(’लपविलास तू हिरवा चाफा’च्या चालीवर...)
लपविल्यास तू फुटक्या काचा,
‘काच’ तयाचा लपेल का?
पुस्तक ऐसे खपेल का?
सन्माननीय सलीलजी कुलकर्णी यांसी,
बोरुबहाद्दराचा सप्रेम जयभीम.
बोरुबहाद्दराचे वर्तमान सुरू झाले त्यास आता दोन - तीन महिने लोटले. प्रारंभीच कबूल केल्यानुसार पत्रकार आणिक साहित्यिक हे दोनच प्राणी आमच्या रडारवर आहेत कारण काही चटकदार घडावे ते यांच्याच आयुष्यात. या आयुष्यावर काही बोलण्यासाठीच आम्ही आमचा बोरू पारजला. एव्हडे दिवस आम्ही आमच्या पत्रकार बंधूंवर लक्ष केंद्रित केले आणि आज प्रथमच आम्ही आमच्या साहित्यिक जमातीवर आमचा बोरू पारजणार आहोत आणि त्यातील पहिला मान मिळविला आहे आमचे - आपले सन्माननीय आवडते डॉक्टर गवई सलिल. आयुष्यावर बोलून बोलून त्यांचा घसा सुकला म्हणून त्यांनी लेखणी झिजविली आणि यांच्या ‘फुटक्या काचा’ सगळ्यांच्या पायात घुसू लागल्या. साहित्यावर लेखनाचा आमचा पहिला मान आम्ही त्यांस देत आहोत. त्याबद्दल त्यांनी अस्मादिकांचे आभार मानायला हवेत. आता त्यांचे पुस्तक लवकर खपेल. (हे ’खपेल’ आम्ही चांगल्या अर्थाने म्हणत आहोत!)
...................
मात्र तिकडे वळण्याआधी थोडी साफसफाई आमच्या ज्ञातीबांधवांची... आमचा बोरू टोकदार आहे. आम्हास त्याचा अभिमान आहे. हा बोरू गुदगुल्या करण्यासाठी नाही तर जायबंदी करण्यासाठीच आहे. पण आम्ही उगाच कुणालाही जायबंदी करणार नाही. कारण आमचे धोरण पक्के आहे. आम्ही ‘आहे रे’च्या वर्गाविरुद्ध आहोत. सामान्य पत्रकारांची पिळवणूक करून त्यांच्या जिवावर मजा मारणारे संपादक खात्यातील वरिष्ठ लोक आणि मालक प्रवर्गातील लोक प्रामुख्याने आमच्या रडारवर आहेत. त्यांना आम्ही झोडपणार. मात्र सगळीकडून पिळला जाणारा श्रमिक पत्रकार आमच्यासाठी लोभाचा विषय आहे. त्यामुळे त्यांचे भले व्हावे, यासाठी आमच्या लेखणीची तलवार त्यांच्यासाठी मात्र ढालीचे रुप घेईल... काळजी करु नये.
सांप्रतला पत्रकारितेत नव्या संधी उपलब्ध होत आहेत. मुळात हे क्षेत्र टिचभर. इथे काही म्हणता काही लपत नाही. त्यामुळे, नव्या ठिकाणी जाऊन चार पैसे जास्त कमावण्यासाठी प्रयत्न करणार्यांना आमचे संरक्षण आहे. त्यांची नावे आम्ही कधीही जगजाहीर केलेली नाहीत. आजवर मालकांनी त्यांनी अक्षरशः लुटले... त्यांचे रक्त शोषून घेतले... त्यांना यानिमित्ताने चार पैसे जास्ती मिळत असतील, तर आमचा त्याला पाठिंबा आहे. त्यामुळे कोण कुठे जात आहे, जाणार आहे, प्रयत्न चालू आहे या संबंधी आम्ही कधीही बोलणार नाही... लिहीणार नाही. मग ते रिक्षात बसोन जावोत की टांग्यात... आणि मराठीतून हिंदीत जावोत की हिंदीतून मराठीत... बिनधास्त जा. थेटरात जाऊन फुकट नाटके बघायची आहेत.. तर जरूर बघा. नाहीतरी अख्खा नाट्यमहोत्सव फुकटच होता. आयोजक गृहस्थांनी तरी कुठे स्वतःच्या खिशातून पैसा ओतला होता? आयोजनाचा खर्च इतरांच्या गळ्यात मारून स्वतः प्रतिष्ठा कमवायची आणि उरलेला पैसाही गाठीला मारायचा, ही त्यांची खोड जुनी आहे. सहा वर्षांच्या आमदारकीनंतर झालेल्या पराभवानेही ते शहाणे झालेले दिसत नाहीत. दोन-तीन वर्षांवर आलेल्या पदवीधरच्या तयारीला ते लागलेले दिसतात. त्यामुळे अशा फुकट्यांकडून फुकटात तिकिटे मिळविणे हा बिलकुल गुन्हा नाही. आम्ही अशा बायकी चहाड्या लावणार नाही.
