28 अप्रैल 2011

उडदामाजी तांबे-ठाले.... कोणा निवडावे न कळे....!

फुकट्यांच्या विश्व साहित्य संमेलनास 
मॉरिशसकरांचा स्पष्ट नकार...!
साहित्याच्या प्रांगणात फुकट्यांची गर्दी प्राचीन काळपासून होत आलेली आहे. पत्रकार अधिक फुकटे की साहित्यिक, या विषयाच्या मुळाशी गेलो तरी नेमके वास्तव हाती येणे कठिण. पण पत्रकारांच्या फुकटेपणाला नावे ठेवली जातात आणि साहित्यिकांच्या फुकटेपणाला मराठी सारस्वताची सेवा म्हणून गणले जाते, हा मोठा दैवदुर्विलास आहे.

परमादरणीय कौतिकरावजी ठालेपाटील साहेबांच्या औद्धर्त्यामुळे मराठी साहित्य विश्व साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अखेर जागतिक पातळीवर पोहोचले. तेव्हा त्यांचेवर काय कठोर टीका झाली होती महाराजा... विचारता सोय नाही. त्यामुळे ते साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदावरून जाताच मायमराठी पुन्हा आपल्या महाराष्ट्रदेशी आपले मन रमवील, अशी अपेक्षा होती, पण आदरणीय ऊषा तांबे बाई पण झाशीच्या राणींच्याच वंशज निघाल्या. त्यांनीही आपला घोडा भारताच्या सीमेवरून मॉरिशसच्या भूमीवर उधळत नेण्याचे मनसुबे बाळगले. पण हाय रे दैवा... याआधी मनोहर जोशींच्या काळात भव्य आयोजन करणार्‍या जाम परिषदेच्या मॉरिशस मंडळाने या वेळी मात्र चक्क स्पष्ट शब्दांत आपला नकार कळविला म्हणे. काय करतील बिचारे?

अखिल भारतीय म्हणविणार्‍या मंडळातून मराठी साहित्यात फारशी उठाठेव न करणारे आणि मराठी साहित्य विश्वात नसत्या उठाठेवी करणारे शंभर-पन्नास जणांचे टोळके परदेशात जाऊन आयोजकांच्या गळ्यात पडते. त्यांच्या खर्चाने परदेशी ट्रिप काढण्याची हौस पूर्ण करून घेते, ओकून होईपर्यंत प्याले रिचविते आणि वरून आयोजकांनाच अक्कल शिकविते! मागच्या वर्षीची ही नाटके आठवून बहुधा मॉरिशसकरांनी या सारस्वतांना अद्दल घडविण्याचे ठरविले असेल.

गंमत म्हणजे ठाल्यांच्या कल्पनेला इतर सर्व साहित्य संघांचा तात्विक विरोध होता. पण तेव्हा हा विरोध का झाला असावा, याची कल्पना आता येऊ लागली आहे. ठाल्यांच्या यादीत वर्णी लागू न शकणार्‍यांचा हा गलका होता. आता आपापली तिकीटे पक्की होणार हे दिसताच सर्वांना परदेश प्रवासाचे स्वप्न पडू लागले. मॉरिशसच्या रम्य वातावरणात फुकटात चार दिवस ऐय्याशी करण्याची स्वप्ने पाहणार्‍या सारस्वतांना जमिनीवर उतरावे लागले. आता म्हणे सिंगापूरच्या गळ्यात पडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

काय ही दरिद्री धडपड? अरे हिंमत असेल तर स्वखर्चाने जाऊन मॉरिशस - सिंगापूर पाहा ना... खर्च किती येतो? लाखभरात सगळी ट्रिप होते. मग कशाला मराठी दारिद्‌—याची लक्तरे जागतिक वेशीवर मांडता? सार्‍या महाराष्ट्राची बेअब्रु करता ? ठाल्यांनी गाय मारली म्हणून हे आता वासरू मारायला निघाले आहेत...!


मराठी साहित्यिकांनो,
आम्हाला तुमची कीव येते. आम्हाला तुमची कीव येते... आम्हाला तुमची कीव येते...!