19 अप्रैल 2011

अगरवाल सेठ, परमजित को उठाव...

तिकडे औरंगाबादी बर्‍याच हालचाली सुरू आहेत असे कळले. ‘मर्जी’ फेम परमजित लोकमतातून मुक्त होऊन पर्याय शोधता शोधता शनिवारवाड्यामागे भेटीसाठी आल्याचे कानावर आले. तिथे चांगली सुरवात पण झाली. असा कर्तबगार माणूस घ्यायचा, हे जवळपास ठरलेही म्हणे... पण हाय रे दैवा, घात झाला. तेथील काही हितचिंतकांनी लोकमताचा कौल घेण्याचे ठरविले आणि हा कौल डावा पडला. परमजितांचे घोडे तिथेच मुळेचे (की मुठेचे? कोण बरे सांगेल?) पाणी पीत थांबले. खरे तर त्यांच्या आगमनाने शनिवारवाड्यामागील बाजू उजळून निघाली असती. आम्ही ऐसे ऐकून आहोत की, श्रीमान परमजित आणिक परमादरणीय ऋषि मुनी फार जुने क्लासमेट. 11 वी सायन्सला ते एकाच बाकावर बसत. पण पुढे लोकमताचा कौल कळायचा तर केमेस्ट्रीची काय गरज ऐसे वाटून ऋषि मुनी परंपरागत कॉमर्स साईडला गेले आणि पुढे ते बी. कॉम. करण्यासाठी सिडनीहॅमला पोहोचले. इकडे परमजीतजींनी इमाने इतबारे बारावी सायन्स करोन तेथील एमआयटी नामक एका संस्थेतून इंजिनइरिंग पास केले. काही काळ काढल्यानंतर ते बर्मिंगहॅमला रवाना झाले. तेथेच नोकरी धरली आणि हातासरशी एमबीएही केले. इकडे बी. कॉम. झाल्यानंतर ऋषि मुनींनी औरंगाबाद मुक्कामीच पत्रकारितेची पदवी मिळविली. मग तयांना आणखी उच्च शिक्षणाची उबळ आली आणि ते परत सिडनीहॅमला रवाना झाले. तिथे तयांनी रितसर एमबीए केले.

तेथून परतल्यानंतर तयांचा रितसर राज्याभिषेक झाला. इकडे परमजित यांचे आदरणीय पिताश्री, औरंगाबाद नगरीचे भूतपूर्व डीवायएसपी एस. एस. संधू निवृत्त झाले होते. तयांचा भारी आग्रह पडला आणि परमजीतजी महाराष्ट्रदेशी औरंगाबाद नगरीत दाखल जाहले. तयास आता चार वर्षे लोटली. मित्रकर्तव्य म्हणोन नव्हे, तर कामाचा माणूस म्हणोन ऋषि मुनींनी तयांना आपल्या सरसेनापतीपदी विराजमान केले. विराजमान झाल्याबरोबर त्यांनी घोडा बाहेर काढला आणि हातघाईस सुरवात केली. पेपर वाटता वाटता क्रिकेटमध्ये घुसायचे ठरवून सुरू केलेली ‘एपीएल’ पहिल्या वर्षी 12 लाखाचा नफा मिळवून आवडती राणी ठरली होती. या राणीच्या अंगाखांद्यावर आणखी आलंकार चढवायचे ठरले आणि नव्या सरसेनापतींनी ही कामगिरी फत्ते करीत हा नफा काही कोटींवर नेला.

असा हा कर्तबगार माणूस शनिवारवाड्याच्या मागे आला पण हाय रे दुर्दैवा... घात झाला. हा माणूस सोबत असता तर पहिल्यांदाच औरंगाबादी खरा खुरा म्यानेजर मिळाला असता, असे ऐकीवात आहे. असेही ऐकिवात आहे की सध्या तेथ गत एक दशकापासून ‘म्यानेजर - म्यानेजर’चा खेळ केला जातो. असो. त्या म्यानेजराचे काहीही होवो, घसरणीला लागलेल्या पुणेरी ‘एमपीएल’ला या नव्या शिलेदाराने नक्कीच फायदा करून दिला असता. पण म्हणतात ना... काय म्हणतात?... असू दे...

तर असे हे परमजितसिंगजी सध्या अगरवालसेठना भेटण्याच्या प्रयत्नात असल्याचे कळले. पण अगरवाल सेठ तर संध्याकाळच्या विमानात बसून औरंगाबादेतून भुर्र निघून गेले. आता कसे? हे महाशय भास्कराच्या दिव्यात वात बनण्यास तयार असतील, तर अगरवालसेठनी तेल-पाण्याची व्यवस्था करावी. नाही तरी सध्या त्यांच्याकडे लोकलचा चांगला माणूस नाही. मुख्य विरोधकाचे छक्के-पंजे माहिती असलेला माणूस मिळाला तर?... पुढच्या वर्षी ‘डीएम प्रस्तुत एपीएल’ सुरू...? फुकट पेपर वाटण्यातील तोटा यातून भरून निघू शकेल. अगरवालसेठ विचार करा... चहापेक्षा रस बरा.....!