सांप्रतला सगळ्या मिडियाच्या जुन्या-जाणत्यांमध्ये एक भयंकर अस्वस्थता आम्ही पाहतो आहोत. मागची 15-20 वर्षे ही जाणती मंडळी एकाच ठिकाणी स्थिर राहिली. अत्यंत निष्ठावान लोक ! पण या निष्ठेचे कौतिक कुणाला? या मालक प्रवर्गाचे एक वैशिष्ट्य असते. सत्राशे-साठ दारे हुंगत फिरणार्यांना हे खास ‘फीड’ देतात आणि दारच्या निष्ठावंताची बोळवण कोरड्या हाडकांवर...! कोरडी हाडके चघळून यांच्याच ओठातून रक्त निघते आणि वर मालक म्हणतो, बघ कसा रक्ताळलेला तुकडा टाकला ! काय क्रूर विनोद. याला अपवाद कोणीच नाही.
प्रत्येक ठिकाणी अशी माणसं आम्ही वेचून काढून दाखवू शकतो. नुकतीच मिसरुड फुटलेले पोट्टे अगदी सहजपणे 40-50 हजाराचे आकडे कनवटीला लावून फिरताहेत आणि वर्षानुवर्षे घासून राहिलेली ही पांढर्या मिशावाली माणसं अजून 30-40 मध्येच ! काय सेठ? हीच का निष्ठेची किंमत? की नव्या बाजाराच्या नियमाप्रमाणे यांनीही दर तीन-चार वर्षांनी नवे घरोबा शोधायला सुरवात करायची?
सध्या मराठवाड्याचा विषय हॉट आहे म्हणून मराठवाड्यातली नावे घेऊ... जयंत महाजन - नुसता बोजा वाढवला पण पगाराचे काय? स. सो. खंडाळकर - नुसतेच ज्येष्ठ पत्रकार पण पगाराचे काय? चक्रधर दळवी - नुसतेच निवासी संपादक पण दिव्याच्या प्रकाशातील निवासी संपादकाच्या तुलनेत यांचा पगार किती? गणेश तुळशी - पद एक, जबाबदारी दुसरीच, कामाचा बोजा भलताच पण पद आणि पगाराचे काय? कोणत्याही जिल्हा प्रतिनिधींचा किंवा वार्ताहरांचा विषय आम्ही यात मिसळत नाही, कारण त्यांच्या पगाराचे आणि उत्पन्नाचे गणित आम्ही मांडू इच्छित नाही...!
असो, काळ बदलतो आहे. प्रत्येकाला आपली ब्रँड व्हॅल्यू कळली आहे. ही माणसे बाहेर पडू लागली तर काय होईल? बरे, ती एक-एकटी नाही जाणार... ग्रुपसह जातील... मग काय?
मालकहो विचार करा... या उन्हाळ्यात तरी चहापेक्षा रस बरा...!