6 मई 2011

आज आनंदी आनंद झाला...

















किती सांगू मी सांगू कुणाला?
आज आनंदी आनंद झा ऽऽऽ ला... आज आनंदी आनंद झा ऽऽऽ ला...
एकमेकांवर गुरगुरण्यात दंग असताना लोकांसाठी गर्जना कोण करणार? अशी गर्जना करीत अखेर सकाळने मैदानात उडी घेतलीच. याचा आम्हाला अत्यंत, खूप, मनस्वी, मनापासून, प्रचंड, जबरदस्त, अतिशय आनंद झाला.

 मागचे काही महिने औरंगाबादेच रोजचा पेपर कसा काढायचा, याची कसरत करण्यात त्रेधातिरिपिट उडत असताना सकाळने ही हिम्मत दाखवावी म्हणजे काडीपैलवानाने आपल्या किडकिडित दंडातील बेडकुळ्या फुगवत हिंदकेसरीला आव्हान देण्यासारखेच आहे. पण आपल्याकडे लोकशाही आहे ना... इथे असे सगळे चालते! असो. औरंगाबादी होत असलेल्या लढाईत सकाळने सहभागी होण्याचा निर्णय घेतला, हे निश्चितच अत्यंत स्वागतार्ह आहे.

वास्तविक लढाई, चढाई हा सकाळचा स्वभाव नाही. त्यांचे कसे छान चाललेले असते... पोळी, अळुची भाजी, सोलकढी, साधे वरण, पांढरा भात, वर चितळ्यांच्या तुपाची धार... सारं कसं व्यवस्थित झालं पाहिजे. या निमित्तानं तिथं क्रांती झाली आणि साध्या वरणाऐवजी फोडणीची आमटी आणि अळूच्या भाजीऐवजी अळूचे फतफते ताटात आले, यातच सारे काही आले. तुमचे झणझणित मटण तुम्हास लखलाभ...
असो.

पण या निमित्ताने त्यांनी केलेल्या कॉमेंट खरोखरच धाडसी आहेत बरें... ‘एकमेकांवर गुरगुरण्यात दंग असताना लोकांसाठी गर्जना कोण करणार?’ असा एक बेदखल प्रश्न त्यांनी विचारला आहे. हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला आहे की वाचकांना? वाचकांना विचारलेला असेल, तर त्यांची उत्तरे संकलित करण्याची काही सोय केलेली आहे का? आणि स्वतःला विचारलेला असेल, तर त्याचे उत्तर त्यांना सापडले का? 

त्यांना सापडो की न सापडो, आम्हाला याचे उत्तर आता सापडले आहे. ‘लोकांसाठी गर्जना कोण करणार?’ या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडेही नाही. कारण आजपर्यंत लोकांसाठी गर्जना करावी लागण्याचे असंख्य प्रसंग आले पण त्यांच्या नरड्यातून - सॉरी घशातून - गर्जना बाहेर पडलीच नाही... अजित पवारांनी धुडगुस घातला, सुप्रिया सुळ्यांवर आरोपांची बरसात झाली, लवासा सिटीत तर चक्क शरद पवारांचाच स्टेक असल्याची चर्चा रंगली, किती भूखंडांचे श्रीखंड या परिवाराने पुण्या-मुंबईत घशात घातले याची तर गणतीच नाही. आयपीएलमधील भ्रष्टाचार समोर आले. ही सारी प्रकरणे चालू असताना कधी ‘गर्जना’ ऐकू आली नाही. गर्जनाच काय, पण साधी ‘म्याऊ’सुद्धा ऐकण्यात आली नाही बरें...! यांच्या पेपरात साधी एक ओळ नाही. मग लोकांनी ‘स्वार्थासाठी नाही, लोकांसाठी लढणारे दैनिक’ या वल्गनेवर विश्वास कसा ठेवावा? 

कलमाडींना चिरडायचे असेल, विलासराव - अशोकरावांना ओरबडायचे असेल तर जी लेखणी परजली जाते त्यातील शाई पवारांच्या आरोपांच्या वेळी का संपते बरें...! ‘पीडब्लूडी’वाले भुजबळ डोईजड होऊ लागले की ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘टोलनाक्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा साक्षात्कार’ का होतो? सगळीकडे ‘टोल-धाडी’चा धुराळा उठविला जातो. आता निवडणुकीनंतर सगळीच ‘सामसुम’ का बरें...? सध्या हा पवारभक्तीचा अतिरेक इतका लक्षात येतो आहे, की ‘सकाळ’ ऐवजी ‘पवार’ असे नाव पहिल्या पानावर छापले आहे की काय याची शंका यावी ! 

उदय भविष्यपत्राचा... आता याला काय म्हणणार? हे भविष्यपत्र म्हणजे ‘ज्योतिष - भविष्य सांगणारे पत्र’ की ‘भविष्यातील घडामोडींचे भविष्य वर्तविणारे पत्र’? यातील कोणताही अर्थ असो, त्यात काही अर्थ असल्याचे सध्या तरी दिसत नाही...! तरीही स्पर्धेत ‘गुरगुरण्याची’ भाषा करण्याच्या हिंम्मतीबद्दल त्यांचे कौतुक...!