27 अप्रैल 2011

साहित्यिक स्नेहमेळाव्यावर निमंत्रकाचाच बहिष्कार...!

17 फुल्ल, 3 हाफ साहित्यिक 
आणि 93 जणांचा गोतावळा...

अखेर होऊ नये तेच घडले. याचीच चिंता मागचे काही दिवस आम्हाला लागून राहिली होती. मराठवाड्यातील साहित्यिकांचा स्नेहमेळावा आयोजित केल्याची खबर लोकमतातून बाहेर आली, तेव्हाच आमच्या काळजाचा ठोका चुकला होता. तब्बल 29 वर्षे ज्या घडीची वाट समस्त मराठवाड्याने पाहिली, ती घडी अशी समोर आल्यानंतर खरे तर मन आनंदाने फुलून यावयास हवे होते... आपलेच खरे करणार्‍या ग्रुपने अखेर कधीतरी समाजात मिसळण्याची कृती करण्याचे मनावर घेतल्यानंतर खरे तर सर्वांना आनंद व्हावयास हवा होता... पण असे काही घडले नाही... मनात पाल चुकचुकणे, काळेबेरे मनात येणे, फट्‌ म्हणता ब्रह्महत्या, हात दाखवून अवलक्षण या आणि असा प्रकारच्या मराठी साहित्यविश्वातील असंख्य म्हणी आमच्या मनात येत गेल्या... हा प्रसंग लोकमतावर का बरे ओढवला...?

एका भास्कर ग्रुपने यांच्या तोंडाला फेस आणला आहे. त्यामुळे आठवून आठवून एकेकाला बोलावणे सुरू आहे ऐसे आम्ही ऐकून आहोत. हा प्रसंग त्यातीलच एक. त्या ग्रुपने अख्ख्या मराठवाड्यात जबरदस्त जाळे विणले आहे. औरंगाबाद शहरात तर त्यांनी पोहचण्याला एकही घर सोडले नाही. साहित्यिक वगैरे जमातींना तर ताजमध्ये बोलावून जेवण घातले आणि सोमरसही पाजला. भास्कर उगवताच लोकमतालाही जाग येऊ लागली आणि 29 वर्षांत प्रथमच साहित्यिकांना लोकमतात सन्मानाने निमंत्रित करण्यात आले. काय हा दैवदुर्विलास...! अख्ख्या महाराष्ट्राला सर्वाधिक खपविणार्‍या, सॉरी सर्वाधिक प्रती खपणार्‍या दैनिकाच्या हेडक्वार्टरमध्ये सध्या एकच हलकल्लोळ माजला आहे. त्या कल्लोळातून साहित्यिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

आधी आम्हास वाटले, की हा महामेळावा महाभव्य असेल. ताज - रामा - अजिंठा अम्बॅसडरमध्ये असेल. संध्याकाळी असेल. रात्रीपर्यंत चालेल. ‘विचारां’बरोबरच ‘आचारां’ची देवाणघेवाण होईल. पण शेठजी फार दूरदृष्टीचा माणूस. प्रिंटिंग मशीन हलविण्यानंतर रिकाम्या झालेल्या शेडमध्ये खुर्च्या मांडून तिथेच महामेळाव्याची सज्जता केली आणि तिथेच पाठीमागे, टॉयलेटच्या बाजूला धुळीच्या साम्राज्यात केटररच्या बल्लवकलेला जागा देण्यात आली. काय हे...? हा काय साहित्यिकांना खुष करण्याचा मार्ग झाला? या मार्गाने तर पेपर टाकणारी पोरंही खुश होणार नाहीत. त्यामुळे घडलेही तसेच. स्टेजवरील आणि स्टेजखालील साहित्यिके मोजल्यास तब्बल 17 फुल्ल साहित्यिक भरले. तीन हाफ (म्हणजे स्वतःला साहित्यिक म्हणवून घेणारे) सुद्धा होते. उरलेली खोगीरभरती कॉलेज विद्यार्थ्यांची...! सगळी मिळून झाली 93...! आता घ्या. काय करायचे?

