8 अप्रैल 2011

नागपुरी संत्री, कुबेर आणि चित्रगुप्त...!

सांप्रतला साडेतीन इंच मराठी वृत्तपत्रसृष्टीत बारा इंचाच्या हालचाली सुरू आहेत. त्याचा कानोसा घेता अक्षरशः कान किट्ट होत आहेत. तिकडे औरंगाबादी दिव्य युद्ध पेटले आहे. नगरमध्ये या युद्धाची सुरुवात होण्यासाठीचा दारुगोळा (पक्षी ः प्रचारपत्रे) छापून तयार आहेत. नाशिक - जळगावी सर्व्हेसाठी टीम निवडणे सुरू आहे तर लवकरच पुण्यानगरीत आगमन पक्के आहे. मुळावर घाव घातला तर फांद्या आपोआप खाली येतील हे थोरल्या बाजीरावांचे वचन बहुधा कोणे एके काळी भोपाळसेठनी वाचले होते. त्यामुळे औरंगाबादी जाउन लोकांच्या मताच्या मुळावर घाव घालणेचे त्यांनी नक्की केले असावे. असो. पण आज हुजूर हुकमाची पूर्ण पूर्तता (हुहुचिपुपु) करताना अस्मादिकांस दूर देशीच्या, नागपुरी प्रवीण झालेल्या संत्र्याचे दर्शन घडले. या संत्र्याच्या मूल्यमापनासाठी साक्षात कुबेराने चित्रगुप्ताचाच चार्ज घेतला आणि नागपुरी संत्री भर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कोमेजून अंबेजोगाई तालुक्यातील बरदापूर मुक्कामी परतल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे ऐशा कठिण प्रसंगी कुमारस्वामींनी आपल्या मठीत थारा न दिल्याने त्यांच्या नशिबी शेटजींचे पाय धरणे आल्याचे कळते.

त्याचे असे झाले... (ही त्यांचीच ष्टाईल)... ‘जर्नालिझम ऑफ करेज’ वास्तवात उतरविण्यासाठी अनेक पिढ्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. विंग्रजीत अरुण शौरी आणिक मराठीत पार जुन्या काळपासून गडकरी, टिकेकर, केतकर यांनी आपले बोरू झिजविले पण करेजचा फार काही विस्तार होईना. ‘करेजपूर्ण’ भाषेतील लेख वाचायचे तर हाच पेपर वाचायचा असे म्हणून लोक शेजारी जाऊन पेपर वाचायचे म्हणे. स्वतःचा पेपर स्वतः विकत घेणे ही मर्‍हाटी माणसासाठी महा कठीण बाब. तरी मुंबई - पुण्यात बरी स्थिती पण नागपुरात भारीच अवघड झाले म्हणे...

तर त्याचे असे झाले की प्रत्यक्ष कुबेरांनीच सगळीकडे झाडाझडती सुरू केली. हे केल्याबरोबर पहिल्याझूट काय झाले? तर कुमारस्वामी मठाबाहेर पडले. त्यांनी वेगळी मठी शोधली. (या मठीचे प्याकेज काही कोटींचे आहे म्हणे!) तर महाराजा, ही नवी मठी गाठल्यानंतर त्यांनी आपले जुने मित्रमंडळ जमवायला सुरवात केली. पण तिथे दाढीवाले कडमडले आणि ‘फ्रेन्ड इन नीड फ्रेन्ड इन्डिड’ या आंतरराष्ट्रीय म्हणीचा वापर स्वामींना करताच येईना...

पुढे असे झाले की साक्षात कुबेरानेच चित्रगुप्ताची डायरी हाती घेतली. कुबेराला हात दोन पण डोके महाविलक्षण. एकाच वेळी साहित्य, इतिहास, इंग्रजी, अर्थशास्त्र, राजकारण, तेल, तूप, लोणी हे सगळे विषय त्यांच्या मेंदूत एकदम फिट. आईनस्टाईनच्या मेंदूनंतर त्यांचाच मेंदू. तर या मेंदूतून खूप खूप सुपिक सुपिक आयडिया निघत जातात. अशीच एक आयडिया निघाली ‘करेज’वाल्या पत्रकारांच्या मूल्यमापनाची. हे मूल्यमापन कशाच्या जोरावर?  आजकाल बोरूबहाद्दरीला किंमतच उरली नाही हो... लै भारी लिहितो पण पेपरला फायदा होतो का? किती जाहिराती मिळाल्या? खप किती वाढला? असे काय पण काय पण प्रश्न म्हणे उपस्थित करायला या चित्रगुप्तरुपी कुबेरांनी सुरवात केली.

