‘नकटीच्या लग्नाला सत्राशे साठ विघ्ने’ अशी एक छानशी म्हण आमच्या अत्यंत बालपणी आमच्या गुरुजनांनी आमच्या कानात ओतली होती. नकटी म्हणजे काय, हे सुद्धा कळण्याचे ते वय नव्हते. तेव्हा शेजारच्या बबन्याने कोपर्यातल्या ठकीकडे बोट दाखवून ‘नकटी’ या शब्दाचे ‘सोदाहरण स्पष्टीकरण’ आम्हाला दिले होते. नव्या शैक्षणिक धोरणातील प्रयोगांचे महत्व तेव्हा आम्हाला कळले. पण बबन्याचे हे हस्तलाघव आमच्या आदरणीय गुरुजनांनी नजरेच्या कोपर्यातून पाहिले आणि त्यानंतर आम्हाला न्यूटनच्या सर्व नियमांचे ‘प्रयोगातून विज्ञान’ कळो आले. अवघ्या तीन मिनिटांत आमच्या ज्ञानाची पातळी कित्येक पटींनी वाढली !
असो. असे अनुभवसंपन्न प्रसंग आम्ही शक्यतो चारचौघांत सांगायचे टाळत आलो आहोत, पण कधी कधी जुनाट खोकल्यासारख्या अशा आठवणी उफाळून येतात आणि असे काहीतरी घडून जाते...
तर सांगायचा मुद्दा हा, की कालांतराने ‘त्या’ म्हणीचा ‘लाक्षणिक अर्थ’ आम्हाला कळो आला. नकटीच्याच काय, पत्रकारांच्या लग्नालाही सत्राशे साठ विघ्ने येतात, याचा अनुभवही दस्तुरखुद्द आम्हीच घेतला. (त्या काळी पत्रकारिता म्हणजे भिकेचे डोहाळे होते. आजच्यासारखी भोपाळसेठसारखी दैनिके तेव्हा नव्हती महाराजा... हजार - आठशेवर खर्डेघाशी करावी लागायची... मग कोणता बाप आपली पोरगी देणार? त्यामुळे पत्रकार जमात आणि नकटी या दोघांचे सुत जमत गेले. पाहा - अनेक जुन्या पत्रकारांच्या बायका शक्यतो नकट्याच असतात. असो, जुन्या जखमांवर फुंकर मारू नये म्हणतात. उगाच सल वाढतो !)
तर सांगायचा मुद्दा हा की, आमचे ऐकून भोपाळसेठ यांनी प्रेमजीत (!) यांना कामावर घेतले. (आमची कन्सल्टन्सी फी आता कुणाकडे मागायची बरे? मोठे अगरवाल की धाकटे की मधले? की आपला खांडेकरांनाच पकडू? पण ते म्हणणार - हा मॅनेजमेंटचा सब्जेक्ट आहे. माझा त्याच्याशी संबंध नाही. असो. परमजीतकडेच विचारणा केली पाहिजे. ही इज जंटलमन ! (फी मिळेपर्यंत तर नक्कीच!) तर प्रेमजीत रुजू झाले. आमच्या सल्ल्यावरून सेठनी त्यांना रुजू करून घेतले खरे पण इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात... हे गृहस्थ सकाळी निघणार्या दैनिकाच्या मराठवाडा आवृत्तीतील पहिल्या वितरण व्यवस्थापकाप्रमाणे तर ठरणार नाहीत ना? जाणकारांना त्याची कल्पना आहे. नवोदितांना काय सांगणार? उगाच जुन्या जखमांवर फुंकर...! तर, हे महोदय तिथे रुजू झाले खरे, पण त्यांना नव्या नोकरीचा ‘पगार’ आणि जुन्या नोकरीचे ‘पाकीट’ तर चालू नाही ना राहणार? कारण अशी पेरणी करण्याची इथल्या स्पर्धकांची खोड जुनी आहे...
असो... भोपाळसेठ आणि त्यांचे नशीब...
तर मुख्य मुद्दा हा की 1 मे रोजी बाजारपेठेत दिव्य प्रकाश फाकणार होणार असे जबरदस्त वातावरण महिन्याभरापुर्वी तयार झाले होते. मध्यंतरी उगाच वेळ लागत गेला. खरे सांगायचे तर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर, झहीर खान, युवराजसिंग, हरभजन यांच्याऐवजी स्टुअर्ट बिन्नी, रोहन गावस्कर, सुदीप त्यागी, सौरभ तिवारी, आरपी सिंग, मुरली कार्तिक, जयदेव उडाणकट, लक्ष्मीपती बालाजी अशी टीम घेऊन सशक्त संघाविरुद्ध मैदानात उतरायचे ठरले तर जिंकायची शक्यता किती? अर्थात मॅच फिक्स असेल तर गोष्ट वेगळी. तर चांगल्या खेळाडूंचा संघातला समावेश झालाच नाही, कारण कर्णधारांबद्दलच मोठी साशंकता...! मग काय करायचे? तर काठावर बसून मॅच पाहायची. अशा बदली खेळाडूंना घेऊन मॅच तरी कशी सुरू करणार? नव्या दिव्याचे गाडे टॉसपर्यंतही पोहोचेना.
अखेर टॉसचा मुहुर्त थोडा - म्हणजे दहा पंधरा दिवसांनी - पुढे ढकलला आणि पुन्हा शोधमोहीम सुरू झाली.
पण त्यातच आता आणखी एक दणका बसला आहे. पेपर छापून दिव्याचा ज्ञानप्रकाश पाडणारे अद्ययावत मशीन शेंद्—याच्या नव्या जागेत बसवण्याची प्रक्रिया चालू असतानाच घात झाला. भोपाळहून औरंगाबादकडे निघालेला, या मशीनरीजच्या टॉवर्स आणणारा कंटेनर महाराष्ट्र - मध्यप्रदेशच्या सीमेवर चक्क 20 फूट खोल खड्ड्यात कोसळला. सगळ्या टॉवर्सचा म्हणे सत्यानाश झाला. आता काय करायचे? तर एक - दीड महिना स्वस्थ बसायचे. कारण नवा टॉवर आल्याशिवाय मशीन सुरू नाही होणार आणि नवा टॉवर तातडीने येणेही शक्य नाही. आली का पंचाईत? यालाच म्हणतात ‘नकटीच्या लग्नाला सत्राशे साठ विघ्ने’.
याचाच अर्थ साधारण जूनच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात दिव्याचा प्रकाश पडण्यास सुरवात होऊ शकेल. तोवर पावसाळा सुरू होईल. पावसाळ्यात नवा पिक्चर, नवे प्रॉडक्ट, नवी लग्ने होत नाहीत. नवा दिवा कसा पेटणार? त्याच्या वाती सर्दणार, तेलात पाणी जाणार, हवा जोराची सुटली तर दिवा विझायची भीती. आता काय? बरे, दुसर्या छपराखाली जाऊन दिवा पेटवायची सोयही नाही. दिवा पेटवता पेटवता त्याच शेडमध्ये भडका उडाला तर? आली का पंचाईत?
आम्हाला त्यामुळे सध्या खूप टेन्शन आले आहे. आम्हीही दोनशे रुपये भरून दरमहा 45 रुपयांत आमच्या मुलांवर चांगले संस्कार करण्यास सिद्ध झालो होतो... आता संस्कार पोस्टपोन...!