आमच्या हाती औरंगाबादेतून आलेल्या विश्वसनीय माहितीनुसार कार्यक्रमास सुरवात झाली तेव्हा सर्व वक्तेही पोहोचलेले नव्हते. दुसर्‍या सत्राचे वक्ते पहिल्या सत्रात आले नव्हते आणि पहिल्या सत्राचे वक्ते दुपारी निघून गेले ! मंचाच्या पाठीमागे लावलेल्या पडद्यावर कॉंग्रेसचे निडणूक चिन्ह ‘हात’ वेगवेगळ्या अँगलमध्ये फिरवून लावण्यात आले होते आणि कोपर्‍यात ‘लोकमत नॉलेज फोरम’ चा लोगो छापलेला होता. हे नाव ‘लोकमत ज्ञान मंच’ असे करावे, असे या मराठी मंडळींना वाटले नाही...! आदरणीय करणजी दर्डा हे या ‘फोरम’च्या स्थापनेची घोषणा करणार, असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात ते या ‘दीड दमडी’च्या साहित्यिकांकडे फिरकलेही नाहीत! कदाचित अचानक ते लॉंग ड्राईव्हवर गेले असावेत. या भव्य मंचावर आदरणीय मोठ्या बाबुजींची तसबीर होती. या तसबिरीसमोर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. साहित्याच्या प्रांगणात, साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रथमच होत असलेल्या या भव्य मेळाव्यात ज्ञानदेवता माता सरस्वतीची तसबीर किंवा मूर्ती किंवा अस्तित्वही कुठे नव्हते...! साक्षात मराठी सारस्वतांच्या महामेळाव्यात, सरस्वतीच्या दरबारात सरस्वतीची ही अवहेलना...! याच साठी का मराठवाड्याने 29 वर्षे वाट पाहिली?

साहित्यिकांना पहिल्यांदाच बोलावले तर काही आदर सत्कार करायचा... आम्हाला प्रत्यक्षदर्शीकडून कळलेल्या माहितीनुसार, झाडाखाली मांडलेल्या एका टेबलसमोर लायनीत उभे करून सर्वांना नावे नोंदविण्याचे फर्मान सोडण्यात आले आणि नावे नोंदविणार्‍याला प्रवेशाचे ‘कीट’ वाटून टाकले. यातच महामेळाव्याचे स्मृतिचिन्हही होते. काय हा अपमान? सारस्वतांना स्मृतिचिन्हं अशी एका रांगेत उभी करून वाटायची असतात? प्लास्टिक फोल्डर - 2 रुपये, पेन - 1 रुपया, रायटिंग पॅड - 2 रुपये, स्मृतिचिन्ह - 25 रुपये, गळ्यात लटकविण्याचे लोकमतच्या नावाचे मंगळसूत्र - 3 रुपये आणि नाश्ता - चहा - जेवणाचे 75 रुपये असे प्रत्येकी 108 रुपयांच्या घाऊक दरात साहित्यिकांना पटविण्याचा लोकमताचा प्रयत्न अखेर फसला. मराठवाड्याने त्यांना आता 29 वर्षांनी ओळखले आहे ! त्यामुळेच परगावचे काही मोजके अपवाद वगळल्यास फारसे कोणी तिकडे फिरकले नाही.

खरे सांगायचे, तर महाराष्ट्रात मोठ्या तयारीनिशी उतरणार्‍या भास्कर ग्रुपच्या आगमनाची प्रचंड धास्ती शेठजींनी घेतली आहे. मध्यंतरी सगळ्या स्टाफशी त्यांनी वन-टू-वन चर्चा केली. काहींचे पगार वाढले. पण सिनियर तसेच कोरडे राहिले. खुद्द मॅनेजरही नाराज होऊन सोडून निघून गेले. जुन्या काळप्रमाणे आवळा देऊन कोहळा काढण्याचा सध्या शेठजींचा प्रयत्न सुरू आहे. पण लोक आता शहाणे झाले आहेत. मग ते कर्मचारी असोत, वाचक असोत की साहित्यिक... त्यांना शेठजींचे उद्योग माहिती आहेत. त्यातच अण्णा हजारे यांना अतिथी संपादक करण्याचे या मंडळींचे नाटक भलतेच अंगलट येते आहे. हा ग्रुप असे काही दाखवितो आहे, की यांचा भ्रष्टाचाराशी मागच्या तीन पिढ्यांपासून काहीच संबंध नाही...! हे लोकांना कळत नाही, असे वाटते का? स्वातंत्र्यपूर्व काळातील खजिन्याच्या गोष्टी विचारातही घ्यायच्या नाहीत, असे ठरले तरी मागच्या इलेक्शनमध्ये किती खर्च केला आणि तो कसा वसूल करणे सुरू असते, हे समाजासमोरील उघड सत्य असते. तेव्हा बिझनेसचा प्रतिकार बिझनेसनेच केलेला चांगला असतो. भलत्या गोष्टी केल्या की मुखकमल रंगण्याची शक्यता असते.

सारा मराठवाडा आता नव्या भास्कराच्या उदयाची प्रतीक्षा करतो आहे... दिव्य मराठीकडून सद्वर्तनाची अपेक्षा करीत, त्यांना आमच्या शुभेच्छा...!