9 मई 2011

लोकमतात थरथराट.....

सांप्रतला महाराष्ट्री घडामोडींना उधाण आलेले आहे. जुन्या-नव्यांचा भेद उरला नाही महाराजा. कायपण कायपण घडू लागले आहे. आता काय करायचे आमच्या सुकृतांनी? खाल्लया मिठाला जागणे राहू द्या पण प्यायलेल्या ग्लासाचे तरी इमान राखून थोडी टिप द्यायची डोंगरधारांनी. पण हाय रे दैवा... हाय रे कर्मा... कॉन्ट्रॅक्ट संपल्याचे कारकुनाकडून कळावे? काय हा पत्रकारितेचा अपमान...! पण या बाबतीत अरूण शौरी यांची बरोबरी झाली म्हणायचे. त्यांना तर गेटवर वॉचमनने सारा हिशेब लिहिलेले पाकिट दिले होते म्हणे...! 

तिकडे सोलापूर देशीही ऐसेच जाहले. तिथे तर निष्ठेचा अर्क असलेले शांताकुमार विराजमान होते... मागची तीन दशके, म्हणजे ऋषिमुनींच्या वयापेक्षा किंचितसा कमी काळ, ते शेटजींच्या शेवेत होते... त्यांनाही उडविले? काय पण हा दैवदुर्विलास...! जुन्या-नव्यात फरक नाही मग इतरांनी बघायचे कुठे? 

बाकी डोंगरधारी मोठ्या जिद्दीचा माणूस. कुणाचं... सॉरी कुणाला... धरायचं हे त्यांनी बरोब्बर कळतं. मग स्पर्धक रनआऊट करता येतो, स्वतःकडे स्ट्राईक घेता येतो आणि धावसंख्या 85 हजारावरून थेट 1 लाख 40 हजारापर्यंत वाढवता येते. म्हणजे साहेबांपेक्षा फक्त 10 हजार रन कमी...! 

अख्ख्या महानगरीतील लोकांच्या मताच्या पाईकांना सरसगट भरघोस वाढ मिळाल्याचे वृत्त आहे. ही वाढ म्हणजे औरंगाबादीच्या काही जणांच्या एकत्रित पगाराएवढी असल्याचे कळते... 25 हजार ते 30 हजारांची वाढ म्हंजे जबरदस्तच की...! ‘अतुल‘नीय शौर्य गाजविणारे आता लाखाच्या घरात पोहोचले, इतरही अनेक जण 90 हजारी मनसबदार झाल्याचे कळते.

इकडे सोलापुरात आमचे परममित्र राजे तर झाले पण तनखा मात्र 35-40चा. काय उपेग महाराजा? येवढ्या पगारात कैसे म्यानेज करायचे? दळण आणायलाही स्वतःलाच जावे लागणार? आणि तिकडे औरंगाबादी सुकाणूधारींना जेमतेम 14-15ची वाढ दिल्याचे ऐकीवात आहे. ते तर ऋषिमुनींच्या जन्माआधीपासोन सेवेत निमग्न... 
असे कसे देवा? 
वाटतो डोंगरधारींचा हेवा... 
उडाणटप्पूंना मेवा 
आणि निष्ठावंतांशी उभा दावा?
हे काही खरे नाही बुवा... 
(जमले की नाही? खेबुडकरांनंतर आता आम्हीच....!!!!! फोन नंबर देऊ?)
काय सुकाणूधारी महाराज? आता तरी ऐका. किती दिवस एकाच शेटजींचे दळण दळणार? शेटजी तरी बदलून बघा... बाबूजी लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी तुमच्याकडे सपत्निक येतात. आम्ही फ़ेसबुकवर पाहिले... पण पगाराचे काय? तुमच्या कामाचा डोंगर खूप मोठा आहे...!

असो, सुकृतांच्या लेखणीचा दम शेटजींना जाणवला नाही, की त्यात दम नाही असे खास रिपोर्टिंग जोडगोळीने केले? युद्ध पेटले की सेनापतींचा कान हलका होतो असे म्हणतात. कोणीही कानाशी लागलो आणि सेनापती ते खरे मानतो. खरा सैनिक युद्धभूमीवर लढत असतो आणि बाजारबुणगे सेनापतींच्या कानाशी लागून धावते समालोचन ऐकवीत असतात.... असते एकेकाच्या नशिबात भारी सुख. पण डोंगरधारींना आता सुला वाईन रिसोर्टमध्ये जाण्यासाठी प्रायोजक शोधण्याची गरज पडो नये, अशी अपेक्षा आहे महाराजा. शेटजींनी तनखा वाढवायची ती याच साठी ना...!