सांप्रतला मर्हाटी वृत्तपत्रसृष्टी पार ढवळून निघाली आहे. प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने पाहतो आहे. परस्परांची नुस्तीच चढाओढ सुरू आहे. म्हणजे हा चढला की तो ओढतो- तो चढला की हा ओढतो. मग प्रत्येक जण आपापल्या मठीत परत जातो. इकडे मुंबईत समर खडस नावाचा विना काना-मात्रा वेलांटी-उकाराचा माणूस मटाच्या मठीतून दिव्याच्या प्रकाशात जात पावन झाला आणि त्यांच्या सोबत त्यांचे नेतृत्व मानणारे पाच जणही मागोमाग गेले. मुंबई ब्यूरो असा एका झटक्यात सुरू करण्यात भोपाळसेठना यश मिळून गेले. नाशकात - जळगावात सध्या सर्व्हेचे काम सुरू झाले आहे.
औरंगाबादेत मेंबरशिपने 60 हजाराचा आकडा पार केल्याचे कळते. हे बरीक जबरदस्त झाले आहे. सगळ्याच दृष्टीने मराठीत फाईव्ह स्टार पत्रकारितेचा उदय झाल्याचे सध्या दिसत आहे. नाही तर एव्हढे दिवस हालत बेकार होती ! टाईम्स - एक्स्प्रेस ग्रुपने मराठीला कायम बायप्रॉडक्ट मानले आणि लोकमत - सकाळ कधी मध्यममार्गाबाहेर पडले नाहीत. इतर सर्व जण गली मे शेर ठरले. यात एक मात्र चांगले झाले - सगळ्या मालकांच्या खिशातून पैसा बाहेर येऊ लागला. इंग्रजी जर्नालिझमच्या तोडीचे पगार मर्हाटी भूमिपुत्रांना मिळायला सुरवात झाली. चांगला पगार देण्याची ही इमानदारी मालकांनी आधीच दाखविली असती, तर आता झोप उडाली नसती. बरे, एवढे होऊनही अजून पीळ जाईना. त्या परमजित संधूंनी लोकमताला करोडांचा फायदा मिळवून दिला म्हणे, पण त्यांचा पगार होता 80 हजार. त्यांनी लाखभर पगार मागितला, पण मालकांनी या वाढीला नकार दिला. ऐन लढाईच्या वेळी सरसेनापतीच रिटायर हर्ट...! आता काय करणार?
तर, आता काळ बदलला आहे. सगळेच हादरले आहेत. आखीर धंदा है भाई. नवा वाटेकरू येणार तर सगळ्यांचीच झोप उडणार. आता सगळीकडे बैठकांचे सत्र सुरू झाले आहे, असे एकू येत आहे. आधी बैठका ही संघवाल्यांची मोनोपली होती. मग संघवाले सकाळमध्ये घुसल्यानंतर ती तिथली मोनोपली झाली. तिकडून ते लोण आता लोकमत आणि भास्कर ग्रुपमध्ये आल्याचे कळते. भास्करवाल्यांना तर पर्यायच नाही पण लोकमतात मात्र बरीच खळबळ माजल्याचे कळते.
या युद्धाची सुरवात औरंगाबादेतून होत असल्यामुळे सर्वांचे लक्ष तिकडे असल्याचे कळते. दस्तुरखुद्द थोरले बाबुजी सगळ्यांवर लक्ष ठेवून आहेत म्हणे. धाकटे बाबुजी आपल्या काही समभाषिकांच्या कोंडाळ्यात अडकून पडल्याने मराठी जगतात बरीच नाराजी असल्याचेही कानावर येते आहे. खरे खोटे देवाला माहिती पण नवा पेपर येणार म्हणून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तेथे सैन्याची जमवाजमव सुरू झाल्याचे कानावर येते आहे. सगळीकडची महत्वाची माणसं औरंगाबादी नेऊन बसवून बाबुजी आपला लढा देणार असल्याचेही कानावर येत आहे. पण आमच्या अल्पमतीप्रमाणे आम्हास प्रश्न असा पडतो, की बाहेरगावची ही माणसं तिथं नेऊन काय होणार? त्यांना औरंगाबादचे ओ की ठो माहिती नसेल ! मग असा फौजफाटा जमवून काय उपेग? उलट चंमतगं अशी होईल, की हे लोक आले म्हणून लोकल लोक निश्चित राहतील आणि आपण पाहुणे कलाकार म्हणून बाहेरून गेलेले हे लोक निवांत बसतील. मग आहेच - हैदोस धुल्ला...! ऋषिजी, काय चालले आहे तुमच्या राज्यात?
बाकी काहीही होवो, पण सांप्रतला मर्हाटवाडी साहित्यिकांना बरे दिवस आले आहेत, असे दिसते. तिकडे भास्करवाल्यांनी गटागटाने जेवायला बोलावून चर्चा सुरू केल्या आणि इकडे लोकमतानेही त्यांची स्फूर्ती घेऊन साहित्यिक मेळाव्याची घोषणा करून टाकली. साहित्यिक जमातीचे एक बरे आहे. दोन टाईम हादडायला आणि एक टाईम बडबडायला मिळाले की ही मंडळी खुश होते. जाण्यायेण्याचा खर्च मिळाल्यावर तर काय बघायचे महाराजा? आणि रात्रीच्या बैठकीची व्यवस्था झाली तर मग बघायलाच नको. तर असे हौशे गौशे नौशे लवकरच त्यांच्याकडे जमणार असे कळते आहे. हा कार्यक्रम 'रामा'त करणार की 'अजंठा'त हे मात्र माहिती नाही. 'प्रेसिडेंट पार्क' तर मागेच बंद झाले. आता काय करणार? कारण एवढे सगळे करायचे आणि केटरर लावून जेवण घालायचे, तर ते काही बरोबर नाही बाबुजी... हा काही सखी मंच नाही. हा सख्याहरींचा ‘बंच’ आहे. कमी अधिक समजून घ्यालच...!