मुंगीने मेरु पर्वत तर गिळला नाही ना? मग लांबून दिव्याची वात पेटवणार कशी? बरे, ना त्यांच्याकडे तेलाचा साठा ना काडीची आग! मग औरंगाबादी प्रकाश पाडण्यास दिवा कसा पेटणार? साक्षात 'भास्करा'खाली भोपाळी गेल्यानंतर म्हणे लांब प्रकाश पडेच ना. आणि तिथे औरंगाबादी तर शेठजींनी चिमणी, कंदील घासून पुसून, लख्ख करून वात घालून तयार ठेवली आहे म्हणे. आता काय करायचे? पेशवाई जेवणावळीत बुडाली म्हणतात. तशी भास्करशाही फाईव्हस्टार जेवणावळीत तर बुडणार नाही ना? बाकी काही असो, पेशवाईत ब्राह्मणांचे भले झाले. दोन टाईम जेवणखाण, वर शिधा आणि दक्षिणेचाही लाभ होत असे. सध्या औरंगाबादी असेच काहीसे घडते आहे. कधी साहित्यिकांना बोलाव आणि तीर्थ देऊन चित्रान्न खाऊ घाल, कधी मान्यवरांना बोलाव आणि तीर्थ देऊन बिर्याणी खिलव, कधी एजन्सीला बोलाव आणि तीर्थ देऊन मॅच दाखव असे प्रकार सुरू आहेत म्हणे. जसजसा दिवा पेटायला उशीर होत आहे तसे तसे होटेलाचे बिल वाढून ‘भोपाळशेट’चा जीव खाली वर होत आहे म्हणतात.
त्यात साक्षात काळीपांढरी दाढीवाल्यांनी आपला अब्राह्मणी अनुभव पणाला लावत कुमारस्वामींच्या साथीने निवडलेल्या माणसाचा प्रकाश लांबपर्यंत पडेचना. यामुळे भोपाळसेठ म्हणे चिंतित झाले आहेत. त्यातच लोकांच्या मताने चालणार्या औरंगाबादी सेठजींनी लोकांची मर्जी जाणून साक्षात मोघेगुरुजींनाच पळविले. आता काय करायचे? औरंगाबादी मुदलातच चांगली माणसे कमी. त्यात काळीपांढरीवाल्याला जे लोक चालतात ते फक्त ताटाखालचेच लागतात असे म्हणतात. त्यांच्या लेखी म्हणे ब्राह्मणांचे दोनच प्रकार आहेत. ताटाखालचे आणि कानावरचे. ताटाखालचे ब्राह्मण त्यांना प्रिय आहेत आणि कानावरचे ब्लॅकलिस्टात. म्हणूनच प्राचीन काळी कानावरच्या ‘मोठ्या लोकां’ना दूर ठेवून ताटाखालच्या साक्रीच्या ब्राह्मणाला त्यांनी संपादक केल्याचे ऐकीवात आहे. अर्थात दक्षिणगंगेचे पाणी प्यायलेल्या पैठणच्या हिकमती ब्राह्मणाने आपला जोर लावून संपादकपद एक वर्षाने का होईना मिळविले खरे. अशाच आणखी एका कानावरच्या ब्राह्मणाला काळीपांढरीवाल्याने देशोधडीला लावल्याचेही ऐकीवात आहे. त्यामुळे आता चतुर ब्राह्मण त्याचे नादाला लागत नाहीत. आपण बरे, आपला पगार बरा, आपला पेपर बरा अशी त्यांची नीती आहे.
त्यातच ताटाखालच्या ब्राह्मणाच्या ताटाखाली राहावे लागणेही अनेकांना रुचणारे नाही, असेही ऐकीवात आहे. आणि आता मुळात भोपाळसेठांची गणितेच चुकत आहेत ऐसेही ऐकीवात आहे. औरंगाबादी माणसे मिळेनात, पुणे मुंबईतून तिथे कोणी जाण्यास तयार होईनात. कोब्रासारखे डोळे असणारे आणि काळीपांढरी दाढीवाले अफ्रिदीप्रमाणे उंटावरून शेळ्या हाकत आहेत. खरे तर त्यांनी धोनीप्रमाणे मैदानात उतरून धुतले पाहिजे. पण त्यासाठी टिंब टिंबमध्ये दम हवा ना !
