचे मनोरंजन करणेसाठी कंबर कसली. नाही.. नाही... तीन महिला म्हणतास गुदगुल्या जाहल्या का? या ‘तशा’तल्या नव्हत्या बरे... मुंबाईतील एका ‘यच्चार कंपनी’च्या त्या सेविका होत्या. तयांनी या पाच-पन्नास हत्तींना ‘गेम’ सिकविले... खेळविले... आणि रोज संध्याकाळी शेटजींनी सर्वांना ‘मदमस्त’ केले. मस्त व्हायचे आणि मस्त डुंबायचे असा कार्यक्रम सलग तीन-चार दिवस चालू होता म्हणे. अश्विनीकुमार डोंगरधारी तर तिथे इतके खुश झाले की आता यापुढे प्रत्येक वेळी (म्हणजे प्रत्येक भाद्रपदात) साथीदारासह (शब्दाचा अचूक अर्थ लक्षात घेणे) इथेच येणेचा निर्णय त्यांनी केला म्हणे. (त्यासाठी सध्या ते प्रायोजकाच्या शोधात आहेत. मुंबाईत दोन-चार जणांकडे त्यांनी खडा टाकलेले कळते)...
असो. तर या तीन दिवसांच्या वास्तव्यात हत्तींना मदमस्त करणेचा यशस्वी प्रयोग शेटजींनी केल्याचे तपशीलवार कळले. विशेष म्हणजे लढाईच्या आखाड्याबद्दल येथ एकही ओळ चर्चा झाली नाही, त्यामुळे सर्व हत्ती मस्त राहिल्याचेही समजते. असेच विविध शत्रू चढाई करोत आणि असेच मदमस्त होणेची संधी पुन्हापुन्हा मिळो असे म्हणत सर्व जण आपापल्या किल्ल्यांवर परतले...
फक्त एकच गोष्ट राहिली... यामध्ये फक्त हत्त्तींचाच विचार झाला. एकाही हत्तीणीला संधी देणेत आली नाही. त्यामुळे 33 टक्के आरक्षणाचा उपयोग काय असा प्रश्न शेटजींच्या गोटात चर्चेला येत असल्याचे कळते...!