कोणे एके काळी पृथ्वीतलावर छापील मिडियाची ‘भाऊ’गर्दी झाली होती. ही भाऊगर्दी की ‘खाऊ’गर्दी या बद्दल सांप्रतातही संशोधन सुरू असोन या बाबत पक्की खबर मिळताच आपणांसमोर सादर केली जाईल. पण ते काळी खा खा खाण्याची स्पर्धा मिडियाच्या बाशिंद्यांमध्ये आणि त्यांच्या पोशिंद्यांमध्ये चालू होती म्हणे. कोणी ‘ब्लॅकमेल’ नामक काळी विद्या वापरून धन कमवायचा तर कोणी व्हाईट कॉलर पद्धतीने धमकावून अप्रसिद्ध समाजास प्रसिद्धीचे गाजर दाखवोन धनदौलतीचा स्वामी व्हायचा. यातच काळ जाऊ लागला आणि मालक प्रवर्गाच्या ऐसे लक्षात येवो लागले, की पेपर खपवून किती माल कमावणार? नव्या मशिनरी, न्यूजप्रिंट... ब्ला ब्ला ब्ला... त्यापेक्षा अधिकृतपणे नावांचा गैरवापर करणेस काय हरकत आहे?
याचि मुहुर्तमेढ रोवली गेली साक्षात पुण्यनगरीत. ज्या नगरीच्या काळ्या मातीत साक्षात शिवछत्रपतींनी सोन्याचा फाळ लावून नांगर चालविला त्याच भूमीत मंडप मारून, स्टॉल उभारोन माल विक्रीस सुरवात झाली. जोडीला नंबर एकची विक्री असलेल्या आपल्याच घरच्या पेपरमुळे पब्लिसिटी काय सांगायची महाराजा? लाव स्टॉल की छाप बातमी. लाव स्टॉल की छाप बातमी. ऐसे करता करता अनेक वर्षे गेली. जन्तेसही पदरचे पैशे खर्चून पेपरवाल्यांच्या उपक्रमाची बातमी वाचणेची सवय लागली. मग पेपरवाल्यांची भूक वाढत गेली. धर बिल्डरला की लाव प्रदर्शन, धर शिक्षणसंस्थांना की लाव प्रदर्शन, धर कोणालाही आणि कर बाजारात उभा अशा प्रकारे पैशाची टाकसाळ उघडल्यानंतर औरंगाबादच्या शेटजींचे या कडे लक्ष न गेल्यास नवल. मग त्यांनीही आपला स्वतंत्र विभागच उघडला. काहीबाही कामे सुरू केली, पण हाताला यश मिळेना.
त्यातच चार वर्षांपुर्वी बारामतीकरांच्या आयपीएलची एकच धूम देशभरात सुरू झाली आणि चोर्यामार्यांचे पेटंट घेतलेल्या शेटजींच्या वारसदारांनी ही आयडियाची कल्पना उचलली आणि औरंगाबाद महानगरीत एपीएलनामक चेंडूफळीच्या भव्य दिव्य स्पर्धेचा घाट घातला. ग्राऊंड बुक झाले. टिमा निवडल्या. फ्रेंचाईजी मिळविले आणि चारदोन हजारांच्या गर्दीत म्याचा (मॅच) पार पडल्या. तदनंतर हाच खेळ पुण्यनगरीत लावणेचा निर्णय ऋषिमुनींनी घेतला. पण हे बघोन पुण्यनगरीतील मरहट्टे इरेस पडले. जाधवरावांनी आपले सारे प्यादे पणास लावोन रात्रीतून हलकल्लोळ केला आणि ऋषिमुनींना पुण्यानगरीतून काढता पाय घ्यावा लागला. मग पुण्यनगरीत यमपीयेल साजरी झाली. एपीएलच्या आधारदारांना यमपीयेलच्या सवंगड्यांनी साकडे घालणेचा प्रयत्न केला पण काय सांगायचे? पैसे काय झाडास लागतात? विष्णु भगवानांनी तयांस पुण्यनगरीत वित्तपुरवठ्यास विनम्र नकार दिला. ही झाली तीन सालपूर्वीची गोष्ट. पण सापाचा आणि पेपरवाल्याचा डुख काय विचारता महाराजा?
