7 अप्रैल 2011

औरंगाबादेत ‘एमएनएस फ्रंट’ची स्थापना ः राज ठाकरे प्रमुख मार्गदर्शक

हिंदीभाषिकांच्या आक्रमणाविरुद्ध
मराठी वृत्तपत्रांची आघाडी स्थापन
औरंगाबाद, दि. 7 (आमच्या खास प्रतिनिधीकडून ) ः महाराष्ट्रात होत असलेल्या हिंदी भाषिक वृत्तपत्रांच्या आक्रमणाविरुद्ध एकवटण्याचा निर्णय आज भर दुपारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये घेण्यात आला. महाराष्ट्रातील औरंगाबाद या तिसर्‍या दर्जाच्या शहरात येऊ घातलेल्या एका हिंदी वृत्तपत्रसमूहाच्या मराठी आवृत्तीच्या निमित्तावरून हा गदारोळ उठला असून औरंगाबादमध्ये कार्यरत असलेल्या लोकमत, सकाळ, सामना आणि तरुण भारत या चार दैनिकांनी मिळून ही आघाडी उघडली आहे. ‘मराठी न्यूजपेपर सॉलिसिटेशन फ्रंट’ असे या आघाडीचे नामकरण करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या इशार्‍याकडे वेळीच लक्ष दिले असते तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती असा चर्चेचा सूर या वेळी व्यक्त करण्यात आला. या आघाडीच्या पुढील वाटचालीसाठी मनसे प्रमुख श्री. राज ठाकरे यांची एकतर्फी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणाही या वेळी करण्यात आली.

मध्यप्रदेशातील एका सुप्रतिष्ठित वृत्तपत्रसमूहाचा मराठवाड्यातील औरंगाबाद शहरातून मराठी वृत्तपत्र सुरू करण्याचा इरादा व्यक्त होताच साधारण सहा महिन्यांपुर्वी मराठवाड्यातील वृत्तपत्रसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. शहरात 150 मर्सिडिझची खरेदी झाल्याच्या बातमीमुळे देशभरात खळबळ उडालेली होती. या शहरात भरपूर पैसा आहे या भावनेने या ग्रुपने औरंगाबादेतून आपला सुर्योदय करण्याचे ठरविले होते. ही चाहूल लागताच लोकमतने सर्व दैनिकांमधून माणसे पळवून साठेबाजी करण्याचा एकच सपाटा लावला होता. एकाच वेळी तीन लोकमत काढता येतील एवढा अतिरिक्त भरणा त्यांच्याकडे झाला आहे. या तुलनेत शहरात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या सकाळ या वृत्तपत्राने आपल्याकडील बर्‍याचशा कर्मचार्‍यांना सहजपणे लोकमतच्या हाती लागू दिले. त्यामुळे त्यांच्याकडे मनुष्यबळाची चणचण निर्माण झाली. सामना, तरुण भारत, पुण्यनगरी, (न निघणारा) पुढारी, (संध्याकाळी निघणारा) सांजवार्ता या सर्वच दैनिकांत विविध पदांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी भास्कर ग्रुप येताच त्यांच्याकडे धाव घेतली.

माणसे इतरांना भाड्याने देता येतील का याची चाचपणी 
औरंगाबादच्या मराठी पत्रकारांनी स्वप्नातही कल्पना न केलेले आकडे भास्कर ग्रुपने मान्य करण्यास सुरवात केल्याने त्यांच्याकडील माणसांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला आणि इतर दैनिके ओस पडण्याचा धोका निर्माण झाला. लोकमतचा एकही माणूस घ्यायचा नाही, हा धोरणात्मक निर्णय झाल्यामुळे या ग्रुपमधून आतापर्यंत एकही कर्मचारी तिकडे घेतला गेला नाही. मात्र इतर दैनिकांची कार्यालये ओस पडली.

या पार्श्वभूमीवर लोकमतचे ऋषि मुनी यांच्या निमंत्रणावरून सकाळचे ये पी, सामनाचे भरतमुनी आणि तरुणभारतचे कोणीतरी यांच्यात आज भर दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. लोकसत्ताच्या औरंगाबादच्या प्रतिनिधीला निमंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण प्रेमभंग झालेल्या कॉलेज तरुणाप्रमाणे त्यांची अवस्था झाल्यामुळे ‘तेरी गलियों मे ना रखेंगे कदम, आज के बाद’ हे एकच गाणे ते मागील आठवडाभर गात असल्याचे कळले. त्यांचे सहकारीदत्त म्हणून उपस्थित होण्याच्या प्रयत्नात होते पण बर्दापूरकर यांचा फोन आल्याने ते निघून गेले. त्यामुळे त्यांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना नाही घेतले तरी चालेल, त्यांचे सक्यऊलेशन आहेच तरी किती असा मुद्दा तरुणभारत वाल्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला पण स्वतःचा खप आठवल्याबरोबर ते गप्प झाले. परराज्यातून होत असलेल्या आक्रमणावर या वेळी प्रामुख्याने सर्वांनी मतप्रदर्शन केले. यानंतर या कॉनफ्रन्समध्ये महाजन, दळवी, तुळशी यांनाही सहभागी करून घेण्यात आले. टेलिफोन भवनमधून निघणार्‍या वायरवर आकडा टाकून आम्ही गुप्त कनेक्शन मिळविल्यामुळे आम्हाला ही सर्व बित्तंबातमी कळली.