एका हातात चित्रगुप्ताची डायरी आणि दुसर्‍या हातात बेशरमीचा ओला फोक. मग काय महाराजा? एक नोंद वाचायची की फोक काढायचा. आता अशा फोकाला आजकाल ‘मेमो’ असे गोंडस नाव मिळाले आहे म्हणे. तर काय सांगत होतो... (असे म्हटले का आपण ज्येष्ठ झाल्यासारखे वाटते!) मागच्या दोन - तीन महिन्यात फोकाचे पाच सहा वळ पाठीवर उमटले म्हणे... खास म्हंजे आजकालच्या जमान्यात जसे पावर पॉइंटला महत्व आले आहे, तशा प्रकारे मागच्या पाच - सहा वर्षांचा रितसर ग्राफ काढून खपाचा तळाला जाणारा ग्राफ दाखवीत हे मेमो म्हणे अंगावर सोडले. हे पाहताच ‘करेज’चा ‘डिस्करेज’ झाला. आजपर्यंत फक्त ऐकवायचा रुबाब गाजवलेला. इकडं लिहून काढायचं, की तिकडं पुस्तक निघालं... मग कुठे गडकरी - मुंडे - भुजबळांना बोलाव, कुठे आणखी काही कर अशे उद्योग कोण किती सहन करणार हो?

‘शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा’ असा सुविचार आयुष्यात कधी वाचला नसल्यासारखे यांचे शब्द चौखुर उधळायचे. किती जणांची राजकीय कारकीर्द यांनी उध्वस्त केली ते त्यांनी आपल्याच पुस्तकात लिहून ठेवले आहे आणि नागपुरी संत्र्याचा रसाळपणा महाराजा किती सांगावा? काही नावे घेतली की रस ओघळायचा... पाघळायचा... उतू जायचा. या रसाचे किती पैसे झाले असा प्रश्न समोर आला की महाराजा काय सांगायचे.... तिडीक उठली. याच साठी का पत्रकारिता केली?

बरे, तसा नागपुरी संत्र्यांचा रसाळपणा उत्तम. सालं काढून टाकली की रसच रस. या रसाच्या रसाळ कथाही खूप आहेत म्हणतात. पत्रकार कसा ‘सर्वस्पर्शी’ असावा याचं हे दुष्काळी मराठवाड्यात उगवलेलं आणि विदर्भी दुष्काळात फुलेलं बेणं... (उसाच्या बियाण्याला बेणं म्हणतात हे आम्हाला ठावूक आहे. पण संत्र्यांच्या पिकातही नवे प्रयोग करण्याची आमची प्रगतीशील धडपड आपण समजून घ्यावी ही विनंती.) बरं थाट काय म्हणायचा...? संत्री, द्राक्ष मूळ रुपात किंवा रुपांतरीतर रुपात हवेच. ‘सांस तेरी मदिर मदिर जैसे रजनीगंधा...’ असे काही झाले तर उत्तमच !

तर अशा संपन्न वैदर्भीय ‘करेज’वर आकडेवारीसह फोक बरसले तेव्हा मठातील वाढलेला उष्मा काही सहन होईना. मग काय करायचे? कुमारस्वामींच्या नव्या मठीत प्रवेशाचे वांधे. तिथे आधीच दोन दाढीवाले. त्यात तिसरा म्हणजे मग उगीच कम्युनिष्टगिरीचा शिक्का बसायचा. खरे तर कोणीच कम्युनिष्ट - सोशालिष्ट नाहीत... सगळेच ‘अपॉर्च्युनिष्ट’...! पण हा रिस्क गेम स्वामींच्या पायरीवर न खेळता आल्याने मग म्हणे शेटजींना शरण जाणे आवश्यकच झाले. आता तिथे करेज वगैरेचा काही सवालच नसतो. राजा बोले. दळ हाले. आंधळे दळतात, कुत्रे पीठ खातात. यथा राजा तथा प्रजा. नाव सोनुबाई - हाती कथलाचा वाळा.... अशा अनेक म्हणींचे प्रत्यंतर येण्याची जागा म्हणजे शेटजींची पेढी. तिथे पुरवण्यांची मुनीमगिरी करायचे ठरले आहे म्हणतात.

पण महाराजा, एक लक्षात आले का? आता मागील काही वर्षांत ‘औरंगाबाद - नागपूर - मुंबई’ असा नवा महामार्ग तयार होतो आहे... या महामार्गावरील नवे प्रवासी कोण?