19 अप्रैल 2011

काय तो तमिळ देश... काय ती अम्मा... काय ते कलैग्नार... काय ते डोंगरधारी

आम्ही सध्या तमिळमय आहोत... यन्न रास्कला... अख्ख्या होल महाराष्ट्रात आमची किंमत कळली नाही पण त्या तमिळनाडूने आमचे कौशल्य जोखले आणि आम्हाला आदरपूर्वक चेन्नईत पाचारण केले. मागचे पंधरा दिवस आम्ही तमिळदेशच्या राजधानीत तळ ठोकून आहोत. थोडे-फार आजूबाजूलाही फिरून झाले पण हेडक्वार्टर चेन्नईच. काय तो रुबाब म्हणायचा तिथल्या विधानसभा निवडणुकीचा. आमच्या कार्यकौशल्याच्या कथा ऐकून साक्षात अम्मांच्या शिलेदारांनी आम्हास चेन्नईत पाचारण केले होते. पुणे ते चेन्नई आणि परत असा विमानप्रवास, चेनैतले वास्तव्य फाईव्ह स्टार हॉटेलात असा सारा सरंजाम ! आम्हाला खूपच भरून आले होते.

इथे महाराष्ट्रात आमच्या कंटेंट ऍनॅलिसिसची कुणाला किंमतच नाही हो... आधी कामे मिळवताना पळापळ, मग कामे करताना पळापळ आणि शेवटी बिले वसूल करताना पळापळ... नुसतीच पळापळ नशिबाला लागलेली. बरे एवढे करून पैसे तरी पूर्ण मिळावेत? छे हो... ‘इलेक्शनचा खर्च फार झाला, तुम्ही थोडे कमी घ्या’ असे म्हणत, निर्लज्जपणे हसत 15-20 टक्के रक्कम कमीच हाती पडायची... सालं, बिलं कमी करायला फक्त आम्हीच सापडतो... पण अम्मांचा अनुभव चांगला होता. अम्मांची भेट कधी झाली नाही पण त्यांचे विश्वासू साथीदार षण्मुगम यांनी त्यांचे उजवे हात सुब्रमण्यम यांना आमच्या तैनातीत ठेवले होते. तिथला सारा पसारा आवरून आम्ही नुकतेच पुण्यात परतलो आणि वर्तमान घेण्यास सुरवात केली.

शरीराने आम्ही इथे आलो पण मनाने तिथेच आहोत. आमच्या कामाची एक खासियत आहे. भलेही आम्ही फाईव्ह स्टारात उतरलो होतो पण तिथला प्रवास मात्र आम्ही यष्टीनेच केला... समाजात मिसळल्याशिवाय खरे प्रतिबिंब कळत नाही असे म्हणतात... (आमच्या इथल्या तमाम एडिटरांना सांगायला हवे...) तर, यष्टीने प्रवास - फाईव्ह स्टारात निवास - सल्ला मसलती आणि निष्कर्ष हा की पुढचे तमिळ सरकार अम्मा बनविणार... अगदी नक्की... लिहून देतो...

असो, पण घार हिंडते आकाशी - लक्ष तिचे पिलापाशी म्हणतात तसे आमचे झाले होते... सगळे लक्ष महाराष्ट्राकडे... आम्ही अनेकांच्या संपर्कात होतो... मुंबई - पुणे - नाशिक - कोल्हापूर - रत्नागिरी - औरंगाबाद - नागपूर - अकोला अशा सगळ्या भागांतून आमच्याशी संपर्कात असलेल्या हितचिंतकांशी आम्ही वेळ मिळेल तसा संवाद साधत होतो. आमचे धाकटे बंधू म्हणविणारे बेरकोबाही आमच्या संपर्कात होते. हा ‘बेरक्या’ की ‘बारक्या’? याला ‘बेरक्या’ या आपल्या नावाचाही अर्थ कळत नाही. फेसबुकवर कोणीतरी खरा अर्थ सांगतो आणि हा उगाच तिच्यावर डाफरतो. मराठवाड्यात आणि त्यातही ग्रामीण भागातील हीच बोंब आहे. असो, पण हा उगीच त्या कोणा रेडिओतील ‘संजय’ची तरफदारी करीत असतो. आम्ही म्हटले... ‘येत्या 1 जानेवारी 2012 ला आमची खरी ओळख सांगणार’, की हा म्हणणार - ‘मी पण’. आम्ही म्हटले : ‘वाचा, विचार करा आणि सोडून द्या... टेक इट ईझी’, की हा पण तेच म्हणणार ! काय म्हणायचे या बालबुद्धीला? पण म्हटले जाऊ द्या. खरे तर त्याची पुराव्यासहित ओळख आमच्याकडे आहे. पण... असो. तर म्हाराज, बर्‍याच बातम्या आम्हास चेन्नैमुक्कामीच कळल्या. पण ब्लॉग अपडेट करायला वेळच नव्हता...

आज पहाटेपासूनच आम्ही कामाला लागलो आहोत. सगळा बॅकलॉग भरून काढायला हवा. पण बॅकलॉग म्हटले की आम्हाला मराठवाडा आठवतो. मराठवाडा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा बॅकलॉग. अगदी स्वातंत्र्यापासूनचा. भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट 1947 तर मराठवाड्याचा 17 सप्टेंबर 1948. तर अशी ही बॅकलॉगची परंपरा. पण सध्या हा बॅकलॉग भरून काढायची चढाओढ सगळीकडे लागली आहे. तिकडे भोपाळसेठ औरंगाबादी फुकट पेपर वाटायच्या तयारीला लागले आहेत तर इकडे मुंबईत एक राजकीय नेते फुकट गौरव वाटायच्या मागे लागले आहेत ! आमचे परममित्र अश्विनीकुमार डोंगरधारी या पुरस्काराने सध्या भलतेच खुशीत आलेले दिसताहेत. भीमसेनांना भारतरत्न मिळाल्यानंतरही जेवढा आनंद झाला नसेल तेवढा त्यांना या पुरस्काराने झाला आहे. साहजिक आहे. ‘अर्ज न मागवता हा पुरस्कार दिल्याने पुरस्काराचे महत्व आहे’, असे त्यांचे म्हणणे आहे. चांगली गोष्ट आहे. दर वर्षी एक पत्रकार, एक राजकीय नेता, एक समाजसेवक, एक शास्त्रज्ञ, एक कलाकार, एक असाच कोणीतरी असे सात - आठ जण असेच म्हणतात म्हणे ! पण लोकमताला त्यांची किंमत नाही. साक्षात आपला राजधानीतील आधार असलेल्या अश्विनीकुमाराला पुरस्कार (तो ही अर्ज न मागता) मिळाला पण त्यांचा फोटो नाही हो छापला. लोकमत म्हणजे खरेच फेकमत आहे... नाही का हो डोंगरधारी सर? आत्ता नाही उत्तर देणार? दुसर्‍या पेपरमध्ये गेल्यावर देणार का? ठीक आहे. आम्ही समजू शकतो...