या प्रसंगी गांभीर्यपूर्वक चर्चा झाली असली तरी मुख्य आग्रही होते ऋषि मुनी. एवढ्या प्रचंड प्रमाणावर माणसे घेऊन ठेवल्याने त्यांचे पगाराचे बॅलेन्सशीट बिघडत असल्याचे त्यांच्या चेहर्‍यावरून दिसत होते. मधल्या काळात पगारी वाढवून ठेवल्यामुळे तो वाढीव ताण पडलेला आहे. अशा स्थितीत आपली माणसे इतरांना भाड्याने देता येतील का ही चाचपणी करणे हा या कॉन्फरन्सचा हेतू असल्याचे लक्षात आले.

चौघांचा मिळून एकच रिपोर्टर
या पार्श्वभूमीवर - यापुढे शहरातील प्रत्येक बीटवर या चार दैनिकांचा मिळून एकच रिपोर्टर राहणार आहे. काही महत्वाच्या बीटवरून ताणतणावाची स्थिती निर्माण झाल्यास संबंधित एका रिपोर्टरने इतर तिघांच्या हप्तेबंदीची सोय संबंधितांशी सुसंवाद प्रस्थिपित करून पाहावी असे यामध्ये ठरले आहे. सर्व दैनिकांमध्ये येणारी सगळी पत्रके यापुढे एकाच ठिकाणी स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून सामनाच्या कार्यालयात ही पत्रके स्वीकारून तेथेच त्याचे संपादन व अक्षरजुळणी होईल. यामध्ये प्रत्येक ठिकाणी असलेल्या मराठीच्या वेगवेगळ्या पॅकेजचा अडथळा येऊ शकतो ही बाब श्री. महाजन यांनी दृष्टीस आणल्यानंतर श्री. ये पी यांनी तातडीने मॉड्यूलर वाल्यांना फोन लावून सर्व दैनिकांत एकसमान सॉफ्टवेअर बसवून देण्याचे सांगितले. याचे बिल सध्या सकाळ देईल आणि कालांतराने ते इतरांकडून वळते करून घेण्यात येईल असेही ठरविण्यात आले. क्राईम नोट, बाजारभाव, महापालिकेतील घडामोडी, शहरातील राजकारण या आणि अशा प्रकारच्या सर्व बातम्या सर्वच दैनिकांत सारख्याच असतात, त्यामुळे आपण ही बातमी कोठे वाचली होती हेच वाचकांना संध्याकाळी आठवत नसते. त्यांच्या या मर्जीचा कौल मानून बातम्यांच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री. राज ठाकरे यांच्या इशार्‍याकडे त्याच वेळी लक्ष द्यायला हवे होते असा सूर या वेळी श्री. महाजन यांनी मांडला. त्याला श्री. ये पी यांनी खिन्न मनाने दुजोरा दिला. ऋषि मुनी सुद्धा या प्रसंगी भावनाविवश झालेले दिसले. सामनाशी संबंधित लोकांचा रुमाल नेमका याच वेळी खाली पडल्यामुळे त्यांचे चेहरे टेबलाखाली झाकले गेले. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

या प्रसंगी पुढील दिशा ठरविण्यात आली असून, वर घेतलेल्या निर्णयाबरोबरच आगामी काळात बचतीचे जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परराज्यातून येत असलेल्या वृत्तपत्राने दिलेले प्रचंड पगार हे सर्वांच्या चिंतेचे मुख्य कारण असल्याचे दिसले. एवढे दिवस छटाक (पगार) घेणार्‍यास थेट आतपाव (पगार) मिळाल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत तशाच आता आत असलेल्यांच्याही अपेक्षा वाढत आहेत. अशा वेळी काय करायचे हा पेच सर्वांसमोरच उभा असल्याचे दिसले. ये पी यांनी आपण अजिबात पगार वाढवू शकत नसल्याचे स्पष्ट करतानाच वाढवायचेच असले तर किती वाढवावे लागतील याचा कानोसा घेतला. ऋषि मुनी यांनी आपल्याकडील मनुष्यबळाचा मुद्दा मांडत त्यांचे भाडे मिळू शकेल काय असा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला पण इतर सर्वांनी तो हासण्यावारी नेत हाणून पाडला.

परराज्यातील वृत्तपत्राने तेथील नव्या आवृत्त्या सुरू करताना तेथील माणसांना कसे फोडले आणि त्यांचे पगार कसे कमी केले याचे रसभरीत वर्णन ऋषि मुनी यांनी करताच ये पी यांनी त्यांच्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. त्याचा अर्थ सर्वांनीच समजावून घेतला. या पार्श्वभूमीवर, तशा स्थितीत ‘सुबह का भूला छह महिने बाद की शाम को घर लौटा’ तर काय करायचे? यावर प्रतिक्रिया आजमावण्याचा प्रयत्न ये पींनी केला. तेव्हा ऋषि मुनी यांनी सुचविलेला तोडगा असा ः ‘सुबहका भूला शाम को लौटता है और उसकी हमको भी जरुरत है तो ले लेना चाहिये। मात्र या वेळी कॉलेज प्रवेशाप्रमाणे प्रेस प्रवेशाच्या वेळी त्याच्याकडून डोनेशन घेता येईल. त्याच्या तेथील पगाराच्या 40 टक्के रक्कम त्यांनी डोनेशन म्हणून संबंधित मालकाकडे जमा करावयाची आणि मागील पगाराच्यापेक्षा 10 टक्के कमी पगारावर काम करण्याची ऑर्डर मिळवायची, कारण सरकारी नोकरीत सुद्धा अशी डोनेशनची प्रथा आहेच, असे त्यांनी जोर देऊन सांगितले. या विषयावर सर्वांचेच एकमत झाले आणि आपापल्या ऑफिसमध्ये चहा मागवून व आपापले बिल स्वतःच चुकवून या कॉन्फरन्सची सांगता झाली. पुढील आठवड्यात श्री. राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेण्याचे या वेळी ठरविण्यात आले.