मात्र, आमच्या समस्त पत्रकार बंधू-भगिनींची पिळवणूक करणारा मालक असो की त्यांच्या ऑफिसातील ‘बॉस’, त्याला मात्र आम्ही सोडणार नाही. उदाहरणार्थ - आमचे मुंबईतील भाद्रपदप्रेमी अश्विनीकुमार डोंगरधारी... यांनी किती जणांचे नुकसान केले आहे? सर्व पापाचे माप त्यांच्या पदरात आम्ही घालणारच. वास्तविक, पत्रकारांनी आपापल्या योग्यतेप्रमाणे पगार मिळवावेत... गरजेप्रमाणे क्राईम, महापालिकेतील हप्तेही घ्यावेत पण हे हप्ते घेताना त्या मिंधेपणापोटी समाजाचे मोठे नुकसान तर होत नाही ना, याची काळजी अवश्य घ्यावी. सध्या नोकरी सोडून जाण्याचा, बदलण्याचा जमाना आहे. सोडून जाणाराचे जे देणे असेल ते मालक वर्गाने निमूटपणे देऊन टाकावे. अन्यथा... असो. आम्हीही एकेकाळी याच अनुभवातून गेलो आहोत. त्यामुळे अशी खबरबात असते. कोणास काही अडचणी असतील, तर बिनधास्त आम्हास मेल पाठवा. आम्ही संबंधितांना सरळ करू... त्या विषयी योग्य गुप्तताही पाळली जाईल. असो... सध्या या विषयी येवढे पुरे...!
........................
तर मूळ मुद्दा सलील कुलकर्णी यांच्या काचांबद्दलचा. त्यांच्या लेखनाचे भंगार आता सुंदर वेष्टणातून रसिकांसमोर येत आहे. फेसबुकवर तर सध्या त्यांच्या कौतिकाला फेस आला आहे. आपल्या स्वरमयी दुनियेतून या बाबाला इकडे का यावेसे वाटले, तेच कळत नाही. आधी लोकसत्ता आणि नंतर सकाळच्या वाचकांना त्यांनी दोन वर्षे वेठीला धरले. एवढ्या प्रदीर्घ लेखनातून हाती आलेल्या चमकदार गोष्टी किती? दोन -चारच... इतर सगळ्या काचा हातात खुपल्या, पायात घुसल्या, डोळ्यात शिरल्या, ह्रदयाला लागल्या... पण काय सांगणार? कुणाला सांगणार?
हे असे का होते? संदीप खरेने कविता लिहाव्यात आणि दोघांनी मिळून त्या गाऊन पैसे कमवावेत... एवढे पुरेसे आहे. बरे, ‘झी मराठी’ वाल्यांच्या दाढ्या खाजवून खाजवून, प्रोड्यूसरला मस्का मारून ‘सारेगमप’वर परीक्षक म्हणून वर्णी लावून घेतल्यानंतर आयुष्यावर बोलायची किंमत काय वाट्टेल ती वसूल करायला त्यांनी सुरवातही केली. आणि आजकाल गल्लोगल्ली एवढे लीडर झालेत आणि त्यांनी आपल्या काळ्याबाजारात एवढी कमाई करून ठेवली आहे, की वर्षाकाठी साधा नगरसेवकही करोडभर रुपये छापतो. त्यातून आयुष्यावर बोलायला दोन-चार लाख दिले तरी काळजी नाही... हे करताना बहुदा सलिलमहोदयांना वाटले असावे, की आपणही संदीपसारखे पुस्तक काढले पाहिजे. पण, संदीपच्या कविता वाचनीय असतात. सुसह्य असतात. आता यांनाही गायक म्हणून मिळणार्या मानाबरोबरच नायक होण्याची गरज भासू लागली. मग यांनी काय करावे? त्यांनी चक्क काही संपादकांनाच पटवले आणि झाला सुरू रतीब. मर्जीतली मंडळी कौतुकच करतील ना... त्यांनी कौतिक केले आणि यांना हरभर्याचे झाडच मोठे वाटू लागले. पण सामान्य वाचकांचे काय? त्या काचांचा किती त्रास या वाचकांनी सहन केला...!
देवाने गोड गळा दिलेला. त्यामुळे मेडिकल कॉलेजची एक जागा वाया घालवून हे महाराज लागले गाण्याच्या धंद्याला... त्याऐवजी सिरियसली डॉक्टरकी करणार्याला ती जागा देऊन तेव्हाच गायला सुरवात केली असती तर? त्या बिचार्या एखाद्याचे आयुष्य मार्गाला लागले असते. त्या वर्षी मेडिकलला वेटिंगवर राहिलेल्या त्या विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्याला प्रतिक्रिया विचारली पाहिजे... त्याच्या शिव्याशापाने कदाचित यांना थोडीही ‘...‘ वाटली, तरीही पुरेसे आहे... (‘...‘ हा सभ्य शब्द नाही.)
असो. तर आम्ही हे पुस्तक छापण्याआधीच वाचले होते. पाहिले होते. त्याआधी हे लेखन दैनिकांतूनही वाचले होते. आपले अपत्य आणि आपले पुस्तक प्रत्येकालाच प्रिय असते. पण म्हणून दोन दोन वेळा बारसे? ते ही झाले. पहिले आपल्या गणेश कला क्रिडा मध्ये... फुकट गाणे ऐकण्यास मिळणार म्हणून पब्लिकनेही गर्दी केली... पण प्रत्येकाने आपली कुवत ओळखली पाहिजे, असे आम्हास वाटते. ‘मी पहाटे तीन वाजता लिहिण्यास सुरवात केली...’ अशी थाप मारली की लोक भुलतात...! मनातला संवाद म्हणून टिंबाटिंबांनी ओळी जोडल्या की नवी ‘शैली’ तयार होते... असो. कोळसा तरी किती उगाळावा... कोळशानेही कधीतरी आत्मपरीक्षण केले पाहिजे एवढेच आमचे म्हणणे आहे...