मग भोपाळसेठनी आपल्या पेढीवर कामाला असलेल्या मराठी भाषकांना दोन - पाच हजारांची तनखावाढ देऊन औरंगाबादी पाठवायचे ठरविल्याचे कळते. पण त्यावर औरंगाबादी सेठ दरडावून सांगताहेत म्हणे, की एवढी तनखावाढ घेऊन गाव सोडण्यापेक्षा आमच्याकडून तेवढीच तनखावाढ घ्या आणि आमच्या समाचारासाठी या. तुमच्याच गावात राहा. हे समाचाराचे बोलणे त्यांच्या पचनी पडत असल्याचे आम्ही ऐकून आहोत. बरे, सध्या स्थळकाळवर्तमानाने स्थिती अशी आहे की औरंगाबाद नगरीचा पत्रकार पोळलेला आहे. आज अनुभवी गणले जाणारे सर्व लोक एकेकाळी तीन महिन्यातून एकदा पगार, कमी पगार यामुळे गांजलेले होते. शेटजी आणि मालकांच्या आसर्याला आल्यावर बिचार्यांच्या घरी महिन्याचा किराणा वेळेत येऊ लागला. खाऊन पिऊन गालावर चमक दिसू लागली. बायकोला सणावाराला साडी घेता येऊ लागली. अशी सिस्टिम लागल्यावर आज दुप्पट पगाराच्या मागे लागून उद्या भोपाळसेठने गादी गुंडाळली तर रोजच्या अन्नाला मोताद व्हायची वेळ. पुन्हा जुन्या वळचणीला कोण बसू देणार? आणि आज जायचेच तर अशी अशी माणसं तिथं दिसताहेत की अशांच्या सोबत काम कसे? बरे, रोज पुण्यातून काळीपांढरीवाल्याच्या करामतींचे किस्से औरंगाबादी बाजारात जाऊन पडत आहेत. त्यामुळे या माणसाचे दाखवायचे रुपडे वेगळे आणि प्रत्यक्षात थोबडा वेगळा असे दिसून येऊ लागले. कुमारस्वामी तर कुणाच्या हाती कधी लागणार?
आता अशा स्थितीत भोपाळसेठने लोकांच्या मताला सुरुंग लावण्यासाठी बत्ती घेऊन शिलेदारांना पाठविल्याचे कळते. मोठ्या हिकमतीने लोकांच्या मतातून माणूस पळवून त्याच्या हाती साक्षात भास्कराचे सुकाणू देण्याची त्यांची स्कीम आहे असे कळते. पण यात यश मिळेल का? काळीपांढरी दाढी जोवर तेथे आहे आणि कोब्र्याचे विष भिनण्याची शक्यता जोवर आहे तोवर सुकाणू त्या दिशेला वळण्याची शक्यता दिसत नाही आणि दुसरे म्हणजे औरंगाबादी सेठची सुकाणूवरील पकड इतकी मजबूत आणि सुकाणूची दिशाही शेठला हवी तशी, अशा स्थितीत भास्कराचे सुकाणू कोणाचे हाती? म्हंजे आता असे होत आहे की जबरदस्त बॅनर, प्रचंड बजेट, दिमाखदार सेट, खतरनाक स्टोरी, अशुतोष गोवारीकर डायरेक्टर आणि हीरो हिरॉईन कोण, तर शायनी अहुजा आणि राखी सावंत...! बाप्पा रे बाप्पा...! प्रोड्यूसर भोपाळसेठ, तुमचे काही खरे नाही !
हे सगळे रामभरोसे बरे चालल्यानंतर, खरे तर आता औरंगाबादी सेठनेही जरा लोकांची मर्जी खरोखरी जाणून घेतली पाहिजे. येवढे दिवस त्यांचे दिवस होते. पण आता कमीतकमी ‘चॉलेंज’ मिळाल्यावर तरी त्यांनी शहाणे झाले पाहिजे. बाबुजींच्या निवडणुकीच्या काळात जसे सारे लोकमतवाले विनम्र असतात तसे नेहेमीच राहिले पाहिजे. जाहिरात नसली तरी बातम्या लावल्या पाहिजे. साडेतीन हजाराची कॅपॅसिटी असलेल्या गारखेड्याच्या संकुलात एपीएल - एएफएलच्या फायनलसाठी साठी 50 हजाराची गर्दी जमल्याची थापेबाजी बंद केली पाहिजे. वानखेडेची वाढलेली क्याप्यासिटी 35 हजाराची आहे हे तुम्हीच छापता आणि ती गर्दी लोकांनी टीव्हीवर पाहिली आहे, त्यामुळे 50 हजार कशाला म्हणतात हे जन्तेला माहिती आहे. आणि तसेही लोक तुमच्या माघारी ‘फेकमत’ अशीच संभावना करतात. हे तुम्हास ठावूक आहे का?
असो. मुद्दा हा की मोठ्या जोराने निघालेला भास्कराचा रथ महाराष्ट्राच्या सीमेवर दलदलीत फसला आहे. बाहेर ओढून काढायचा तर घोडेही मिळेनात. रस्ते आणि दलदलीचा खरा अंदाज नसणारे ‘एसी प्रेमी’ सारथी घेतले की असेच होणार. चालायचेच. सारथी बदला. साथी बदला. चाके बदला. घोडे मिळू शकतील. पण इथेच भोपाळशेटांचे घोडे पेंड खात असेल, तर?
सांज ढले... गगन तले... तुम कितने एकाकी....!