ऐन खाशा समयी औरंगाबादच्या विष्णु भगवानांनी पुणेकरांना (सुरेखा नव्हे) नाराज केले. पुणेकरांची नाराजी किती महागात पडेल, याची भागवत कथा विष्णुपंतांना कशी येणार? पण ही नाराजी भोवली आणि बिंग उघडकीस आलेनंतर भागवतकथेस जी काही जंबो पब्लिसिटी पुणेकरांनी दिली म्हणता महाराजा, की त्याचे नाव ते. एपीएलात येव्हढा मोठ्ठा पैसा खर्चूनही जेवढी जागा मिळाली नाही, ती पुणेकरांनी दिली! ती ही फुक्क्कट...!
इकडे ऋषिमुनींचे वर्तमान काय म्हणता? एरव्ही कोणाच्या कोणाच्या बातम्या मांडीखाली दाबायची त्यांची सवय, पण इथे सगळ्यांच्या मांड्या एकत्र आल्या तरी बातमी दबायचे नाव दिसेना. मग काय करता? नाईलाज म्हणून लावली बातमी. खरे तर ऋषिमुनींच्या आदेशानुसार देशमुखी गप्पा रंगवून विष्णुचा मकरंद शोषण्याचे कार्य कधी काळी पार पडले होते. हे विष्णुपुराण ऋषिमुनींनी मन लावून लिहिले. तयांचे लेखणीधर साक्षात चक्रधरस्वामींना त्यांनी पुराणातील वांगी तळण्याचे उभे आदेश (स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स) दिले होते. स्वामींनी हुजूर हुकमाची पूर्ण पूर्तता करीत लीळाचरित्रे रचिली. ऐसे चार वर्षे चालले. या काळात सारे काही सुरळीत सुरू होते. विष्णुपुराणाचा लाभ म्हणून अनेकांना टाटांचे विनाअश्व रथ देण्याचे मनोरथ रचले गेले. क्यांपेना चालविल्या गेल्या. मराठवाडी देशी नुस्ती धम्माल उडाली होती महाराजा... आणि साक्षात ऋषिमुनींचाच आदेश असलेने कॉलमातील काळ्या पांढर्याला सेंटीमीटरचे रेटच लागेनात. तिथे थेट मिटरात भाषा चालू लागली. पेपरवाला हाताशी धरला तर आपले काही वाकडे होत नाही, ऐशा धारणेतून धोरणी विष्णु भगवानांनी हा सारा घाट घातला खरा, पण ....
पण हाय रे दुर्दैवा... कुणा तरी नतद्रष्टाने काहीतरी केले आणि भागवत पुराणाचे मावंदे घालायची वेळ आली. पण आपल्याकडे कायद्याचे एक बरे आहे. करणारा अडकतो. पाठिंबा देणारा निमानिराळा राहतो. राहू देत. राहू देत. पुढच्या एपीएलला नवा फ्रेंचाईजी कसा मिळवायचा या बाबत नुकतीच एक बैठक झाल्याचे आम्हास कळले आहे. हा म्हणायचा व्यवहार. शो मस्ट गो ऑन. गेम शुड कन्टिन्यू.
आता ऋषिमुनी एकात चार पेपर देणार आहेत. दिव्याचा प्रकाश तीन टप्प्यात पडणार हे कळले, की यांनी चार टप्प्यांची योजना सुरू केली. चौथा पेपर कधी सुरू होणार? दिव्याचा प्रकाश पडण्याच्या चार दिवस आधी...! याला म्हणतात व्यवहार...! असो.. ऋषिमुनींना भागवत पुराणातील मौलिक यक्ष प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ टळण्याच्या शुभेच्छा. नाही तर विकतचे वांधे व्हायचे....!